Shraddha Walkar Murder Case :  दिल्लीत वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची प्रियकराने अतिशय क्ररतेने हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. आफताब अमीन पूनावाला असे या घटनेतील आरोपी असणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याने श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला आणि त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. फ्रिजमध्ये हे शरीराचे तुकडे ठेवून दिल्लीतील वेगवेगळ्या भागात ते फेकून त्याची विल्हेवाट लावण्याचा कट त्याने रचला होता. हत्याकांड झाल्यानंतर सहा महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला ताब्यात घेतले आहे.चौकशीत आफताबने अनेक खुलासे केले असून ‘डेक्सटर’ ही वेब सीरिज बघून खूनाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती त्याने दिली आहे.

श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी २०१८ पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. मात्र आफताब पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला? हे जाणून घेऊयात.

पोलीस आफताबपर्यंत कसे पोहचले? –

श्रद्धा घर सोडून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये आफताब आणि श्रद्धा दिल्लीत राहण्यासाठी आले होते. तेव्हापासून तिचा कोणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन बंद असल्याने तसंच सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट्स बंद असल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी ६ ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

तपासात श्रद्धाचा फोन मे महिन्यापासासूनच बंद असल्याचं आढळलं. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावलं होतं. ‘ती भांडण करुन घरातून निघून गेली. पण ती कुठे गेली हे मला माहिती नाही,’ असं त्याने पोलिसांना सांगितलं. पण त्याच्या बोलण्यात वारंवार विसंगती आढळत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली असता संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या आहेत.

गुगलवरुन हत्येसंदर्भातील माहिती मिळवली –

आफताबने गुगलवरुन या हत्येसंदर्भातील माहिती शोधल्याचा जबाब नोंदवला आहे. रक्त साफ करण्यासाठी काय करता येईल इथपासून ते मानवी शरिराची रचना कशी असे इथपर्यंत अनेक गोष्टी आफताबने गुगलवर शोधल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.

हत्या केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगलातील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध ठिकाणी फेकून देत मृतदेहाची विल्हेवाट लावली. यासाठी त्याने मोठा फ्रिज, पॉलिथीन बॅग घरी आणल्या होत्या. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. घरामध्ये मृतदेहाच्या तुकड्यांमुळे दुर्गंधी येऊन म्हणून तो घरात नेहमी आगरबत्ती लावत असे असंही तपासामध्ये समोर आलं आहे.

रोज रात्री २ वाजता तो मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरुन घराबाहेर पडत असे. रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा जंगलाच्या भागात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत असे. कचरा वेचणाऱ्यांना शंका येऊ नये यासाठी तो त्याचे आणखी छोटे तुकडे करत असे. मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसऱ्या ठिकाणी फेकून देत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नाचा तगादा लावल्याने केली हत्या –

दक्षिण द्लिलीचे अतिरिक्त डीसीपी-वन अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, “.या दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर मुंबईत असताना झाली. दोघे मागील तीन वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होते. नोकरीनिमित्त ते दिल्लीत स्थायिक झाले होते. दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावला होता. आरोपी आणि श्रद्धाचं अनेकदा लग्नाच्या मुद्द्यावरुन वाद व्हायचे. मात्र १८ मे रोजी झालेल्या वादादरम्यान आफताबने संतापून गळा आवळून श्रद्धाची हत्या केली.”