कॅनडामधील प्रसिद्ध नेता आणि खलिस्तान समर्थक जगमीत सिंग यांना निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत जगमीत सिंग यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (एनडीपी)ला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. जगमीत सिंग यांनी या निवडणुकीत स्वतःची जागादेखील गमावली आहे. या दारुण पराभवानंतर जगमीत सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या निवडणुकीत न्यू डेमोक्रॅटिक पक्षाला केवळ सात जागा जिंकता आल्या आहेत. मागील निवडणुकीत या पक्षाला २५ जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत जगमीत सिंग यांचा पराभव कोणत्या कारणांमुळे झाला? त्याविषयी जाणून घेऊ.

पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गमावणार

२०२२ मध्ये जगमीत सिंग कॅनडाच्या निवडणुकीत किंगमेकर म्हणून उदयास आले होते. त्यांनी जस्टिन ट्रूडो यांना सरकार स्थापन करण्यास मदत केली होती. अनेकांचा असा अंदाज होता की, संघीय निवडणुकीतही न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (एनडीपी) चे नेते महत्त्वाची भूमिका बजावतील; परंतु तसे झाले नाही. मुख्य म्हणजे सिंग स्वतःच्या जागेवरून म्हणजेच बर्नाबी सेंट्रलमधूनदेखील हरले आणि या पराभवानंतर त्यांनी न्यू डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेते पदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली. आता त्यांचा पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅनडातील पक्षांना ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी अधिकृतपणे १२ जागांची आवश्यकता असते. परंतु, जगमीत सिंग यांच्या पक्षाला हा आकडा पूर्ण करता आलेला नाही.

कोण आहेत जगमीत सिंग?

ग्रेटर टोरंटो एरियामधील ओंटारियो येथील स्कारबोरो येथे जगमीत सिंग यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंजाबमधील असून ते कॅनडात स्थलांतरित झाले. जगमीत सिंग यांनी वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठातून जीवशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि यॉर्क विद्यापीठाच्या ओसगुड हॉल लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी प्राप्त केली. गेली अनेक वर्ष त्यांनी गुन्हेगारी बचाव पक्षाचे वकील म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २०११ च्या निवडणुकीत ओंटारियो येथील जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, २०१९ मध्ये ब्रिटीश कोलंबियातील बर्नाबी येथे झालेल्या पोटनिवडणुकीत कॅनडाच्या संसदेत ते निवडून आले. या निवडणुकीत त्यांना पहिल्यांदाच विजय मिळाला होता. जगमीत सिंग यांना त्यांच्या पेहराव आणि राहणीमानामुळे कॅनडातील सर्वात स्टायलिश राजकारणी म्हणून ओळखले जात होते. एका मॅगझिनमध्ये त्यांचा स्टायलिश राजकारणी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. २०२२ मध्ये त्यांच्या पक्षानी तत्कालीन पंतप्रधान ट्रुडो यांच्या पक्षाशी करार केला.

जगमीत सिंग यांची खलिस्तान्यांच्या समर्थनार्थ आणि भारतविरोधी भूमिका

जगमीत सिंग कायम खलिस्तान्यांचे समर्थन करताना दिसले. १९८४ च्या शीख दंगलीचे वर्णन त्यांनी नरसंहार म्हणून केले होते, त्यामुळेच २०१३ मध्ये त्यांना भारतीय व्हिसा नाकारण्यात आला होता. दोन वर्षांनंतर ते एका खलिस्तानी रॅलीतदेखील सहभागी झाले होते, जिथे त्यांनी ‘खलिस्तान, खलिस्तान’ अशा घोषणा दिल्या होत्या. तसेच या रॅलीमध्ये १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरावरील हल्ल्यात सहभाग असलेल्या खलिस्तानी जर्नेल सिंग भिंद्रनवाले याचे मोठे पोस्टर होते. भिंद्रनवालेने खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमध्ये दहशतवादाला खतपाणी घातले होते.

गेल्या वर्षी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाचे भारताशी असलेले संबंध बिघडले, तेव्हा ट्रुडो सरकारने भारतीय राजदूतांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला सिंग यांनी पाठिंबा दर्शवला होता. ते म्हणाले होते की, “आम्ही भारताच्या राजदूतांना हद्दपार करण्याच्या निर्णयाचे समर्थन करतो आणि आम्ही कॅनडा सरकारला पुन्हा एकदा भारताविरुद्ध राजदूत निर्बंध लागू करण्याचे, कॅनडामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नेटवर्कवर बंदी घालण्याचे आणि कॅनडाच्या भूमीवर संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याचे आवाहन करत आहोत.”

कॅनडा निवडणुकीत जगमीत सिंग यांचा पराभव

सप्टेंबर २०२४ मध्ये सिंग यांनी ट्रुडो सरकारकडून पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर सर्वांच्या नजरा २८ एप्रिल रोजी झालेल्या संघीय निवडणुकीत सिंग आणि त्यांच्या पक्षाच्या कामगिरीकडे वळल्या होत्या. परंतु, निवडणुकीतील निकालातून असे दिसून आले की, त्यांच्या मोहिमा मतदारांच्या पसंतीस पडल्या नाही. त्यांच्या पक्षाने निवडणुकीत खराब कामगिरी केल्याने आणि निवडणुकीत फक्त सात जागा जिंकल्याने त्यांना त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गमवावा लागला आहे. मागील निवडणुकीत सिंग यांच्या एनडीपीने २४ जागा जिंकल्या होत्या.

कोलंबियामधील बर्नाबी सेंट्रल या जागेवरून ते दोनदा निवडून आले होते. परंतु, यंदाच्या निवडणुकीत लिबरल पक्षाचे उमेदवार वेड चांग यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. सिंग यांना केवळ २७ टक्के मते तर चांग यांना ४० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये सिंग म्हणाले, “मला माहीत आहे की, ही वेळ न्यू डेमोक्रॅट्ससाठी निराशाजनक आहे.” ते पुढे म्हणाले, “मला माहीत आहे की आपण कायम भीतीपेक्षा आशेला निवडू. न्यू डेमोक्रॅट्सनी या देशाची उभारणी केली आहे.” एनडीपी नेते म्हणून काम करणे हा माझ्या आयुष्याचा सन्मान असल्याचे सिंग यांनी सांगितले. नवीन नेता मिळेपर्यंत अंतरिमपणे आपण आपल्या पदावर कार्यरत राहू, असेदेखील ते म्हणाले.

न्यू डेमोक्रॅटिक पार्टी आणि सिंग यांचे भविष्य

कॅनडा निवडणुकीचे निकाल न्यू डेमोक्रॅटिक पार्टीसाठी धक्कादायक आहेत, कारण हा पक्ष निवडणुकीत विरोधी पक्षांना टक्कर देईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पक्षाच्या राष्ट्रीय संचालक अ‍ॅन मॅकग्रा म्हणाल्या की, या पराभवामुळे अंतर्गत आढावा घेतला जाईल आणि त्रुटी शोधल्या जातील. निवडणुकीच्या काळात सिंग यांनी प्रेरणादायी मोहीम चालवल्या, असेही अ‍ॅन मॅकग्रा म्हणाल्या. ‘द स्टार’शी बोलताना त्या म्हणाल्या, या निकालांचा पक्षाच्या भविष्यासाठी काय अर्थ असेल, हे आता सांगता येणे कठीण आहे.