संदीप कदम

स्पॅनिश फुटबॉल संघ रेयाल माद्रिदने यंदाच्या हंगामात यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांनी विक्रमी ३५व्यांदा ‘ला लिगा’ स्पर्धेचे जेतेपद मिळवतानाच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीतही धडक मारली आहे. त्यांच्या या यशात तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमाने मोलाचे योगदान दिले आहे. या हंगामातील त्याच्या कामगिरीनंतर फुटबॉल विश्वातील प्रतिष्ठित ‘बॅलन डी ओर’ पुरस्कारासाठी त्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याची या हंगामातील कामगिरी कशी राहिली, त्याला पुरस्कार मिळवण्यासाठी कोणाचे आव्हान असेल, याबाबत घेतलेला आढावा.

बेन्झिमाची यंदाच्या हंगामातील कामगिरी कशी होती?

‘बॅलन डी ओर’ पुरस्कारासाठी बेन्झिमाच्या नावाची चर्चा होण्याचे प्रमुख कारण त्याची २०२१-२२ हंगामातील चमकदार कामगिरी हे आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये मिळून ४३ सामन्यांत ४३ गोल झळकावले. तसेच त्याने १४ गोलसाहाय्यही केले आहेत. त्याने ला लिगा स्पर्धेमध्ये आतापर्यंत ३० सामन्यांत २६ गोल केले आहेत. चॅम्पियन्स लीगमध्ये त्याने ११ सामन्यांत १५ गोल केले आहेत. रेयाल माद्रिदकडून खेळताना आजवरचा हा त्याचा सर्वोत्तम हंगाम ठरला आहे. बेन्झिमाने चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीत रेयालकडून खेळताना या हंगामात १० गोल झळकावले असून त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या २०१६-१७ च्या हंगामातील कामगिरीची बरोबरी साधली आहे. अजून लीगमधील अंतिम सामना होणार असून यामध्ये रोनाल्डोचा विक्रम मोडीत काढण्याची त्याला संधी आहे.

बेन्झिमाला पुरस्कारासाठी कोणाचे आव्हान ?

‘बॅलन डी ओर’ पुरस्कारासाठी बेन्झिमाला रॉबर्ट लेवांडोवस्की आणि किलियान एम्बापे या आघाडीपटूंचे आव्हान असण्याची शक्यता आहे. लेवांडोवस्कीने बायर्न म्युनिककडून यंदाच्या हंगामात ४५ सामन्यांत ४९ गोल झळकावले आहेत. तर एम्बापेने पॅरिस सेंट-जर्मेनकडून खेळताना ४४ सामन्यांत ३५ गोल मारले आहेत. ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या लिओनेल मेसीला (सात वेळा) या हंगामात पॅरिस सेंट-जर्मेनकडून खेळताना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याने ३२ सामन्यांत केवळ नऊ गोल केले आहेत. तर, पाच वेळा हा पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडकडून यंदा ३८ सामन्यांत २४ गोल झळकावले आहेत. हे दोन्ही तारांकित खेळाडू यावेळी पुरस्काराच्या शर्यतीत असण्याची शक्यता कमीच आहे.

बेन्झिमा रेयाल माद्रिदचा सर्वांत महत्त्वाचा ‘गॅलेक्टिको’ का ?

रेयाल माद्रिद संघातील तारांकित खेळाडूंना ‘गॅलेक्टिको’ असे संबोधले जाते. रेयालच्या संघात लुका मॉड्रिच, व्हिनिसियस यांसारख्या खेळाडूंचा समावेश असला तरी, बेन्झिमा हा त्यांचा सर्वांत महत्त्वाचा ‘गॅलेक्टिको’ ठरला आहे. त्याने आपल्या संघाला ला लिगाचे जेतेपद मिळवून देण्यासह चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरीदेखील गाठून दिली. उपांत्य फेरीमध्ये मँचेस्टर सिटीविरुद्ध त्याने दोन सामन्यांत मिळून तीन गोल करत महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यातही दुसऱ्या टप्प्यातील लढतीत त्याने निर्णायक क्षणी पेनल्टीच्या साहाय्याने गोल झळकावला. बेन्झिमा २००९च्या हंगामापासून रेयालकडून खेळत आहे. रोनाल्डो, गॅरेथ बेल आणि बेन्झिमा या तीन आघाडीपटूंनी रेयाल माद्रिदच्या आजवरच्या यशात मोलाची भूमिका पार पाडली. रोनाल्डो २०१८ साली युव्हेंटस संघात गेल्यानंतर बेन्झिमाचे संघातील महत्त्व खऱ्या अर्थाने वाढले. तसेच बेलकडून अपेक्षेनुसार कामगिरी होत नसल्याने बेन्झिमाने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलली. रोनाल्डोने माद्रिदकडून सर्वाधिक ४५१ गोल मारले आहेत. तर, ३२२ गोलसह बेन्झिमा तिसऱ्या स्थानी आहे.

विश्वचषकात बेन्झिमा फ्रान्सचा तारणहार ठरणार का ?

यंदाच्या वर्षी कतार येथे ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार असून गतविजेत्या फ्रान्सच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. यावेळी बेन्झिमाची लय पाहता तो फ्रान्ससाठी निर्णायक भूमिका पार पाडू शकतो. त्याने आतापर्यंत फ्रान्सकडून खेळताना ९४ सामन्यांत ३६ गोल झळकावले आहेत. यामध्ये सर्वाधिक गोल त्याने २०२१मध्ये केले आहेत. फ्रान्सच्या संघात एम्बापे, ॲन्टोन ग्रीझमान, एन्गोलो कांटे, पाॅल पोग्बा यांसारखे तारांकित खेळाडू असून बेन्झिमामुळे या संघाला अधिक बळकटी मिळणार आहे. मागील विश्वचषक विजेत्या फ्रान्सच्या संघात बेन्झिमाचा समावेश नव्हता. यंदा मात्र तो आपला क्लब माद्रिदप्रमाणेच राष्ट्रीय संघाला मोठे यश मिळवून देण्यास उत्सुक असेल.