Explained formation of NATO became the reason for the Russia Ukraine dispute abn 97 | विश्लेषण : रशिया-युक्रेन वादाचे कारण ठरलेली नाटो संघटना म्हणजे काय ? जाणून घ्या... | Loksatta

विश्लेषण : रशिया-युक्रेन वादाचे कारण ठरलेली नाटो संघटना म्हणजे काय ? जाणून घ्या…

एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचे आहे

विश्लेषण : रशिया-युक्रेन वादाचे कारण ठरलेली नाटो संघटना म्हणजे काय ? जाणून घ्या…

रशियाने जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे ही परिस्थिती युरोपमधील सर्वात मोठे सुरक्षेच्या संकटांपैकी एक आहे. यावेळी जगातील सर्वात मोठी लष्करी आघाडी, नाटो पुन्हा चर्चेत आली आहे. रशिया-युक्रेन वादात अमेरिकेचे वर्चस्व असलेली नाटो ही संघटना प्रमुख घटक म्हणून पुढे आली आहे. एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचे आहे, तर रशियाने युक्रेनला आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक मानून तसे करण्यापासून रोखण्यासाठी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे. अशा परिस्थितीत नाटो म्हणजे काय हे समजून घेऊया…

नाटो म्हणजे काय?

नाटोचे पूर्ण नाव नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आहे. ही युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांची लष्करी आणि राजकीय युती आहे. ४ एप्रिल १९४९ रोजी नाटोची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे आहे. नाटोची स्थापना झाली तेव्हा अमेरिकेसह १२ देश त्याचे सदस्य होते. २८ युरोपियन आणि दोन उत्तर अमेरिकन देशांसह आता ३० सदस्य राष्ट्रे आहेत.

नाटो देश आणि तेथील लोकांचे संरक्षण करणे ही या संघटनेची सर्वात मोठी जबाबदारी आहे. नाटोच्या कलम ५ नुसार, त्याच्या कोणत्याही सदस्य राष्ट्रावर हल्ला हा सर्व नाटो देशांवरील हल्ला मानला जातो. १९५२ मध्ये तुर्की हा एकमेव मुस्लिम सदस्य देश म्हणून नाटोमध्ये सामील झाला.

नाटोच्या १२ संस्थापक देशांमध्ये अमेरिका, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आइसलँड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम यांचा समावेश होता. दुसऱ्या महायुद्धानंतर, अमेरिकन आणि युरोपीय देशांनी सोव्हिएत युनियनला रोखण्यासाठी नाटो म्हणून ओळखल्या जाणार्‍या लष्करी युतीची स्थापना केली.

युरोपियन देश आणि अमेरिकेकडून नाटोची स्थापना

दुसऱ्या महायुद्धानंतर, सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोन मोठ्या शक्ती म्हणून उदयास आल्या, ज्यांना जगावर वर्चस्व गाजवायचे होते. त्यामुळे अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमधील संबंध बिघडू लागले आणि त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट सरकारला दुसऱ्या महायुद्धानंतर कमकुवत झालेल्या युरोपीय देशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते.

सोव्हिएत युनियनची योजना टर्की आणि ग्रीसवर वर्चस्व गाजवण्याची होती. टर्की आणि ग्रीसवर नियंत्रण ठेवून, सोव्हिएत युनियनला काळ्या समुद्रातून होणारा जागतिक व्यापार नियंत्रित करायचा होता.

सोव्हिएत युनियनच्या या विस्तारवादी धोरणांमुळे त्याचे पाश्चात्य देश आणि अमेरिकेशी असलेले संबंध पूर्णपणे बिघडले. अखेरीस, युरोपमधील सोव्हिएत युनियनचा प्रसार रोखण्यासाठी युरोपियन देश आणि अमेरिकेने एकत्रितपणे नाटोची स्थापना केली.

नाटोचे कलम ५ काय आहे?

कलम 5 नाटोसाठी सर्वात महत्वाचे आहे आणि या लष्करी संघटनेचा गाभा आहे. नाटोच्या कलम ५ नुसार, ही संघटना आपल्या सदस्यांच्या सामूहिक संरक्षणावर विश्वास ठेवते. याचा अर्थ असा की त्याच्या कोणत्याही देशावर बाह्य हल्ला हा सर्व मित्र राष्ट्रांवर हल्ला मानला जातो.

२००१ मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नाटोने प्रथमच कलम ५ चा वापर केला. याअंतर्गत नाटो देशांच्या सैनिकांनी अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी आणि तालिबान यांच्याविरोधात संयुक्त कारवाई केली होती.

नाटोला रोखण्यासाठी सोव्हिएत युनियनचा करार

नाटोशी व्यवहार करण्यासाठी, सोव्हिएत युनियनने १४ मे १९५५ रोजी वॉर्सा कराराची स्थापना केली. वॉर्सा करार सोव्हिएत युनियनसह अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड, रोमानिया या आठ देशांदरम्यान झाला. वॉर्सा करार १ जुलै १९९१ रोजी सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर संपला.

रशिया-युक्रेन वादाचे कारण बनली नाटो

१९९१ मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर, नाटोचा झपाट्याने विस्तार झाला. युरोप आणि सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या देशांदरम्यान प्रामुख्याने हा विस्तार झाला. २००४ मध्ये, नाटोमध्ये तीन देश सामील झाले जे सोव्हिएत युनियनचा भाग होते. लाटविया, एस्टोनिया आणि लिथुआनिया, हे तिन्ही देश रशियाच्या सीमेवर आहेत.

युक्रेन गेल्या अनेक वर्षांपासून नाटोमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्या अलीकडच्या प्रयत्नामुळेच रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेनची रशियाशी २२०० किमी पेक्षा जास्त सीमा आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास युक्रेनच्या बहाण्याने नाटोचे सैन्य रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल, असा रशियाला विश्वास आहे.

युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे, पाश्चात्य देशांपासून मॉस्कोच्या राजधानीचे अंतर केवळ ६४० किमी असेल. सध्या हे अंतर सुमारे १६०० किलोमीटर आहे. युक्रेन कधीही नाटोमध्ये सामील होणार नाही याची हमी रशियाला हवी आहे.

अमेरिका नाटोच्या माध्यमातून रशियाला चारही बाजूंनी घेरत आहे. सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर १४ युरोपीय देश नाटोमध्ये सामील झाले आहेत. आता त्याला युक्रेनचाही नाटोमध्ये समावेश करायचा आहे.

नाटोच्या प्रमुख कारवाया कोणत्या?

नाटोने त्याच्या स्थापनेनंतर सुमारे पाच दशकांपर्यंत कोणतीही लष्करी कारवाई केली नाही. १९९० नंतर, नाटोने जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशात अनेक कारवाया केल्या.

ऑपरेशन अँकर गार्ड (१९९०): इराकने कुवेतवर आक्रमण केल्यानंतर नाटोने पहिली लष्करी कारवाई सुरू केली. ऑपरेशन अँकर गार्डच्या माध्यमातून तुर्कीला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी नाटोची लढाऊ विमाने तेथे तैनात करण्यात आली होती.

ऑपरेशन एस गार्ड (१९९१): इराक-कुवैत युद्धामुळे हे ऑपरेशन देखील केले गेले. यामध्ये नाटोचे मोबाईल फोर्स आणि हवाई संरक्षण तुर्कस्तानमध्ये तैनात करण्यात आले होते. नाटो सैन्याच्या दबावाखाली इराकने काही महिन्यांनी फेब्रुवारी १९९१ मध्ये कुवेतला मुक्त केले.

ऑपरेशन जॉइंट गार्ड (१९९३-१९९६): १९९२ मध्ये युगोस्लाव्हियाचे विघटन झाल्यानंतर बोस्निया आणि हर्झेगोविना युद्धात नाटो सैन्याने भाग घेतला. १९९४ मध्ये, नाटोने चार बोस्नियाई सर्ब युद्ध विमाने पाडली. नाटोची ही पहिली लष्करी कारवाई होती. १९९५ मध्ये, नाटोने दोन आठवड्यांच्या बॉम्बफेकीने युगोस्लाव्हियन युद्ध संपवले.

ऑपरेशन अलायड फोर्स (१९९९): कोसोवोमध्ये अल्बेनियन वंशाच्या लोकांवर अत्याचार केल्यानंतर, नाटोने मार्च १९९९ मध्ये युगोस्लाव्हियन सैन्यावर कारवाई सुरू केली. आताही, नाटोचे कोसोवो फोर्स म्हणून कोसोवोमध्ये सुमारे ३,५०० नाटो सैनिक तैनात आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2022 at 15:13 IST
Next Story
विश्लेषण : पुतीन यांच्या वरवंट्यासमोर ठाम उभे राहिलेले झेलेन्स्की आहे तरी कोण?