Donald Trump Hotel Rental Scam : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. या घोटाळ्यात शेकडो भारतीयांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांसह सरकारी कर्मचारी, वकील आणि व्यावसायिक व्यक्तीही या फसवणुकीला बळी पडले आहेत. यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घोटाळ्यात जवळपास ८०० हून अधिक लोकांनी कोट्यवधी रुपये गमावले असल्याची माहिती आहे. दरम्यान, नेमकी काय होती ही योजना? सायबर चोरट्यांनी लोकांना कसे फसवले याबाबत जाणून घेऊ…

‘एआय’ जसे विकसित होत आहे, तसतशा आपल्याला अनेक सुविधा मिळत आहेत. पण काही लोक या तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून त्याद्वारे लोकांची फसवणूक करत असल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘एआय’ने तयार केलेला व्हिडीओ वापरून कर्नाटकमधील काही शहरांमध्ये अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केल्यास त्यावर मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून जवळपास ८०० लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यातील २०० प्रकरणं एकट्या कर्नाटक राज्यातील आहेत.

दुप्पट पैशांच्या अमिषाने अनेकांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू, तुमकुरू, मंगळुरू आणि हवेरी याठिकाणी सायबर चोरी झाल्याची अनेक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. ‘ट्रम्प हॉटेल्स रेंटल्स’ या योजनेत पैसा लावणारे अनेक लोक फसवणुकीला बळी पडले आहेत. गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल या आशेने अनेकांनी या योजनेत कर्ज काढून पैसे गुंतवले असल्याचं समोर आलं आहे. फसवणूक झालेले अनेक गुंतवणूकदार आता त्यांचे कष्टाचे पैसे वसूल करण्यासाठी पोलिसांसमोर विनवण्या करीत आहेत. आयुष्याची जमापुंजी या योजनेत गुंतवणारे लोक पैसे गडप झाल्याने मेटाकुटीला आले आहेत.

आणखी वाचा : MLAs suspended : ‘ऑपरेशन लोटस’अंतर्गत भाजपात आले अन् निलंबित झाले; भाजपाने ‘त्या’ दोन आमदारांना पक्षातून का काढलं?

नेमकी काय होती डोनाल्ड ट्रम्प योजना?

सायबर चोरट्यांनी गुंतवणूकदारांना घरबसल्या ऑनलाईन काम करून पैसे कमविण्याचे अमिष दाखवले. यासाठी त्यांनी ‘एआय’चा वापर करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ तयार केला. भारतातील कोणताही व्यक्ती “Trump Hotel Rentals” मध्ये गुंतवणूक करुन मोठा नफा मिळवू शकतो, असे या व्हिडीओतून सांगण्यात आले. या व्हिडीओला युट्युब शॉर्ट्स आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हा व्हिडीओ खरा असल्याचे समजून सर्वसाधारण व्यक्ती, सरकारी कर्मचारी, वकील व व्यावसायिक लोकांनी त्याखाली दिलेल्या लिंक ओपन केल्या. या लिंकमधून एक अॅप डाऊनलोड झाले. या अॅपमध्ये गुंतवणूकदारांची माहिती, बँक खाते क्रमांक व IFSC कोड यासारखी माहिती भरण्याच्या अटी होत्या.

१५०० रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा?

१५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास दिवसाला ३० रुपयांचा परतावा मिळेल, अशी माहिती या अॅपमध्ये देण्यात आली होती. सुरुवातीला काही लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले. त्यांच्या प्रोफाईलवर दिवसाला ३० रुपये जमा होत होते. या कमाईचा ओघ पाहून अनेकांच्या मनात लालसा निर्माण झाली. बघता-बघता शेकडो लोकांनी अॅपवर पाच हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली. परंतु, जेव्हा काहींनी हे पैसे विड्रोल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना टॅक्सच्या नावाखाली आणखी पैसे मागण्यात आले. टॅक्स भरूनही पैसे निघत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले. शेवटी त्यांना जमा झालेले व्याज तर मिळालेच नाही, याशिवाय जमा केलेली मुद्दलही गमवावी लागली.

वकिलाने गमावले पाच लाख ९३ हजार रुपये

दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एका २८ वर्षीय वकिलाने सांगितले, “जानेवारीमध्ये मला युट्यूब शॉर्ट्सवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करण्यासंबंधीचा व्हिडीओ दिसला. संबंधित लिंकवर क्लिक केल्यानंतर एक मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड झाले. तिथे दिलेल्या पर्यायावर क्लिक करून मी अर्ज भरला. बँक खात्याची माहिती आणि आयएफएससी कोडही टाकला. त्यानंतर नोंदणी शुल्क म्हणून १,५०० रुपये भरल्यानंतर माझ्या प्रोफाइलमध्ये ३० रुपये जमा झाले. माझ्या प्रोफाइलमध्ये दररोज ३० रुपये जमा होत होते आणि ३०० रुपये झाल्यानंतर मला ते काढता येणार होते.”

“मला एक रुपयाही मिळाला नाही”

पुढे बोलताना फसवणुकीला बळी पडलेले वकील म्हणाले, “काही दिवसांनी मला अॅपवर आणखी पैसे गुंतविण्यास सांगितले गेले. त्यानुसार मी २५ जानेवारी ते २ एप्रिल दरम्यान ‘ट्रम्प हॉटेल्स रेंटल्स’या योजनेत टप्प्याटप्याने पाच लाख ९३ हजार २४० रुपये गुंतवले. शेवटी योजनेत मिळालेला परतावा मी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उत्पन्नावरील कर भरण्यास सांगितले. मी करही भरला; पण तरीही मला एक रुपयाही मिळाला नाही. मी गुंतवलेली रक्कमही मला काढता येत नव्हती. शेवटी फसवणूक झाल्याचं कळताच मी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.”

हेही वाचा : तेजप्रताप यादव यांच्यामुळे लालूंचा पक्ष चक्रव्यूहात? बिहारच्या निवडणुकीवर काय होणार परिणाम?

८०० हून अधिक लोकांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील अनेक शहरांतील नागरिक या अमिषाला बळी पडले आहेत. अवघ्या पाच ते सहा महिन्यांत सायबर चोरट्यांनी ‘ट्रम्प हॉटेल्स रेंटल्स’ या फसव्या योजनेच्या नावाखाली ८०० हून अधिक लोकांना गंडा घातला आहेत. या फसवणुकीला बळी पडलेल्या ३८ वर्षीय वकिलासह आतापर्यंत २०० हून अधिक लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, ज्यामध्ये सरकारी कर्मचारी, वकील, व्यावसायिकांचा समावेश आहे. फसव्या अॅपद्वारे सुमारे २ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सांगितलं आहे. हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी आयटी कायदा आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम 318(4) अंतर्गत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फसव्या योजनांपासून सावधगिरी बाळगा

‘ट्रम्प हॉटेल्स रेंटल्स’ या फसव्या योजनेच्या नावाखाली देशभरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे, ज्याअंतर्गत लोकांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याचे खोटे आश्वासन दिले जात आहेत. तुमच्या मोबाईलवर अशी लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नये. आपल्या जवळच्या व्यक्तींनाही याबाबत सतर्क करावे असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कोणत्याही ऑनलाईन योजनेत गुंतवणूक करण्याआधी त्यांची पूर्णपणे पडताळणी करावी, असं पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.