मे महिन्याच्या सुरुवातीपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. जेरुसलेम शहरात असणाऱ्या अल् अक्सा मशिदवरून सुरु झालेला वाद दोन्ही देशांमध्ये एयर स्ट्राइक करण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. यामध्ये दोन्ही बाजूकडील सामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पॅलेस्टाइनमध्ये मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे.

सोमवारी इस्त्रायलने केलेल्या एयरस्ट्राइकमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पॅलेस्टाइनने १५० पेक्षा अधिक रॉकेट इस्त्रायलवर डागले. यातल्या बहुतेक रॉकेट इस्त्रायलने हवेत उद्धवस्त केले. याव्यतिरिक्त काही रॉकेट नागरिवस्तीत पडल्याने काही लोकांसह एका भारतीय महिलेचा यात जीव गेला.

इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील धार्मिक संघटना असलेल्या हमासमधील संघर्षाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये इस्त्रायलच्या संरक्षण दलाचा देखील आहे. IDF ने आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ११ मेच्या या व्हिडिओमध्ये इस्त्रायलच्या परिसरात काही रॉकेट येताना दिसत आहेत मात्र नंतर ते हवेतच नष्ट होताना दिसत आहेत. इस्त्रायलने एका यंत्रणेचा वापर करुन ही रॉकेट हवेतच नष्ट केली आहेत. ती यंत्रणा म्हणजे आयर्न डोम.

आयर्न डोमच्या निर्मितीची गरज

इस्त्रायच्या अनेक शहरांवर यापूर्वी देखील गाझा पट्टीवरुन रॉकेट हल्ले करण्यात आले आहेत. २००१ साली इस्त्रायच्या गाझा पट्टीजवळ असलेल्या स्डेरोत शहरात रॉकेट सोडण्यात आलं होतं. त्याला कस्साम असं नाव देण्यात आलं होतं. कस्सामला पॅलेस्टाइमधील कट्टरतावादी असलेल्या हमास या संघटनेने सोडलं होतं. त्यानंतर हे हल्ले सुरूच होते. मात्र २०१२ साली इस्त्रायलची राजधानी असणाऱ्या तेल अविव आणि जेरुसलेमपर्यंत हमासची रॉकेट येवू लागली. या रॉकेट हल्ल्यांमुळे इस्त्रायलच्या सुरक्षेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ लागला. यासाठी इस्त्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने एक खास कवच निर्माण करण्याचे ठरवले. २००७ साली मिसाईल डिफेन्स सिस्टिमच्या निर्मितीला सुरुवात झाली. बचावात्मक हत्यार म्हणून हे वापरण्यात येणार होते. त्याचे काम शत्रूच्या क्षेपणास्त्राला ध्येय गाठण्यापूर्वी निकामी करण्याचे होते.

इस्त्रायच्या राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टम या कंपनीला ही जबाबदारी मिळाली. या प्रकल्पासाठी इस्त्राईलला सुमारे सात हजार कोटी रुपयांची गरज होती. अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी त्यावेळी ही मदत केली. २०१० साली अमेरिकेच्या काँग्रेसने १५०० कोटी रुपये ही इस्त्रायला त्यावेळी दिले. त्यानंतरच्या काळातही अमेरिकेने उर्वरत रकमेची मदत इस्त्रायला केली. ही मदत मिळाली नसती तर इस्त्रायलचा डिफेन्स सिस्टिमचा हा प्रकल्प पूर्ण झाला नसता. या सर्वानंतर २०११ साली गाझा पट्टीवरुन आलेले रॉकेट इस्त्रायलने हवेतच नष्ट केले. पहिल्यांदाच इस्त्रायलने शॉर्ट रेंजच्या रॉकेटला प्रतिउत्तर दिलं होतं. या यंत्रनेचं नावं होतं – आयर्न डोम. इस्त्रायलची सुप्रसिद्ध क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा.

काय आहे आयर्न डोम?

ही एक शॉर्ट रेंज, ग्राउंड-टू-एयर, एअर डिफेन्स सिस्टम आहे ज्यात एक रडार आणि तामिर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. याचा वापर रॉकेट, तोफ (सी-रॅम) तसेच विमान, हेलिकॉप्टरचा प्रतिकार करण्यासाठी केला जातो.

आयर्न डोम २०११ मध्ये कार्यान्वित करण्यात आलं होतं. राफेलने आयर्न डोम हे ९० टक्के तर इतर तज्ञांनी हे ८० टक्के यशस्वी असल्याचे मान्य केलं आहे. “हवाई हल्ल्यांपासून तसेच युद्धाच्या भूमीवर आणि शहरी भागांत देखील यापासून संरक्षण केले जाऊ शकते”, असे राफेलने आपल्या संकेतस्थळावर असे म्हटले आहे.

आयर्न डोममध्ये तीन मुख्य सिस्टीम आहेत. ज्या तैनात करण्यात आलेल्या धोक्यांपासून वाचण्यासाठी जागेवर कवच निर्माण करतात. यामध्ये व्हेपन कंन्ट्रोल सिस्टिम (बीएमसी) आणि मिसाईल फायरिंग युनिट, ट्रॅकिंग रडार आहे. बीएमसी मुळात रडार आणि इंटरसेप्टर रॉकेट दरम्यान संपर्क साधतो. सर्व प्रकारच्या वातावरणामध्ये या यंत्रणेचा वापर करता येतो.

किती आहे किंमत

पूर्ण युनिटची किंमत ५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते. त्यातील एका इंटरसेप्टर तामीर रॉकेटची किंमत ८० हजार डॉलर आहे. याउलट यंत्रणेकरून निकामी करण्यात येणाऱ्या रॉकेटची किंमत ही १००० डॉलरपेक्षाही कमी असते. प्रत्येक आयर्न डोममध्ये दोन तामीर रॉकेट बसवण्यात आली आहेत.