वैशाली चिटणीस
‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर्स’ चळवळीला पाठिंबा देत रस्त्यावर उतरणाऱ्या अमेरिकनांच्या देशात आजवर केवळ भारताचाच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक पैलू मानल्या जाणाऱ्या जातिभेदाच्या राजकारणाचे पडसादही उमटू लागले असून त्याची मुळे गूगलसारख्या बडय़ा बहुराष्ट्रीय कंपनीत आधीच पसरलेली असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. आपल्याकडे देशातले राजकारण, समाजकारण कमंडलूकडून मंडलकडे सरकण्याची चिन्हे दिसत असतानाच येथून बाहेर पडून जगाचा ‘मेल्टिंग पॉट’ समजल्या जाणाऱ्या अमेरिकेसारख्या देशात काम करण्यासाठी जातानाही भारतीय माणसे जातीचे जन्मजात ओझे फेकून देऊ शकत नाहीत, असेच थेनमोळी सौंदरराजन आणि गूगल न्यूज यांच्यातील वादाच्या प्रकरणावरून दिसून येते आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर आता त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

थेनमोळी सौंदरराजन कोण आहेत ?

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

थेनमोळी सौंदरराजन या ‘इक्वॉलिटी लॅब्ज’ या दलितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अमेरिकी संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. ‘जातिभेद आणि समानता’ या विषयावर त्यांनी मायक्रोसॉफ्ट, सेल्फोर्स, एअर बीएनबी, नेटफ्लिक्स, अ‍ॅडोब अशा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर भाषणे केली आहेत. जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय अमेरिकी व्यक्तीला एका गोऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने मानेवर गुडघा रोवून ठार मारल्यानंतर अमेरिकेत उसळलेल्या वर्णद्वेषविरोधी वातावरणानिर्मितीचा पुढचा भाग म्हणून त्यांना या तंत्रज्ञान कंपन्यांकडून भाषणांसाठीची आमंत्रणे येण्याचे प्रमाण वाढत गेले. एप्रिलमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘दलित इतिहास महिन्या’च्या निमित्ताने थेनमोळी यांना गूगल न्यूजच्या कर्मचाऱ्यांसमोर ‘जातिभेद आणि समानता’ या विषयावर भाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पण त्यांच्या या कार्यक्रमाच्या आधीच गूगलमधील काही कर्मचाऱ्यांनी थेनमोळी तसेच त्यांची इक्वॉलिटी लॅब्ज संस्था हिंदुविरोधी आहे असा प्रचार करायला सुरुवात केली. गूगलमधील वरिष्ठांना तसे मेल पाठवणे, गूगलच्या इंट्रानेटवर तसे दस्तावेज डकवणे आणि आपल्या मेल यादीमधील हजारो कर्मचाऱ्यांना मेल पाठवून थेनमोळी यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करणे असे प्रकार केले गेले. त्याचा परिणाम असा झाला की गूगलने थेनमोळी यांचे भाषणच रद्द केले. 

गूगलच्या तनुजा गुप्ता यांनी राजीनामा का दिला?

तनुजा गुप्ता या गूगल न्यूजच्या वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, गूगलमधील गूगलर्स फॉर एण्डिंग फोर्स्ड आर्बिट्रेशन या उपक्रमाच्या संस्थापक आणि गूगल वॉकआऊटच्या समायोजक आहेत. त्यांनीच थेनमोळी सौंदरराजन यांना भाषणासाठी आमंत्रित केले होते. गूगल न्यूजने थेनमोळी यांचे भाषण रद्द केल्यावर तनुजा गुप्ता यांनी जातीय समानतेला समर्थन देण्यासाठी  ४०० गूगलर्सना उद्युक्त केले. पण त्यांच्या सहकाऱ्यांचे मेल हॅक केले गेले आणि त्यांना धमकावले गेले. या सगळय़ानंतर गूगलच्या व्यवस्थापनाने तनुजा गुप्ता यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. सहकाऱ्यांचा निरोप घेताना लिहिलेल्या मेलमध्ये त्या म्हणतात, ‘ही घटना हे एखाद-दुसरे उदाहरण नाही. तो पॅटर्न आहे. याआधीही गूगलमध्ये जातिभेदाचा अनुभव आल्याची तक्रार चार जणींनी माझ्याकडे केली आहे.’

यासंदर्भात गूगलची भूमिका काय आहे?

आपली भूमिका स्पष्ट करताना गूगलच्या प्रवक्त्या शॅनन न्यूबेरी लिहितात, ‘आमच्या कंपनीत जातिभेदाला जराही थारा दिला जात नाही. भेदभावाविरोधात गूगलचे धोरण अत्यंत स्पष्ट  आहे.’ मात्र असे असले तरी तनुजा यांचा राजीनामा आणि त्यांनी मांडलेल्या या भूमिकेनंतर इक्वॉलिटी लॅब्जने गूगलला अंतर्गत जातिभेदाविरोधात पावले उचलण्याचे आणि पारदर्शक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. तनुजा म्हणतात, ‘गूगलने जे केले ते तसे कोणतीही संस्था सहसा करत नाही. कट्टरतावादी याच पद्धतीने वागून नागरी हक्कांच्या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष होईल अशी वातावरणनिर्मिती करतात.’ दरम्यान, तनुजा गुप्ता यांच्या राजीनाम्यामुळे आणि त्यांनी मांडलेल्या थेट भूमिकेमुळे अमेरिकेत अनेकांनी गूगलविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

थेनमोळी यांची इक्वॉलिटी लॅब्ज काय आहे?

थेनमोळी सौंदरराजन यांची इक्वॉलिटी लॅब्ज ही दलितांच्या नागरी हक्कांसाठी कॅलिफोर्नियातील ओकलँड येथे काम करणारी संस्था वांशिक वर्णभेद, लिंग-आधारित हिंसा, इस्लामोफोबिया, गोऱ्यांचा वर्चस्ववाद, धार्मिक असहिष्णुता या सगळय़ा गोष्टींच्या विरोधात आवाज उठवते. गेल्या दोन दशकांच्या काळात भारतातून अमेरिकेत जाऊन आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे.   भारतातील जातिभेदाचे, त्यावरून होणाऱ्या अन्याय- अत्याचाराचे प्रतिबिंब या कंपन्यांच्या कामकाजात अनुभवास येते असे या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक भारतीयांचे मत आहे. या कंपन्यांनी आपल्या धोरणामध्ये जातिभेदाला विरोध करणारी भूमिका घ्यावी यावर थेनमोळी यांच्या इक्वॉलिटी लॅब्जचा भर आहे. समाजमाध्यम कंपन्यांनी तिथून प्रसारित होणाऱ्या द्वेषोक्तीमध्ये जातिभेदाचा समावेश असू नये यासाठी सजग राहावे यासाठी इक्वॉलिटी लॅब्ज काम करते. संस्थेने तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या दलितांचे एक संपर्कजाळे विकसित केले आहे. जात ही पूर्णपणे भारतीय संकल्पना असल्यामुळे अमेरिकी कंपन्यांमध्ये ती समजावून देणे आणि त्यांच्या धोरणात त्या अनुषंगाने विचार करायला उद्युक्त करणे हे काम जिकिरीचे आहे.

अमेरिकेतही जातिभेद आहे का?

इक्वॉलिटी लॅब्जने २०१६ मध्ये दक्षिण आशियाई अमेरिकी लोकांचे एक सर्वेक्षण केले. अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना जातिभेदाला तोंड द्यावे लागते असे त्यात आढळून आले. त्या पाहणीत सहभागी झालेल्या २५ टक्के दलितांनी सांगितले, की त्यांना जातीवरून शारीरिक तसेच शाब्दिक छळाला सामोरे जावे लागले आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्यांमध्ये दर तीनमागे एकाला  जातिभेदाचा सामना करावा लागला आहे. दर तीनपैकी दोन दलितांना कामाच्या ठिकाणी दलित असल्यामुळे वाईट वागणूक मिळते, असे त्यांचे म्हणणे होते. पाहणीत सहभागी झालेल्या ६० टक्के दलितांना जातीवर आधारित टिप्पण्या किंवा विनोदांना सामोरे जावे लागले. आपल्यामधल्याच गोऱ्या माणसाने एका कृष्णवर्णीयाला चिरडून मारले हे पाहिल्यावर त्याविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या, लैंगिक छळाविरोधात ‘मी टू’सारख्या चळवळीची सुरुवात करणाऱ्या अमेरिकेत जाऊनही काही भारतीय माणसे आपल्या मनाची कवाडे उघडत नाहीत असेच हे चित्र आहे.