गौरव मुठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षात भांडवली बाजारासह, नवखे आणि सरावलेले गुंतवणूकदारही जोशात होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्राथमिक बाजारात प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून कंपन्यांनी चालू वर्षांत शंभरहून अधिक लहान मोठ्या कंपन्यांनी १ लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवल उभारणी केली. गेल्या आर्थिक वर्षांत प्रारंभिक समभाग विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये मुख्यत: तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांचा समावेश होता. काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या मत्तेत दुपटीने वाढ केली खरी, पण ती अल्पजीवी ठरली. याच पार्श्वभूमीवर प्रारंभिक समभाग विक्री म्हणजे काय, त्या माध्यमातून समभागात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया

प्रारंभिक समभाग विक्री (इनिशिअल पब्लिक ऑफर) म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या कंपनीला निधी उभारण्याची गरज असते किंवा खाजगी कंपनी सार्वजनिक होण्याचा निर्णय घेते तेव्हा कंपनी आपले समभाग पहिल्यांदा थेट गुंतवणूकदारांना विकते. यालाच प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) असे म्हणतात. आयपीओच्या माध्यमातून थेट कंपनी आणि गुंतवणूकदारांचा संबंध येत असतो. कंपनी पहिल्यांदाच आपल्या कंपनीचे समभाग थेट गुंतवणूकदारांला विकते. आयपीओ बाजारात दाखल करण्याआधी कंपनीला भांडवली बाजार नियत्रंक सेबीची परवानगी घेणे आवश्यक असते. कंपनीकडून सेबीकडे आयपीओबाबत मसुदा प्रस्ताव पाठवला जातो. त्यामध्ये कंपनीची आर्थिक स्थिती, संचालक मंडळाची माहिती दिली जाते. त्याचबरोबर कंपनी आयपीओच्या माध्यमातून उभारलेला निधी कशासाठी वापरणार याबाबत माहिती दिली असते.

कंपनीकडून आलेल्या मसुदा प्रस्तावाची पाहणी सेबीकडून करण्यात येते. तो योग्य असल्यास सेबीकडून आयपीओ बाजारात दाखल करण्यासाठी परवानगी मिळाल्यावर कंपन्या आयपीओची तारीख निश्चित करतात. हे करताना आयपीओची किंमत कंपन्यांमार्फत दोन पद्धतीने निश्‍चित केली जाते. किंमत निश्चित करताना समभागाचा एक निश्चित दर (फिक्स्ड प्राईस), किंवा समभागासाठी किंमतपट्टा (प्राईस बँड) जाहीर केला जातो. यामध्ये समभागाचा किमान व कमाल दर जाहीर केला जातो. आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना समभाग प्राप्त झाल्यांनतर थोडयाच दिवसात कंपनीचे समभाग शेअर बाजार मंचावर (राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार) सूचिबद्ध केले जातात. त्यांनतर दुय्यम बाजारात (सेकंडरी मार्केट) समभागांची खरेदी-विक्री करता येते.

आयपीओ आणि एफपीओमध्ये काय फरक आहे?

जेव्हा एखाद्या कंपनीला व्यवसाय वाढीसाठी भांडवलाची आवश्यकता असते व ही गरज कंपनी स्वतः भागवू शकत नाही, अशा वेळी ही कंपनी सामान्य गुंतवणूकदारांना कंपनीचा हिस्सा विकून भागधारक बनवते. कंपनी प्रथमच प्राथमिक बाजारात समभाग विक्री करत असते, यालाच आयपीओ म्हणतात हे आपण बघितले. मात्र भविष्यात कंपनीला आणखी व्यवसाय विस्तार करण्यासाठी भांडवली आवश्यकता भासल्यास कंपनी पुन्हा एकदा भागविक्री करते म्हणजेच त्याला फॉलोऑन पब्लिक ऑफर अर्थात ‘एफपीओ’ असे म्हणतात.

गेल्या वर्षात आयपीओला उदंड प्रतिसाद का लाभला?

गेल्या वर्षी जानेवारीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सेन्सेक्सने १०,००० अंशांहून अधिक कमाई केली आहे. जानेवारी २०२१ मध्ये सेन्सेक्सने ४७,७५१ अंशानी सुरुवात केली होती तर ऑक्टोबर महिन्यात ६२,२४५.४३ अंशांची ऐतिहासिक सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. करोनामुळे अर्थचक्रावर प्रतिकूल परिणाम झाल्याने अनेकांनी चालू वर्षांत एक-अंकी परताव्याची भविष्यवाणी केली होती. मात्र सर्व अंदाज चुकीचे ठरवत सेन्सेक्सने सुमारे २४ टक्कय़ांहून अधिक रिटर्न दिला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्राथमिक बाजारात प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून चालू वर्षांत शंभरहून अधिक लहान-मोठ्या कंपन्यांनी सव्वा लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवल उभारणी केली. चालू आर्थिक वर्षात प्रारंभिक समभाग विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये मुख्यत: तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांचा समावेश होता. काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या मत्तेत दुपटीने वाढ केली खरी, पण ती अल्पजीवी ठरली. मात्र सुरुवातीला वाढलेल्या समभागांच्या किमतीमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये बाजारात नव्याने प्रवेश केलेले गुंतवणूकदारांचे कळप मोठ्या प्रमाणावर या प्रारंभिक समभाग विक्रीला हातभार लावत होता. झिरोधा, अपस्टॉक किंवा ग्रो सारख्या स्मार्टफोनच्या माध्यमातून नगण्य ब्रोकरेज आकारून समभाग खरेदी विक्रीची सोय उपलब्ध करून देणाऱ्या भांडवली बाजारातील दलालांमुळे (स्टॉक ब्रोकर) महानगरेच काय पण छोटी शहरे आणि गावांमधील लोक देखील बाजारातील जोखमीचा अभ्यास न करता किंवा जोखीम समजून न घेता बाजारातील तेजीचा वाटेकरी होण्यासाठी मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे एकामागे एक धावले. मात्र तेजीमध्ये ‘आयपीओ’ म्हटल्यावर जोरदार गाजावाजा होतो. मग डिमॅटसाठी धावपळ सुरू होते. गुंतवणूकदारांच्या याच मानसिकतेमुळेच अनेक आयपीओंना अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद लाभला. पण असे प्रकार काय यंदा प्रथमच घडले का? तर अजिबात नाही. हे चालू वर्षातच घडले असे नाही. यापूर्वीचे ‘आयपीओ’द्वारे भांडवल उभारणीसाठी सर्वांत चांगले ठरलेले वर्ष म्हणजे २०१७ सालात, तीनेक डझन कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून सुमारे ६९ हजार कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता.

गेल्या वर्षी आयपीओ आणलेल्या कंपन्यांची परिस्थिती सध्या काय?

आता नवीन कॅलेंडर वर्षात म्हणजेच जानेवारी २०२२ मध्ये शेअर बाजारातील पडझड ही बाजारात नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या टेक स्टार्टअप कंपन्यांसाठी खूपच मारक ठरली. पेटीएम, पॉलिसीबझार, नायका, झोमॅटो, कारट्रेड टेक या कंपन्यांचे समभाग दणदणीत आपटले. गेल्या काही महिन्यांत अतिभव्य प्रारंभिक भागविक्री आणि त्याला गुंतवणूकदारांकडून दणकेबाज प्रतिसाद मिळवीत अनेक नवीन स्टार्टअप कंपन्यांचे समभाग बाजारात सूचिबद्ध झाले. पण ताज्या पडझडीत या कंपन्यांच्या समभागांना आता कोणीच वाली उरला नाहीये, अशी मोठी घसरण त्यात झाली आहे. त्यातील काही कंपन्यांचे समभाग हे कंपनीने गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून शेअर विक्रीच्या वेळी दिलेल्या किमतीपेक्षा म्हणजेच इश्यू प्राइसपेक्षा देखील खूप खाली आले आहेत. काही कंपन्यांनी तर नवीन वर्षात निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. सेन्सेक्सने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत निगेटिव्ह ४.५२ टक्के रिटर्न दिला आहे. तर बीएसई आयपीओ निर्देशांक ज्यामध्ये नुकत्याच सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांचा सहभाग आहे, त्याने तीन महिन्यांच्या कालावधीत तर निगेटिव्ह २०.०२ टक्के रिटर्न दिला आहे.

आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना काय काळजी घेतली पाहिजे?

आयपीओ गुंतवणुकीचा निर्णय घेताना ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (डीआरएचपी) तपासणे आवश्यक आहे. ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’मध्ये कंपनीच्या व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती नमूद केलेली असते. यामध्ये प्रामुख्याने कंपनीची आर्थिक स्थिती, भविष्यातल्या योजना, मालमत्ता व जबाबदाऱ्या, नवीन व्यवसाय उपक्रमांमध्ये गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी, याबद्दल संपूर्ण माहिती असते. हा मसुदा प्रस्ताव सेबीच्या संकेस्थळावर उपलब्ध असतो.

  • कंपनीचा व्यवसाय कुठला आहे? कुठे आहे? कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत? कंपनीचा व्यवसाय कुठे चालतो? कंपनीची भूतकाळातील आणि वर्तमानातील कामगिरी कशी आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायला हवीत.
  • ‘सेबी’ अथवा ‘आयपीओ’चे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपन्यांच्या वेबसाईटवर ‘निर्देश प्रॉस्पेक्टसवरील माहिती उपलब्ध असते. ती वाचली पाहिजे.
  • ‘आयपीओ’च्या वेळी शेअर वाजवी किमतीला मिळतात म्हणून गुंतवणूक करणे चुकीचे आहे. भविष्यात शेअर बाजारात तो शेअर आणखी कमी किमतीला मिळू शकतो.
  • कंपन्यांकडून ‘आयपीओ’आधी बऱ्याचदा जाहिरातबाजी केली जाते. किंवा कंपनीच्या वस्तू आणि सेवांना किती मागणी आहे याचे चित्र रंगविले जाते. मात्र जाहिरातींतून कंपनीच्या खऱ्या कामगिरीचा अंदाज मिळेलच असे नाही.
  • कंपनीच्या भविष्यातील योजना, आर्थिक स्थिती, त्यातील सातत्य आणि ‘आयपीओ’चा उद्देश बघणे आवश्यक आहे.
  • गुंतवणूकदारांकडून ‘आयपीओ’ खुला झाल्यानंतर त्याला प्रतिसाद किती मिळाला आहे यावरून गुंतवणुकीचा निर्णय घेतात. मात्र ‘आयपीओ’ला मोठा प्रतिसाद मिळाला म्हणजे तो गुंतवणूकयोग्य आहे, हा निकषही चुकीचा ठरू शकतो.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is an ipo what investors should do before investing in it print exp 0422 asj
First published on: 02-04-2022 at 10:44 IST