scorecardresearch

विश्लेषण : हिमनगांच्या प्रदेशांत उष्णतेच्या लाटांचा धोका

यंदाच्या उन्हाळ्यात पुढील काही दिवसांत पुन्हा या भागात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

Explained Risk of heat waves in glacial regions
(फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

पावलस मुगुटमल

जगभरात शीतकटीबंधीय, बर्फाच्छादित प्रदेशांतही गेल्या काही वर्षांत उष्णतेच्या लाटा येत आहेत. हळूहळू त्यांचे स्वरूप अधिकाधिक तीव्र होत आहे. त्यामुळे हिमनग, हिमनद्या वितळण्याच्या प्रमाणात वाढ होत असून परिणामी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे. जगभरातील अनेक शास्त्रज्ञ, अभ्यासक यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. त्याबाबतचा इशारा वेळोवेळी त्या-त्या देशातील सरकारला देत आहेत. भारतातही दोनच आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीर आणि हिमालयाच्या क्षेत्रात उष्णतेची लाट आली होती. यंदाच्या उन्हाळ्यात पुढील काही दिवसांत पुन्हा या भागात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

बर्फ किती वितळला?

लंडनमधील एडिनबर्ग विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी कॉलेजमधील संशोधकांनी उपग्रहांच्या माध्यमातून मिळालेल्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या छायाचित्रांचा अभ्यास केला. त्यातून गेल्या काही वर्षांतील बर्फ वितळण्यासंदर्भातील वस्तुस्थिती समोर आली आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये पृथ्वीवरील २८ लाख कोटी टन बर्फ वितळल्याचे अभ्यासातून निदर्शनास आले आहे. उत्तर गोलार्धात बर्फाच्या वितळण्याचे प्रमाण अधिक आहे. १९९० नंतर बर्फ वितळण्याचे प्रमाण ५७ टक्क्यांहून अधिक असून ते आता सातत्याने वाढतेच आहे. बर्फ वेगात वितळत असताना सूर्यकिरणे पृथ्वीपासून परावर्तित होण्याची क्षमता कमी होत आहे. लॅटिन अमेरिका, कॅनडा, आर्क्टिक आणि अंटार्क्टिका तसेच आशियात वातावरण बदलामुळे मोठे नुकसान होत आहे, असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. त्यात आता जागतिक तापमानवाढीमुळे आणखी भर पडली आहे. शिवाय, तापमानवाढीच्या घटकांत हरितगृह वायूंचाही मोठा परिणाम पृथ्वीवर होतो आहे. याच परिणामांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील संशोधन केले. हे संशोधन क्रियोफेअर डिस्कशन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

हरितगृह वायू म्हणजे काय?

पर्यावरणावर मोठा परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये हरितगृह वायू (ग्रीनहाऊस गॅसेस) हा घटक महत्त्वाचा आहे. हरितगृह वायूंची संख्या सहा असून, त्यातील कार्बन आणि मिथेन यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम मोठा आहे. उरलेले चार वायू म्हणजेच बाष्प, नायट्रस ऑक्साइड, ओझोन आणि सीएफसी (कार्बन फ्लोरो कार्बन) हे परिसरातील उष्णता शोषण करून सभोवतालचे तापमान वाढविण्याचे काम करतात. नायट्रस ऑक्साइड हा उष्णता शोषण करून चांगल्या पर्यावरणास हानी पोहोचविणारा महत्त्वाचा हरितगृह वायू आहे. रासायनिक शेतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर नत्र खते वापरणे हे या वायूच्या निर्मितीस आमंत्रणच आहे.

वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा वातावरणातील या वायुचे प्रमाण वाढते. अनियंत्रित विकास असलेल्या भागांत हा वायू मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. हरितगृह वायू त्यातही कार्बन डायॉक्साइड नसता तर पृथ्वीचा पृष्ठभाग किमान ३३ अंश सेल्सिअसने थंड असता, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणजे थंडीचे वातावरण असते. मात्र हरितगृह वाय हा देखील निसर्गचक्राचाच एक महत्त्वाचा भाग असल्याने पृथ्वीचे तापमान सुरुवातीच्या काळात १५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले. त्यामुळे सजवीसृष्टी बहरणे शक्य झाले. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपण कार्बनचे उत्सर्जन एवढ्या प्रमाणावर करत आहोत की परिणामी ते प्रमाणाबाहेर वाढल्याने पृथ्वीवरील तापमानात वाढ झाली आहे.

ध्रुवावरील बर्फ समुद्राची पातळी किती वाढली?

हवामानातील बदलांमुळे पृथ्वीचे तापमान दुप्पट वेगाने वाढते आहे. त्यातील सर्वांत गंभीर दुष्परिणामांपैकी एक म्हणजे समुद्राच्या पातळीतील वाढ. बांगलादेश ते अमेरिकेपर्यंत सर्वच राष्ट्रांना त्याचा धोका जाणवतो आहे. इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेच्या अहवालानुसार समुद्राची जगभरातील सरासरी पातळी आता दरवर्षी सुमारे ०.१५ इंचाने वाढते आहे. या शतकाच्या अखेरीस ती आणखी १५ ते ३० इंचाने वाढेल आणि त्यापुढेही असेच वातावरण राहिल्यास ती वाढतच राहील. नॅशनल ओशियनिक ॲण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमेरिकेच्या किनारपट्टीवर २०५० पर्यंत समुद्राची पातळी एक फूट, तर २१०० पर्यंत ती दोन फुटांनी वाढण्याची शक्यता आहे.

ही जगासाठी धोक्याची घंटा आहे का?

वाढणारे तापमान, हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण, प्रदूषण आदींमुळे वातावरण बिघडत चालले आहे. पर्यावरणावर त्याचे घातक परिणाम होत आहेत, मात्र बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढण्याचा धोका आहेच. स्थिती अशीच राहिल्यास समुद्राची पातळी काही प्रमाणात वाढतच राहणार आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आधीच जगभरातील ११ कोटी लोक उच्च भरतीमुळे पूर येण्याची शक्यता असलेल्या प्रदेशात राहतात. पूर्व आणि आखाती प्रदेशांमध्ये हजारो घरांत वारंवार पूरस्थिती निर्माण होते. पुढील काळात समुद्राच्या किनाऱ्याचा आकार बदलत जाणार आहे. समुद्राची पातळी दोन फुटांनी वाढल्यास मालदीव आणि इतर लहान बेटांचा बराचसा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्सर्जन कमी करणे, हा एक महत्त्वाचा उपाय शास्त्रज्ञ सांगतात.

भारतातील परिस्थिती काय?

जम्मू-काश्मीर आणि हिमालयाच्या परिसरात भारतात बर्फवृष्टी होते. या विभागांमध्ये काही प्रदेश वर्षभर बर्फाच्छादीत असतो. यंदाच्या उन्हाळ्यात मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीपासून भारताच्या उत्तरेकडील राज्यांपासून महाराष्ट्रापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या. उष्णतेच्या लाटेची ही स्थिती जम्मू-काश्मीर आणि हिमालयाच्या प्रदेशातही काही काळ होती. गेल्या काही वर्षांत जागतिक तापमानवाढीमुळे ही स्थिती निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तापमान वाढल्यामुळे बर्फाचे वितळणे साहाजिकच आहे. पण, या विभागात बर्फ वेगाने वितळण्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे. त्यानुसार आफ्रिका आणि आशिया खंडातील धूळ उडून ती हिमालयातील शिखरांवर येते आणि त्यामुळे हिमालयातील बर्फांची शिखरे वेगाने वितळतात. अमेरिकेतील पर्यावरण तज्ज्ञ युन किआन आणि मद्रास आयआयटीतील तज्ज्ञ चंदन सारंगी यांनी केलेल्या अभ्यासातून याबाबचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. पांढरा रंग सूर्यकिरणे परावर्तित करतो. त्यामुळे बर्फ वेगाने वितळत नाही. पण, बर्फावर पडलेल्या धुळीमुळे सूर्यकिरणांचे परावर्तन होत नाही. धूळ सूर्यप्रकाश शोषून घेते. त्यामुळे बर्फ वेगाने वितळतो. हा प्रकार गेल्या काही वर्षांत हिमालयात घडतो आहे.

pavlas.mugutmal@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained risk of heat waves in glacial regions print exp abn

ताज्या बातम्या