राखी चव्हाण
उन्हाळ्यात विदर्भ तापतो, तापमानाचे नवनवे विक्रम विदर्भात नोंदवले जातात, पण यावर्षी मात्र गेल्या १०० वर्षांतील तापमानाचे सगळेच विक्रम मोडीत निघाले आहेत. ४६-४७ अंश सेल्सिअस तापमानाची सवय विदर्भाला आहे, पण एवढा तापमानाचा पारा मे महिन्यात नोंदवला जातो. यावेळी मात्र तो एप्रिलमध्ये नोंदवला गेला आहे. अकोला, चंद्रपूर, ब्रम्हपुरी ही शहरे कायम उच्च तापमानाच्या रडारवर राहिली आहेत. आता हवामान खात्याने पुन्हा ३० एप्रिल ते २ मे दरम्यान तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे विदर्भातील ही शहरे तापमानाचा आणखी कोणता नवा विक्रम स्थापित करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

विदर्भात उष्णतेच्या लाटांची स्थिती काय?

गेल्या दहा वर्षांत मार्च महिन्यात कधीच उष्णतेची लाट आली नाही. एप्रिल महिन्यात एक किंवा दोन उष्णतेच्या लाटा आल्या आहेत. एप्रिल (अखेरीस) आणि मे महिन्यात उष्णतेच्या कमाल तीन लाटा आल्या आहेत. यावर्षी मात्र तापमानासह उष्णतेच्या लाटांचाही उच्चांक तोडला जाईल, अशी स्थिती आहे. यावेळी मार्चमध्ये एक तर उन्हाळ्यात उष्णतेच्या दोन ते तीन लाटा आल्या. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने ३० एप्रिल ते २ मे पर्यंत तीव्र उष्ण लहरीचा धोका वर्तवला आहे. त्याची सुरुवात झाली असून बुधवारपासून तापमानाचा पारा वाढत आहे.

विषववृत्त आणि तापमानवाढीचा संबंध काय?

पृथ्वीतलावरील सर्वांत जास्त तापमान प्रत्यक्षात विषुववृत्तावर नसून ते विषुववृत्तापासून वीस अंशांच्या आसपास असलेल्या शहरांत पाहावयास मिळते. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, अमरावती, ब्रह्मपुरी, अकोला, राजस्थानातील चुरू, पाकिस्तानातील अबोटाबाद किवा आफ्रिकेतील सेनेगलमधील काही ठिकाणे विषुववृत्तावर नसूनसुद्धा या ठिकाणी अनेकदा जगातील सर्वांत जास्त तापमान नोंदवले जाते.

या हवामान विषयक घटनेचे कारण कोणते ?

विषुववृत्ताजवळ वर्षभर ढगांचे आच्छादन असलेले पहावयास मिळते. त्यामुळे प्रत्यक्ष विषुववृत्तावर जास्त तापमान नोंदवले जात नाही. ढगांच्या आच्छादनामुळे सूर्यकिरणे पूर्णतः जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ढगांचे वरचे भाग हे बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले असतात त्यामुळे सूर्यकिरणांचे बऱ्याच प्रमाणात परावर्तन होते. विषुववृत्तापासून जसजसे दूर जावे तसा कोरडेपणा वाढत गेलेला असतो. हा कोरडेपणा २० ते २५ अंशांत सर्वांत जास्त मिळतो. त्यामुळे २० ते २५ अंशांत असलेल्या शहरांत कोरडेपणा जास्त असल्यामुळे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत सरळ पोहोचतात आणि तापमान वाढ होते.

चंद्रपूर, वर्धा, ब्रह्मपुरी ही शहरे का तापतात?

एखादे ठिकाण समुद्रापासून जेवढ्या लांब अंतरावर असेल, तेवढे त्या ठिकाणचे हवामान विषम असते. म्हणजेच जी ठिकाणे एखाद्या खंडाच्या मध्यभागात असतील तर ती उन्हाळ्यात जास्त तापतील आणि हिवाळ्यात जास्त थंड होतील. याच गुणाधर्माला ‘कॉन्टिनेन्टेलीटी’ असे म्हणतात. चंद्रपूर, वर्धा, ब्रह्मपुरी ही सर्व ठिकाणे समुद्रापासून अत्यंत लांब अंतरावर असल्यामुळे ती उन्हाळ्यात अत्यंत जास्त तापलेली असतात. या तुलनेत मुंबई मात्र चंद्रपूरच्या अक्षवृत्तात वसलेले असूनही कमी तापलेले असते.

जमीन आणि पाण्याच्या गुणधर्माचा काय परिणाम होतो?

जमीन आणि पाणी यांचे तापण्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते याउलट समुद्र उशिरा तापतो आणि उशिरा थंड होतो. दुपारी बारा ते दोन वाजता जेव्हा सूर्य शिरस्थानी असतो तेव्हा चंद्रपूर प्रचंड तापलेले असते तेव्हा मुंबई समुद्रावर असल्यामुळे ती हळुवारपणे तापते, ती सौम्य असते.

तापमानवाढीची मानवनिर्मित कारणे कोणती?

तापमानवाढीची काही कारणे मानवनिर्मित असून काही कारणे जमिनीसोबत जोडलेली आहेत. एखाद्या ठिकाणच्या तापमानावर त्या ठिकाणी असलेली कारखानदारी, नागरीकरण, जमिनीचा स्वभाव यांचा अतिरिक्त प्रभाव पडतो. चंद्रपूर हे कारखानदारीच्या प्रभावाखाली आहे. ब्रह्मपुरी शहर हे ‘लेटेराईट’ दगडावर वसलेले आहे आणि हे संपूर्ण दगड उघड्यावर आहेत, त्यामुळे ते जास्त तापतात. अशी वेगवेगळी कारणे स्थानिक प्रभाव पाडू शकतात. याच कारणामुळे विदर्भातील शहरे जगातील सर्वांत जास्त तापमानाची केंद्रे बनली आहेत.

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained reasons of extreme heat in vidarbha print exp 0522 sgy
First published on: 01-05-2022 at 10:52 IST