पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले. दरम्यान, ओमायक्रॉनसह मूळ करोना रुग्णांची संख्या अधिक आढळणाऱ्या आणि लसीकरणचा वेग कमी असलेल्या महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली आहे. त्यामुळे आता सामान्यांना बुस्टर डोस कधी मिळणार याबाबत प्रश्न निर्माण झाले आहे.

जानेवारीपासून देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करून त्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी यांनी म्हटले आहे. तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून वर्धक लसमात्रा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड विरूद्ध लसीचा तिसरा डोस देण्याची योजना जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर नऊ ते १२ महिन्यांचे असण्याची शक्यता आहे, असे वृत्तसंस्था पीटीआयने म्हटले आहे. भारताच्या लसीकरण कार्यक्रमात सध्या वापरल्या जाणार्‍या लसींमधील उणिवा दूर केल्या जात आहेत. यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) सध्या लसीचा दुसरा डोस आणि प्रिस्क्रिप्शन डोसमधील कालावधी नऊ ते १२ महिन्यांच्या दरम्यान असावा की नाही यावर चर्चा करत आहे. भारतातील ६१ टक्के प्रौढ लोकसंख्येचे करोना लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याच वेळी, प्रौढ लोकसंख्येपैकी ९० टक्के लोकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे.

पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्यानुसार, तिसरा डोसला  प्रिव्हेंशन डोस म्हटले जात आहे. १० जानेवारीपासून आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या या गटातील बहुतेक लोकांना २०२१ च्या पहिल्या सहामाहीत दोन्ही डोस मिळाले. कारण १६ जानेवारी २०२१ रोजी सुरू झालेल्या भारताच्या लसीकरण कार्यक्रमात या गटाला प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना शेवटचा डोस घेऊन नऊ महिने झाले आहेत.

प्रिव्हेंशन डोस काय आहे?

कोविड विरुद्धच्या नियमित लसींमध्ये दोन डोस असतात. नवीन व्हेरिएंटच्या उदयानंतर, शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बूस्टर म्हणून काम करू शकणार्‍या तिसर्‍या डोसची गरज जगभरात जाणवली आणि अनेक देशांनी हा तिसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे, ज्याला सामान्यतः बूस्टर डोस म्हणून संबोधले जाते. पंतप्रधान मोदींनी मात्र तिसरा डोस जाहीर केल्याने लोकप्रिय बुस्टर डोस हा शब्द वापरला नाही. त्याला प्रिव्हेंशन डोस म्हणून संबोधले गेले.