ट्विटरचे सर्वात मोठे भागभांडवलधारक झालेले एलन मस्क हे आता काय पुढे पाऊल उचलणार याची चर्चा गेले आठवडाभर सुरु होती. मागील आठवडाभरात काही सूचक ट्वीट करत त्यांनी मोठे पाऊल उचलण्याचा एक प्रकारे इशाराच दिला होता. मस्क यांनी सोशल मीडिया कंपनीमधील आपला मोठा हिस्सा उघड केला, ट्विटरच्या संचालक मंडळावर जाणार असल्याचे सांगितले, ट्विटरच्या धोरणांमध्ये मोठे बदल करण्याचे ध्वनीत केले आणि नंतर लगोलग संचालक मंडळात जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. ही सर्व घडामोड एका आठवड्यात घडली.

परंतु आता ट्विटरमध्ये सुमारे नऊ टक्के भागीदारी असणार्‍या मस्क यांच्या कल्पना ट्विटरनं अमलात आणण्याचं ठरवलंच तर याचे मोठे परिणाम दीर्घकाळ होऊ शकतात.

एलन मस्क ट्वीटरच्या संचालक मंडळात का सहभागी झाले नाही? –

संचालक मंडळात सहभागी होणार नसल्याचं आपण शनिवारीच ट्विटरला कळवलं असल्याचं मस्क यांनी सांगितलं आहे. परंतु, त्यांनी यामागचे कारण नाही सांगितले. मात्र शनिवारी जाहीर केलेला निर्णय आणि मस्क यांनी आधी केलेली अनेक ट्वीट डिलीट करण्याची वेळ जुळून आली आहे. उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या जाहिराती न घेणे, सान फ्रान्सिस्को मुख्यालय बेघरांसाठी आश्रयस्थान करणे, असे काही बदल मस्क यांनी सुचवले होते.

ट्विटर काय सांगत आहे? –

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल म्हणाले की, मस्क यांनी ट्वीटरच्या संचालक मंडळात सहभागी न होणं हे चांगल्यासाठीच आहे, पण याचं कारण त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तर दुसरीकडे अग्रवाल यांनी असंही सांगितलंय की केवळ प्रमुख भागधारकाऐवजी मस्क संचालक मंडळावर हवे होते. कायदेशीरदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या मस्क “कंपनी आणि आमच्या सर्व भागधारकांच्या हितासाठी” वागण्यास बांधील असतील, असेही आग्रवाल यांनी नमूद केले आहे.

मस्क ट्विटरमध्ये बडे भागीदार कसे झाले? –

मस्क बर्‍याच काळापासून ट्विटरचा वापर करत होते, परंतु त्यांनी काही महिन्यांपासून ट्विटरचे समभाग खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यांनी ३१ जानेवारी रोजी सुरुवात केली, जेव्हा त्यांनी प्रत्येकी ३६.८३ डॉलर दराने ६,२०,००० पेक्षा थोडे अधिक शेअर्स खरेदी केले आणि तेव्हापासून ते एप्रिल १ एप्रिलपर्यंत मस्क यांनी ट्विटरच्या खरेदी केलेल्या समभागांची संख्या काही लाखांमध्ये आहे.

ताज्या माहितीनुसार मस्क यांच्याकडे ट्विटरचे ७३.१ दशलक्ष समभाग असून त्यांचा कंपनीमध्ये ९.१ टक्के हिस्सा आहे. खुल्या बाजारात हे शेअर्स विकत घेण्यासाठी त्यांनी २.६४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. आजच्या घडीला मस्क यांच्या समभागांसह संपूर्ण ट्विटरचे बाजारमूल्य अंदाजे ३८ अब्ज डॉलर्स आहे.

पराग अग्रवाल यांनी म्हटलंय की, “एलन मस्क यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. संचालक मंडळात सहभागी झाल्यानंतर असलेली आव्हाने याबाबतची स्पष्टता एलन मस्क यांच्यापुढे ठेवली. कंपनीचे सर्वात मोठे भागभांडवलधारक जर संचालक मंडळात सहभागी होत असतील तर त्याचा कंपनीला आणि इतर भागभांडवलधारक यांना फायदाच होईल असं सांगत एलन मस्क यांना मंडळात जागा देऊ केली, ९ एप्रिलपासून हे लागू होणं अपेक्षित होतं. पण त्याच दिवशी सकाळी एलन मस्क यांनी संचालक मंडळात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. भागभांडवलधारकांच्या सुचनांचे आम्ही नेहमीच स्वागत करत आलो आहे. एलन मस्क हे कंपनीतील सर्वात मोठे भागभांडवलधारक आहेत आणि आम्ही त्यांच्या सुचना खुल्या मनाने स्वीकारू.” कंपनीपुढे अनेक आव्हाने आहेत मात्र आम्ही आमच्या ध्येयापासून जराही दूर जाणार नाही. निर्णय कोणते घ्यायचे आणि कसे अंमलात आणायचे हे संपुर्णपणे आमच्या हातात आहे. तेव्हा कामाकडे लक्ष केंद्रीत करुया, असं प्रसिद्धी पत्रकात पराग अग्रवाल यांनी म्हटलं आहे.