विनायक परब
अँथ्रोपोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, लखनऊ येथील बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओ सायन्सेसमधील काही संशोधक आणि बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज मधील पुरातत्त्वज्ञ डॉ. वसंत शिंदे यांनी भारतीयांच्या वांशिक शुद्धतेच्या शोधासाठी अद्ययावत डीएनए चाचणी करणाऱ्या यंत्राची केलेली मागणी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने मान्य केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात नव्या वादाला तोंड फुटले. भारतातील सुमारे १०० हून अधिक विख्यात संशोधक, इतिहासतज्ज्ञ, वैज्ञानिक आदींनी सरकारला पत्र लिहून या वांशिक शुद्धता प्रकल्पास तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर तात्काळ सांस्कृतिक मंत्रालयानेही हा प्रकल्प वांशिक शुद्धतेचा नसल्याचा खुलासा ट्विटरद्वारे केला. मुळात काय आहे हा प्रकल्प आणि वाद का झाला?

ज्या राखीगढी प्रकल्पावरून हा वाद झाला, तो प्रकल्प आहे तरी काय?

भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे.  इ. स. पूर्व २५०० हा हडप्पा संस्कृतीचा परिपक्व कालखंड मानला जातो. हडप्पाचा कालखंड हा भारतातील पहिल्या नागरिकरणाचा कालखंड होता. फाळणीनंतर हडप्पा, मोहेंजोदारो ही प्राचीन शहरे पाकिस्तानात गेली. त्यानंतर भारतामध्ये या हडप्पाकालीन प्राचीन संस्कृती स्थळांचा शोध सुरू झाला. त्यामध्ये राखीगढीसारखी काही महत्त्वाची प्राचीन शहरे उत्खननामध्ये उघडकीस आली.

राखीगढीवरच लक्ष का केंद्रित झाले?

राखीगढी हे हडप्पाकालीन मोठे शहर होते. शिवाय याच ठिकाणी दोन मानवी सांगाडे सापडले, ज्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. भारतावरील आर्यांचे अतिक्रमण/ आक्रमण असे मानणारे एक गृहितक प्रसिद्ध आहे. हडप्पाकालीन शहरे तत्कालीन प्रगत आर्यांनी वसवली असेही एक गृहितक आहे. तर बाहेरून आलेल्या आर्यांनी हडप्पा संस्कृती संपवली असेही एक बहुतांश सर्वमान्य असे गृहितक आहे. आर्य हे पर्शिया- इराण आदी पश्चिमेकडील प्रांतांतून आले असे सांगितले जाते. राखीगढीमधील सांगाड्यांच्या डीएनए संकलनाची व पृथक्करणाची प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली. त्यातील महिलेच्या डीएनएवरून असे लक्षात आले की, विद्यमान भारतीय वंशाशी तिचा डीएनए हा मिळता-जुळता आहे. त्यावरून हडप्पा संस्कृती ही अस्सल भारतीयांनीच वसविलेली; बाहेरून आलेल्या आर्यांनी नव्हे, असा निष्कर्ष काढण्यात आला.

पण मग आता अद्ययावत डीएनए यंत्राची मागणी कशासाठी?

केवळ एकाच डीएनए चाचणीवरून शास्त्रीय निष्कर्ष काढता येत नाहीत तर त्यासाठी अधिक संख्येने शास्त्रीय माहिती उपलब्ध असावी लागते. त्यासाठी डीएनए चाचणीचे अद्ययावत यंत्र असणे ही गरज आहे.

मग त्यावरून वाद कशासाठी?

भारतीय जनुकाची वांशिक शुद्धता तपासण्यासाठी हे यंत्र येत आहे, त्यासाठी भारत सरकारने निधीची तरतूद केली आहे, असे वृ्त प्रसिद्ध झाल्यामुळेच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आणि त्यास संशोधक, इतिहासतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी विरोध केला. कारण आजवर जिथे-जिथे जगभरात वांशिक शुद्धतेचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. त्या-त्या वेळेस अनेक मोठ्या वाईट, दुःख घटनांना सामोरे जावे लागले, असे इतिहास सांगतो. हिटलरने घेतलेला आर्य मूळाचा शोध दुसऱ्या महायुद्धाच्या दाहकतेस कारण ठरला. सध्याचा कालखंड हा टोकाच्या राष्ट्रवादाचा आहे. त्यामुळे भारतीयांची वांशिक शुद्धता असा विषय पुढे आला तर ते समाजहिताचे नसेल, असा इशाराच समाजातील या विचारवंतांनी दिला. ज्या-ज्या ठिकाणी वांशिकतेने डोके वर काढले आहे, त्या ठिकाणचा समाजातील समतोल ढळला आहे. हे पाहता असा प्रकल्प योग्य नाही, अशी भूमिका विचारवंतांनी घेतली.  समाजातील विचारवंतांकडून हा तीव्र विरोध स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानेही तात्काळ ट्वीट करून या प्रकल्पाचा संबंध वांशिक शुद्धतेशी नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे प्रकल्प सुरूच राहील मात्र येणाऱ्या डीएनए यंत्रणेचा वापर वांशिक शुद्धता तपासण्यासाठी होणार नाही. किंबहुना भारतीय समाज तयार होत असताना गेल्या सुमारे साडेचार हजार वर्षांत त्यात जनुकीय बदल कसे होत गेले, याचा शोध घेणे शक्य होईल. शिवाय हडप्पाकालीन भारतीयांच्या अनेक बाबींवर शास्त्रीयदृष्ट्या प्रकाश टाकणे शक्य होईल, असे आता सांगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vinayak.parab@expressindia.com