आसिफ बागवान
जगप्रसिद्ध अॅपल कंपनीच्या आयफोन ग्राहकांची भारतातील संख्या गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढत आहे. अॅपल कंपनी भारताकडे आयफोनची मोठी बाजारपेठ म्हणून पाहात असताना भारतासाठीही अॅपल ही मोठी उद्योगसंधी ठरू पाहात आहे. आयफोनचे उत्पादन करणारा प्रमुख देश म्हणून भारताकडे पाहिले जाऊ लागले आहे. सध्या जवळपास ९८ टक्के आयफोनचे उत्पादन करणाऱ्या चीनवरील अवलंबित्व २०२५ पर्यंत संपवून भारताला ‘मॅन्युफॅक्चिरग हब’ बनवण्याचे अॅपलची योजना आहे. हे लक्ष्य कसे पूर्ण होणार, भारतातील आयफोन उत्पादनाची सद्य:स्थिती काय आणि भारताच्या वाढत्या प्रभावाचा चीनला कसा धक्का बसेल, याचा घेतलेला आढावा.
आयफोन उत्पादनाची सद्य:स्थिती काय आहे?
आयफोन बनवणारी अॅपल ही कंपनी अमेरिकास्थित असली तरी जगभरातील ९८ टक्के आयफोन चीनमध्ये बनवून निर्यात केले जातात. गेल्या दहा वर्षांपासून अॅपल आयफोनचे उत्पादन चीनमधून घेत आहे. आयफोन उत्पादनासाठी आवश्यक सुटय़ा, तांत्रिक भागांची सहज उपलब्धता, मुबलक जागा, कुशल मनुष्यबळ, दर्जेदार वाहतूक व्यवस्था आणि अखंडित विद्युतपुरवठा आदी कारणांमुळे आयफोननिर्मितीसाठी अॅपलने चीनची निवड केली. गेल्या वर्षी चीनमध्ये दोन कोटी ३० लाख आयफोनचे उत्पादन करण्यात आले.
आयफोन उत्पादनात भारत सध्या कुठे?
भारतात २०१७ पासून आयफोन उत्पादनाला सुरुवात झाली, परंतु विविध कारणांमुळे अॅपलने नव्या आवृत्तीतील आयफोनऐवजी आयफोनच्या जुन्या आवृत्तीतील फोनच्या निर्मितीसाठी भारताला प्राधान्य दिले. ही परिस्थिती गेल्या काही वर्षांत बदलत चालली आहे. आयफोन उत्पादन करणाऱ्या फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन या कंपन्यांनी भारतात आपले प्रकल्प उभे करावेत, यासाठी गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांनी आकर्षक सवलती आणि सुविधा देऊ केल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे प्रकल्प देशात उभे राहिले आहेत. परिणामी, भारतात आयफोनचे उत्पादन वाढू लागले आहे. गतवर्षी भारतात ३० लाख आयफोनचे उत्पादन घेण्यात आले. तर यावर्षी एप्रिलपासूनच्या पाच महिन्यांत भारतातून एक अब्ज डॉलर किमतीचे आयफोन निर्यात करण्यात आले.
महासत्तांमधील वाद भारताच्या पथ्यावर?
भारतातील आयफोनचे उत्पादन चीनच्या तुलनेत सध्या नगण्य आहे, मात्र पुढील काही वर्षांत भारत आणि चीन या दोन्ही देशांत आयफोन उत्पादनाची तुल्यबळ लढत दिसून येईल, असा अंदाज आहे. याचे प्रमुख कारण अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील संघर्ष आहे. आयफोनचे सेमिकंडक्टर बनवणारी फॉक्सकॉन ही कंपनी तैवानस्थित आहे. तैवान हा आपला अंतर्गत भाग असल्याचा चीनचा दावा असून त्याला अमेरिकेने सातत्याने विरोध केला आहे. या दोन देशांतील संघर्षांचा थेट परिणाम आयफोन उत्पादनावर होण्याची भीती आहे. त्यामुळे आयफोन उत्पादनाचे मोठे केंद्र म्हणून अॅपलने भारताकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये अॅपलने बाजारात आणलेल्या आयफोन १४ श्रेणीतील ‘आयफोन १४’ आणि ‘आयफोन १४ प्लस’ यांचे उत्पादन येत्या महिनाभरात भारतात सुरू होत आहे यामागे हेच कारण आहे. २०२५ पर्यंत चीनमधील आयफोन उत्पादन लक्षणीयरीत्या कमी करण्याचे अॅपलचे नियोजन आहे.
भारत चीनची क्षमता गाठू शकेल?
सध्याच्या परिस्थितीत याचे उत्तर ‘नाही’ असे आहे, मात्र चीनला गाठण्याइतपत पूर्ण क्षमता भारतामध्ये आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयफोन उत्पादनासाठी आवश्यक जागा आणि तंत्रकुशल मनुष्यबळ भारतात मुबलक उपलब्ध आहे. केंद्र सरकारनेही भारताला उत्पादक देश म्हणून अधिकाधिक बळ देण्यासाठी नवनवीन सवलती आणि योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे परदेशी कंपन्या भारतात प्रकल्प राबवण्याकरिता आकर्षित होत आहेत. आयफोनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, येत्या मार्चपर्यंत भारतातून होणारी आयफोनची निर्यात अडीच अब्ज डॉलपर्यंत जाईल, असे भाकीत वर्तवण्यात येत आहे. मात्र, तरीही भारताला चीनइतकी उत्पादन क्षमता गाठण्यासाठी आणखी आठ वर्षे लागतील, असा तज्ज्ञांचा होरा आहे. पण भारताची हळूहळू का होईना होत असलेली प्रगती चीनकरिता नक्कीच चिंतेची बाब ठरणार आहे.
भारतात उत्पादन वाढल्यास आयफोन स्वस्त होतील?
आयफोनचे उत्पादन भारतात होऊ लागल्यास अॅपलच्या निर्मितीखर्चात निश्चितच कपात होणार आहे. आयफोन १४ बद्दल बोलायचे झाल्यास भारतातील उत्पादनामुळे अॅपलचा आयात शुल्काचा खर्च किमान २० टक्क्यांनी कमी होणार आहे. मात्र, याचा परिणाम भारतीय बाजारातील आयफोनच्या किमतीवर होण्याची शक्यता खूपच कमी आहे. आयफोनचे उत्पादन किंवा बांधणी भारतात होत असली तरी त्याचे बहुतांश सुटे भाग चीनमध्ये तयार होत असल्याने कंपनीला त्या भागांची आयात करावीच लागणार आहे. त्यामुळे अॅपलकडून आयफोनची किंमत कमी होण्याची शक्यता तशी कमीच आहे.