scorecardresearch

विश्लेषण : रशियाने ताब्यात घेतलेला झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प किती धोकादायक आहे?

शुक्रवारी सकाळी हल्ला झाला आणि झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पातील सहा अणुभट्ट्यांपैकी एकाला आग लागली

Russian military forces have seized Zaporizhzhia nuclear power plant
(फोटो सौजन्य- AP)

युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाला शुक्रवारी पहाटे रशियाने केलेल्या गोळीबाराचा फटका बसला. रशियन सैन्याने युक्रेनच्या आग्नेय भागात असलेल्या झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला आहे. यामुळे अणुऊर्जा प्रकल्पातील सहा अणुभट्ट्यांपैकी एकाला आग लागली. त्यामुळे आता १९८६च्या चेर्नोबिल अणुभट्टीमध्ये झालेल्या स्फोटामुळे मध्य युरोपात आलेल्या आपत्तीची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मात्र युक्रेनियन अधिकार्‍यांनी आग विझवण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच अणुभट्टीच्या संचाला झालेल्या नुकसानीमुळे युनिटच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम झाला नाही, अशी घोषणा केल्यानंतर चिंता कमी झाली आहे. पण झापोरिझ्झिया अणुप्रकल्प चेर्नोबिलपेक्षा वेगळ्या प्रकारचा असला आणि आगीपासून सुरक्षित असला, तरीही अणु सुरक्षा तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थानी याबाबत ताकीद दिली आहे. अशा भागांमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला युद्ध करणे अत्यंत धोकादायक आहे, असे तज्ञ्जांनी म्हटले आहे.

यानंतर युक्रेनच्या राज्य आण्विक नियामकांनी उपस्थित केलेली एक मोठी चिंता अशी आहे की जर लढाईमुळे अणु प्रकल्पाला वीज पुरवठा खंडित झाला, तर ऑपरेटिंग कूलिंग सिस्टमला आपत्कालीन वीज पुरण्यासाठी डिझेल जनरेटर वापरावे लागेल. यासारख्या उपायांच्या अपयशामुळे जपानच्या फुकुशिमा प्लांटसारखीच आपत्ती उद्भवू शकते, जेव्हा २०११ मध्ये मोठा भूकंप आणि त्सुनामीमुळे तीन अणुभट्ट्यांमध्ये कूलिंग सिस्टम नष्ट झाले होते. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, त्याचा परिणाम व्यापक आणि भयानक असेल.

खेरसन हे मोक्याचे बंदर घेतल्यानंतर, रशियन सैन्याने झापोरिझ्झिया जवळच्या प्रदेशात प्रवेश केला आणि गुरुवारी उशिरा प्लांटकडे जाण्याचा मार्ग उघडण्यासाठी जवळच्या एनरहोदर शहरावर हल्ला केला. पॉवर प्लांटला कसा फटका बसला हे स्पष्ट झाले नाही, पण एनरहोडर महापौर दिमित्रो ऑर्लोव्ह म्हणाले की एक रशियाचे सैनिक आण्विक प्रकल्पाकडे जाताना दिसले आणि शहरात गोळीबार ऐकू आला. त्यानंतर शुक्रवारी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की रशियाने अणु प्रकल्प ताब्यात घेतला आहे.

अणु प्रकल्पाचे प्रवक्ते एंड्री तुझ यांनी युक्रेनियन माध्यमांना सांगितले की शुक्रवारी सकाळी हल्ला झाला आणि सहा अणुभट्ट्यांपैकी एकाला आग लागली. सुरुवातीला, अग्निशामक अधिकाऱ्यांना आगीच्या जवळ जाता येत नव्हते कारण तिथे गोळीबार सुरु होता. अणुभट्टी बंदच होती, पण तरीही त्यात उच्च किरणोत्सर्गी आण्विक इंधन आहे. इतर सहा अणुभट्ट्यांपैकी, चार आता बंद ठेवण्यात आल्या आहेत, फक्त एक कार्यरत आहे.

प्लांटमधील अणुभट्ट्यांमध्ये जाड काँक्रीटचे कंटेनमेंट डोम आहेत, ज्यामुळे त्यांना टाक्या आणि तोफखान्यांपासून बाहेरील आगीपासून संरक्षण मिळते, असे जॉन वुल्फस्थल यांनी सांगितले. जॉन वुल्फस्थल यांनी ओबामांच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत शस्त्रास्त्र नियंत्रण आणि अप्रसारासाठी वरिष्ठ संचालक म्हणून काम केले होते. त्याचबरोबर अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागणे ही कधीही चांगली गोष्ट नाही, असेही ते म्हणाले.

आण्विक प्रकल्पांवरील आणखी एक धोका म्हणजे पूल जेथे वापरेले इंधन थंड करण्यासाठी ठेवले जाते आणि ज्यावर हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे किरणोत्सर्गी पदार्थ बाहेर पडू शकतात.

या प्रकल्पावरील सर्वात मोठी समस्या ही संयंत्राचा वीज पुरवठा आहे, असे दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील अभियांत्रिकीचे प्राध्यापक नजमेदिन मेश्काती म्हणाले. वीज पुरवठा बंद झाल्याने प्रकल्पाला आपत्कालीन डिझेल जनरेटरवर अवलंबून राहण्यास भाग पाडले जाऊ शकते, जे अत्यंत अविश्वसनीय आहेत आणि ते निकामी होऊ शकतात किंवा ज्याचे इंधन संपुष्टात येऊ शकतात.

चिंता कायम

युक्रेन अणुऊर्जेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, चार प्रकल्पावर १५ अणुभट्ट्या आहेत जे देशाची अर्धी वीज पुरवतात. झापोरिझ्झियावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि इतरांनी तेथील लढाई त्वरित थांबविण्याचे आवाहन केले.

युक्रेनमध्ये पूर्वीचे चेर्नोबिल आण्विक संयंत्र देखील आहे, जेथे किरणोत्सर्गी पदार्थ अजूनही बाहेर पडत आहेत. रशियन सैन्याने याभागावरी ताबा मिळवला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained russian military forces have seized zaporizhzhia nuclear power plant in ukraine abn

ताज्या बातम्या