scorecardresearch

समजून घ्या : ६० मिमी पाऊस पडला म्हणजे नेमका किती? पाऊस कसा मोजतात?

बुधवार ते शनिवारदरम्यान काही ठिकाणी दिवसभरात ३०० मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी व प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा दिलाय

Mumbai Rain Alert, Rains in Mumbai
पावसाची मोजणी ही पर्जन्यमापकाच्या मदतीने केली जाते. पर्जन्यमापक हे साधारणत: रेकॉर्डिंग आणि नॉन-रेकॉर्डिंग अशा दोन प्रकारांत असतात. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य : एपीवरुन साभार)

मुंबई महानगर क्षेत्रासहीत कोकणामधील सर्व जिल्ह्यांमध्ये बुधवार ते शनिवार या चार दिवसांमध्ये अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने राज्या सरकारला दिल्यानंतर बुधवारी या अतिवृष्टीची झलक पहायला मिळाली. मुंबईमध्ये बुधवारी पहाटेपासूनच जोरादर पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये मंगळवारी सकाळी साडे आठ ते बुधवारी सकाळी साडेआठ या कालावधीमध्ये ७७.४ मिलिमीटर पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेमध्ये झालीय. तर सांताक्रुज वेधशाळेने याच कालावधीमध्ये ५९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये मान्सूनने दमदार आगमन केलं असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईमध्ये आणखीन पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी दिवसभरात ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी व प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मात्र ३०० मिलिमीटर म्हणजे किती किंवा आता पावसाळ्यात सातत्याने बातम्यांमध्ये ऐकायला, वाचायला मिळणारा अमुक इतका मिमी पाऊस पडला म्हणजे किती पाऊस पडला?, पाऊस मोजतात कसा? त्याचं काय तंत्र आहे यासंदर्भात अनेकांना प्रश्न पडतात. याच प्रश्नांची उत्तरं आपण मराठी विज्ञान परिषदचे डॉ. दि. मा. मोरे यांनी दिलेल्या माहितीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

पाऊस किती प्रकारचा?

आपल्या देशातील सर्व भागांत साधारणत: वर्षांतील पावसाळ्याच्या चार-साडेचार महिने पाऊस पडतो. जून ते ऑक्टोबर हा पावसाचा कालावधी असतो. उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगररांगावर पाऊस हिमवर्षांवच्या स्वरूपातदेखील पडतो. पाऊस हा पाण्याचा उगम असल्यामुळे पाण्याच्या मोजणीचा विचार करीत असताना पावसाची मोजणीविषयी समजून घेणेही आवश्यक आहे. पावसाच्या मोजणीचे एकक हे मेट्रिक सिस्टीममध्ये मिलिमीटर तर ब्रिटिश सिस्टीममध्ये इंच (एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर) आहे.  बर्फाच्या स्वरूपातील पावसाची मोजणीदेखील याच एककात केली जाते.

नक्की पाहा >> Kurla ची देशभरात चर्चा; पावसाबरोबर बाबू भैय्या, मोदी, रेणू शहाणे, जॉन लिव्हरच्या Memes चाही पडला पाऊस

दोन मुख्य पद्धती…

पावसाची मोजणी ही पर्जन्यमापकाच्या मदतीने केली जाते. पर्जन्यमापक हे साधारणत: रेकॉर्डिंग आणि नॉन-रेकॉर्डिंग अशा दोन प्रकारांत असतात.

रेकॉर्डिंग पर्जन्यमापक – 

हे स्वयंचलित असून; त्यामध्ये घडय़ाळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्र (ग्राफ) आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल, इत्यादींचा समावेश असतो. पडलेला पाऊस आलेखपत्रावर आपोआप वाचता येतो. या पर्जन्यमापकावर ठरावीक कालावधीत पडलेला पाऊस, तसेच पावसाची तीव्रतासुद्धा (मिलिमीटर/तास) मोजता येते.  या पर्जन्यमापकाद्वारे पंधरवडय़ाचा एकूण पाऊसही मोजता येतो; म्हणूनच डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात याचा वापर सोयीचा होतो. या उपकरणाच्या  वापरासाठी माणसाची गरज नसते.

नक्की वाचा >> समजून घ्या : देशामधील करोना संसर्गाचा वेग एवढ्या झपाट्याने का कमी होतोय?

नॉन-रेकॉर्डिंग पर्जन्यमापक –

हे फार सोपे आणि साधे उपकरण आहे. भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ या नावाने ओळखले जाते. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्केबसवलेले असते. दररोज सकाळी आठ वाजता पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलिमीटर वा इंचामध्ये मोजला जातो. या पर्जन्यमापकाद्वारे मागील २४ तासांतील पडलेल्या पावसाची उंची मोजता येते. पाऊस जमा करणारी बाटली साधारणत: १०० मिमी व्यासाची असते आणि ती १०० ते १२५ मिमी पाऊस जमा करते. मोठय़ा पावसाच्या कालावधीत दिवसातून तीन -चार वेळा मोजणी करावी लागते.

पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक ठेवताना, त्या ठिकाणापासून  किमान ३० मीटरच्या त्रिज्येमध्ये झाड, इमारत इ. अडथळे नसावेत. सपाट प्रदेशामध्ये साधारणत: १०० चौरस किलोमीटर क्षेत्राच्या परिसरात किमान एक पर्जन्यमापक असण्याची गरज आहे. हिमवर्षांव मोजण्यासाठी नॉन रेकॉìडग स्नो गेजचा वापर केला जातो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2021 at 13:52 IST