|| चिन्मय पाटणकर

प्रशांत महासागरातील टोंगा द्वीपसमूहाजवळ १५ जानेवारी रोजी समुद्रातळाशी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे परिसरातील अनेक देशांना सुनामीचा इशारा देण्यात आला. या ज्वालामुखीचा स्फोट प्रचंड झाल्यामुळे त्याचे हादरे दूरवर जाणवले. या सागरी क्षेत्रातील अन्य देशांना सुनामीचा संहारक फटका बसला नसला तरी, टोंगा बेटावरील आकाशात सुमारे १९ हजार मीटर उंचीचे राखेचे ढग जमा झाल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. टोंगा प्रदेशाचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्राखालील केबल काही आठवडे नादुरुस्त राहातील.

Bridge in sea to connect Bandra Worli Sea Bridge and Sea Coast Road
वांद्रे वरळी सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्गाला जोडण्यासाठी समुद्रात पूल
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Ship catches fire in Thailand all passengers safe
थायलंडमध्ये जहाजाला आग, सर्व प्रवासी सुखरूप
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल

उद्रेक कुठे? नुकसान किती?

१५ जानेवारीला झालेल्या उद्रेकामुळे वायू, वाफा आणि राख १२ किलोमीटर उंच फेकली गेली, पॅसिफिक महासागरात मोठय़ा लाटा निर्माण होऊन टोंगा द्वीपसमूहातील सर्वात मोठय़ा टोंगाटापू या बेटावर सुमारे पाच ते दहा मीटर उंचीच्या लाटा धडकल्या. बेटाच्या पाचशे मीटर आतपर्यंत या लाटा शिरल्या. टोंगामधील प्राणहानीची नोंद अद्याप झालेली नाही. तर पेरू या देशात, उत्तर किनाऱ्यावर दोन बळी गेल्याची नोंद आहे.अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सव्‍‌र्हेच्या माहितीनुसार या स्फोटामुळे ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला तरी त्यामुळे निर्माण झालेली सुनामी अधिक विपरीत परिणाम करणारी आहे. जपानच्या पर्यावरण विज्ञान संस्थेने कागोशिमा प्रांतातील टोकारा द्वीपसमूहासाठी सुनामीचा इशारा दिला आहे.  फिजी, समोआ, वानुटू या पॅसिफिक द्वीपराष्ट्रांना इशारा सुनामीचा देण्यात आला. जपानच्या वायव्य किनाऱ्यापर्यंत व अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत काही मीटर उंचीच्या लाटा धडकल्या. तर आतापर्यंत समोर आलेल्या चित्रफितींमध्ये मोठय़ा लाटा धडकल्याने फिजीची राजधानी सुवामधील रहिवासी उंच भागाकडे पळत असल्याचे दिसते. अलास्काच्या राष्ट्रीय सुनामी केंद्राच्या माहितीनुसार या विस्फोटाने प्रशांत महासागराचा मोठा भाग प्रभावित झाला आहे.

हुंगा टोंगा- हुंगा हापाईहे नाव का?

दक्षिण पॅसिफिक महासागरात टोंगा हा १७० बेटांचा समूह आहे. त्यापैकी जवळपास ३६ बेटांवर मानवी अधिवास नाही. टोंगा द्वीपसमूहातील उरलेल्या बेटांवर मिळून सुमारे एक लाखांहून अधिक रहिवाशांचे वास्तव्य आहे. या बेटांचे स्थान फिजीपासून सुमारे ८०० कि.मी. आणि न्यूझीलंडपासून २ हजार ३८० कि.मी.वर आहे. हा ज्वालामुखी टोंगाच्या फोनौफोऊ बेटाजवळ सुमारे ३० कि.मी.वरील हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई या दोन बेटांच्या दरम्यान आहे. हा मूळचा समुद्रतळचा ज्वालामुखी आता समुद्रपातळीपासून शंभर मीटर उंच दिसतो. २००९ मध्ये झालेल्या उद्रेकावेळी मोठय़ा प्रमाणात वाफा हवेत फेकल्या जाऊन पाण्याच्या पातळीवर जमीन निर्माण झाली होती, पुन्हा २०१५ मध्येही हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई बेटांना जोडणाऱ्या नव्या बेटाची निर्मिती झाली.

प्रचंड मोठा स्फोट, आकाशात राख

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या ज्वालामुखीचा विस्फोट हिरोशिमा अणुबॉम्बच्या एक हजार पट अधिक आहे. हा स्फोट फिजीपासून सुमारे साडेसातशे किलोमीटरवर ऐकू गेला. हा भूकंप फिलिपिन्समधील पिनाटुबू येथे १९९१ मध्ये झालेल्या भूकंपानंतरचा सर्वात मोठा असल्याचे मानले जात आहे. उद्रेकानंतर टोंगाच्या प्रदेशातील आकाश राखेने भरून गेले.  पश्चिमकडे सरकणारी ही राख फिजी, वानाटू, न्यू कॅलेडोनिया या प्रदेशांचे आकाश व्यापून ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडपर्यंत पोहोचली. ज्वालामुखीच्या उद्रेकातून चार लाख टन सल्फर डाय ऑक्साइड  बाहेर पडत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे टोंगामध्ये आम्लयुक्त पाऊस पडू शकतो.

मदतकार्य धिम्या गतीने कसे?

आकाशातील राखेमुळे टोंगाचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.   राख पाण्यात मिसळली गेल्याने टोंगामध्ये पिण्याच्या पाण्यापासूनचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वित्तहानी मोठय़ा प्रमाणात झाली आहे. राखेच्या उंच ढगांमुळे हवाई मार्गाने त्वरित मदत पोहोचवण्यात अडथळे येत असूनही, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने पुढाकार घेऊन समुद्रमार्गे आणि विमानांतून मदत साहित्य पोहोचवण्याचा  प्रयत्न सुरू केला. मात्र समुद्राखालील केबलच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास आणखी काही आठवडे लागण्याची शक्यता असल्याने टोंगाला जगाच्या संपर्ककक्षेच्या बाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे.

सुनामीची भीती आता ओसरली का?

ज्येष्ठ भूकंपतज्ज्ञ डॉ. अरुण बापट सांगतात की, जगात जवळपास आठ मोठमोठे भूखंड आहेत. हे भूखंड एकमेकांवर घासले जाऊन भूकंप होतात, विशेषत: प्रशांत महासागरात फिलिपिन्स ते इंडोनेशियापासून न्यूझीलंडपर्यंत जास्त होतात, तर जपानच्या पूर्वेला दीडशे ते अडीचशे किलोमीटर परिसरातही असे भूकंप होतात. मात्र त्यांची फारशी जाणीव होत नाही. टोंगा ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे सुनामीची स्थिती आहे. सबमरिन ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर गरम लाव्हा समुद्राच्या पाण्यात थंड होतो. त्यामुळे समुद्राच्या खाली मोठमोठे पर्वत तयार होतात. आपल्याकडील राष्ट्रीय भूभौतिकी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. जनार्दन नेगी यांनी काही वर्षांपूर्वी साधारणपणे कारवारच्या पश्चिमेला पाचशे किलोमीटरवर मोठा प्राचीन काळचा ज्वालामुखीमुळे निर्माण झालेला पर्वत शोधला होता. त्याची उंची समुद्राखाली तीन हजार मीटर आहे. तर एका ठिकाणी तर एव्हरेस्टएवढी उंची आहे. हा समुद्राखालील डोंगरपट्टा दक्षिणेकडे खाली जाऊन श्रीलंकेला वळसा घालून बंगालच्या उपसागरात पसरलेला आहे. ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंपामुळे पृथ्वी बदलते. त्या भागातील भूचुंबकीय क्षेत्र बदलत जाते. ज्वालामुखीचा उद्रेक होणार असल्याचे समुद्राच्या तळाशी असलेल्या माशांना आधी कळते आणि ते दूर जायला लागतात. अशाच प्रकारे १९०५ मध्ये म्यानमारमध्ये अक्याम नावाच्या प्रदेशातील चिखलाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्या उद्रेकातून बाहेर पडलेला चिखल इतका होता, की समुद्रातील पाणी खूप गढूळ झाले. त्याचा मच्छीमारांना फार त्रास झाला. ज्वालामुखीचा उद्रेक ही नैसर्गिक घटना आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. जास्त खोली असलेल्या भूकंपामुळे किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे येणारी सुनामी फारशी हानीकारक नसते. भूखंडांची टक्कर, समुद्रतळ बदलणे हे मात्र सुनामीला आमंत्रण ठरते.

chinmay.patankar@expressindia.com