देशात सध्या ओमायक्रॉनचं संकट असून यामुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण आहे. डेल्टापेक्षाही जास्त वेगाने संक्रमित करणाऱ्या ओमायक्रॉनमुळे अनेक राज्यांनी निर्बंध जाहीर करत नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. दुसरीकडे केंद्रानेही ओमायक्रॉनचे रुग्ण वाढणाऱ्या आणि लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या राज्यांमध्ये केंद्रीय पथकं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान देशातील प्रसिद्ध डॉक्टर आणि मेदांता रुग्णालयाचे संस्थापक डॉक्टर नरेश त्रेहान यांनी ओमायक्रॉनसंबंधी महत्वाची माहिती दिली आहे.

लोकसत्ता विश्लेषण : ओमायक्रॉनची लक्षणे काय आहेत?; जाणून घ्या…

ओमायक्रॉनची लागण झालेली व्यक्ती १८ ते १० लोकांना संक्रमित करु शकते असं नरेश त्रेहान यांनी सांगितलं आहे. यागामागील कारण सांगताना त्यांनी ओमायक्रॉनची आर नॉट व्हॅल्यू (R-Naught) इतर व्हेरियंटच्या तुलनेत खूप जास्त असल्याने तो सुपर स्प्रेडर असल्याचं सांगितलं आहे.

नरेश त्रेहान यांनी सविस्तर माहिती देताना सांगितलं की, व्हायरसच्या व्हेरियंटसंबंधी ‘आर नॉट फॅक्टर’ हा एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याच्यामुळे अजून किती लोकांना संसर्ग होऊ शकतो हे सांगतो.

लोकसत्ता विश्लेषण: ओमायक्रॉनची लागण झालीये कसं ओळखायचं?; ‘हे’ आहे एक सामान्य लक्षण

सर्वात प्रथम अल्फा व्हेरियंट आला होता. त्याचा आर नॉट फॅक्टर २.५ होता. याचा अर्थ संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून फैलाव होऊन अजून २ ते ३ लोक संक्रमित होऊ शकतात. दुसरा व्हेरियंट डेल्टा होता. यामध्ये दिवसाला किमान चार लाख प्रकरणं समोर येत होती. याचा आर नॉट फॅक्टर ६.५ होता. म्हणजेच एका व्यक्तीपासून ६ ते ७ जण संक्रमित होऊ शकतात.

आता जो नवा व्हेरियंट ओमायक्रॉन आला आहे त्याने सर्वांची चिंता वाढवण्याचं कारण म्हणजे त्याचा आर नॉट फॅक्टर तीन पटीने जास्त आहे. याचा अर्थ १८ ते २० टक्के,..म्हणजे ओमायक्रॉनची लागण झालेली एक व्यक्ती जवळपास २० लोकांना संक्रमित करु शकतो. म्हणूनच याला सुपर स्प्रेडर म्हटलं आहे.

सर्वात मोठी आव्हानं

नरेश त्रेहान यांच्या माहितीनुसार त्यांच्यासमोर दोन मोठी आव्हानं आहेत. सर्वात पहिलं म्हणजे लहान मुलांना अजूनपर्यंत लस देण्यात आलेली नाही. दुसरं म्हणजे आतापर्यंत ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालेलं नाही. तिसरं म्हणजे लस घेतलेल्या लोकांमधील प्रतिकारक्षमता आता हळूहळू कमी होऊ लागली आहे.

बूस्टर डोस

या सर्व कारणांमुळे बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे. पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना सर्वात प्रथम बूस्टर डोस देणं गरजेचं आहे, कारण त्यांनाच करोनासोबतच्या या युद्धाची तयारी करायची आहे. त्यामुळे लस उपलब्ध झाल्यानंतर त्यांना प्राथमिकता द्यायला हवी.

जिनोम सिक्वेंसिंग रोज कसं करणार?

नरेश त्रेहान यांनी जिनोम सिक्वेंसिंग करणं मोठं आव्हान असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येत व्यक्ती जो विदेशातून आला आहे, त्यांच्या नमुन्याचं जिनोम सिक्वेंसिंग करणं गरजेचं आहे. पण जिनोम सिक्वेंसिंगसाठी एक आठवड्याचा वेळ लागतो, त्यामुळे यासाठी नवं तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. तसंच हॉटस्पॉट्सला सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे.

नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये करोनाचे नियम विसरु नका

नरेश त्रेहान यांनी यावेळी लस घेतली म्हणजे आपण सुरक्षित आहोत असा समज करुन घेऊ नये अशी चेतावणी दिली आहे. नवीन वर्ष असल्याने अनेक ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात असेल, त्यावेळी करोनाच्या नियमांचं उल्लंघन होता कामा नये. ज्याप्रकारे आपण करोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधातील लढाऊ लढलो त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेपासूनही सतर्क राहावं लागेल असं त्यांनी सांगितलं आहे.