रसिका मुळ्ये rasika.mulay@expressindia.com

स्क्रीनसमोर बसून बाराखडी, पाढय़ांची उजळणी करणारी मुले ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी ही दृश्ये गेली दोन वर्षे सरावाची झाली होती. छंदांपासून ते संगणक कोडिंगपर्यंत आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांपर्यंत सर्व काही ऑनलाइन, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुरवणाऱ्या कंपन्यांमुळे शिक्षण पद्धती पूर्णपणे बदलणार असल्याची चर्चा गल्लोगल्ली रंगली. शाळा हवीच कशाला, असे प्रश्नही चघळले गेले. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्यानंतर हे चित्र बदलत असल्याचे दिसते. तंत्रज्ञानाधारित अध्ययन-अध्यापन प्रणाली पुरवणाऱ्या कंपन्यांच्या (एज्युटेक) जागतिक बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातही या कंपन्यांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. ‘वेदांतू’ या आघाडीच्या कंपनीने नुकतेच दुसऱ्यांदा शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकले.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

एज्युटेक क्षेत्रात भारतीय बाजारपेठेचे स्थान काय?

करोना साथीच्या काळात विविध क्षेत्रांतील उलाढाल मंदावलेली असताना शिक्षण क्षेत्रातील गरजांनी व्यावसायिकांना आशेचा किरण दाखवला. खरे तर करोनाच्या साथीपूर्वीपासूनच प्रत्यक्ष अध्यापनाला पर्याय म्हणून तंत्रज्ञानाने बाजारपेठेत शिरकाव केला होता. मात्र, शाळा, महाविद्यालये अशा पारंपरिक अध्ययन पर्यायांना समांतर राहून फोफावलेल्या शिकवण्यांच्या बाजारपेठेला पर्याय म्हणून तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली उपलब्ध करून देण्याकडे व्यावसायिकांचा कल होता. करोनाच्या साथीच्या काळात म्हणजेच २०२० आणि २०२१ या कालावधीत शाळा-महाविद्यालयांतील वर्गाची जागा ऑनलाइन वर्गानी घेतली आणि त्याबरोबर शिक्षणाची बाजारपेठ झपाटय़ाने फोफावली. या बाजारपेठेतील १० टक्के (३२७) स्टार्टअप कंपन्या या भारतातील असून भारताचा क्रमांक जगात दुसरा आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक असून जगातील एकूण कंपन्यांपैकी ४३ टक्के (१,३८५) कंपन्या तेथील आहेत. या क्षेत्राने भारतात गेल्या पाच वर्षांत ७५ हजारांहून अधिकांना नोकरीची संधी दिल्याचे, बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या विविध संस्थांच्या अहवालांत नमूद करण्यात आले आहे.

सद्य:स्थिती काय?

काही महिन्यांपूर्वी ‘युनिकॉर्न स्टेटस’ मिळवणाऱ्या ‘वेदांतू’ या स्टार्टअपने एक हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात या कंपनीने अलीकडेच शेकडो कर्मचाऱ्यांना घरी बसवले. या कंपनीने ६०० कर्मचारी, शिक्षक यांना नोकरीवरून काढून टाकले. सध्या जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे भांडवलाची उपलब्धता आणि एकूण आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे, असे ‘वेदांतू’चे सह-संस्थापक वामसी कृष्णा यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. ‘वेदांतू’प्रमाणेच भारतातील आघाडीच्या ‘बायजू’, ‘लिडो’, ‘अनअ‍ॅकॅडमी’ यांसह इतरही छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांमधील साधारण एक हजार ४०० कर्मचारी, शिक्षकांची नोकरी गेल्या महिन्या-दोन महिन्यांच्या कालावधीत गेली आहे. यातील अनेक कंपन्यांनी त्यांचे स्वरूप बदलण्यास सुरुवात केली आहे.

या कंपन्यांसमोर आव्हाने काय?

भारतात एज्युटेक कंपन्यांनी बाजारपेठेत शिरकाव केला, तेव्हापासूनच या कंपन्यांसमोर आव्हाने आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराबाबत असलेली अढी करोनाकाळात काहीशी कमी झाली. मात्र, इतर अनेक आव्हानांवर सक्षम तोडगा निघाल्याचे दिसत नाही. प्रणालीच्या वापरासाठी मुळात आवश्यक असलेली इंटरनेटची उपलब्धता अनेक भागांत नाही. इतर आवश्यक पायाभूत सुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना त्यांचे संभाव्य ग्राहक (विद्यार्थी-पालक) मोठय़ा प्रमाणावर दिसत असले तरी ते प्रत्यक्षात वापरकर्ते होऊ शकले नाहीत. तंत्रज्ञानकुशल शिक्षकांचे प्रमाणही मर्यादित आहे. भारतातील बहुभाषकता, अभ्यासक्रमांतील वैविध्य, पारंपरिक शिक्षण पद्धतीची वर्षांनुवर्षे घट्ट झालेली चौकट या बाबीही या कंपन्यांसाठी काही प्रमाणात आव्हानात्मक ठरत असल्याचे दिसते.

करोनाची साथ ओसरू लागल्यावर काय झाले?

करोनाची साथ ओसरू लागल्यावर शाळा, महाविद्यालयांमधून प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले. त्यानंतर ऑनलाइन अध्यापन प्रणालींकडे वळलेला मोठा वर्ग त्यापासून पुन्हा दुरावला. शाळांनीही पुन्हा पारंपरिक अध्यापन प्रणाली आणि ऑनलाइन प्रणालीतून समोर आलेल्या काही चांगल्या गोष्टी एकत्रितपणे अमलात आणण्यास सुरुवात केली. करोनाच्या साथीची तीव्रता कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रत्यक्ष अभ्यास साहित्य उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. करोनाकाळात अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यात नेहमीच्या खर्चात भर पाडणाऱ्या इंटरनेट आदी विविध प्रणालींचे शुल्क परवडेनासे झाले.

प्रत्यक्ष अध्यापनाला पर्याय नाही?

गेली दोन वर्षे प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे अध्ययन आणि अध्यापनासाठी तंत्रज्ञानावर आधारित प्रणालींचा वापर वाढला असला तरी प्रत्यक्ष शिक्षकांसमोर बसून शिकण्यासाठी या प्रणाली १०० टक्के पर्याय असू शकत नाहीत, हेदेखील प्रकर्षांने दिसून आले. ऑनलाइन शिक्षणात शिक्षक-विद्यार्थी संवादाचा अभाव असल्याची टीका सर्वत्र झाली. विषय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास, मानसिक आरोग्य या सर्वातील शिक्षकांच्या भूमिकेची उणीव ऑनलाइन शिक्षणात मोठय़ा प्रमाणावर भासू लागली. त्याचबरोबर ऑनलाइन शिक्षण प्रणालीत मूल्यांकनाच्या सक्षम पद्धती नसल्याचेही आक्षेप घेण्यात आले. आता अनेक एज्युटेक कंपन्यांनी प्रत्यक्ष अध्यापन वर्ग सुरू करण्याकडे मोर्चा वळवल्याचे दिसते.