अनिकेत साठे
अग्निपथ योजनेवरून देशात वादंग निर्माण झाले असले तरी भारतीय सैन्यदलांनी अग्निवीर भरतीचे वेळापत्रक जाहीर करीत ही प्रक्रिया जलदपणे राबविण्याची तयारी केली आहे. नौदल, हवाई दल आणि लष्करात अग्निवीरांची निवड होऊन पुढील सहा ते सात महिन्यांत पहिली तुकडी प्रशिक्षणास सज्ज होईल. सैन्यदलात नियुक्त होणाऱ्या अग्निवीरांना सध्याच्या अस्तित्वातील पदांपेक्षा वेगळा हुद्दा (रँक) मिळणार आहे. शिवाय, त्यांच्या गणवेशावर ती ओळख प्रतीत करणारे विशिष्ट चिन्ह असणार आहे.

पद, जबाबदारी, बंधने कोणती ?

cleaning dirt by hand, banning laws,
हाताने मैला साफ करण्याची कृप्रथा : बंदी घालणाऱ्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, उच्च न्यायालयाचे आदेश
ban on meat sale caste system marathi news
मांसविक्रीवर बंदी हा जातीव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न!
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

सैन्यदलात भरतीसाठी राबविली जाणारी अग्निपथ योजना मनुष्यबळ व्यवस्थापनाची नवी योजना असल्याचे सांगितले जाते. नाव नोंदणी करतानाच इच्छुकास योजनेच्या सर्व अटी, शर्ती स्वीकारण्याचे बंधन आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण देशपातळीवर सर्व घटक या आधारे भरती केली जाईल. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या इच्छुकास नाव नोंदणी अर्जावर पालकांची स्वाक्षरी घ्यावी लागेल. अग्निवीर हा भारतीय सैन्यदलात सध्याच्या पदांपेक्षा (रँक) वेगळा हुद्दा तयार होईल. चार वर्षांच्या सेवा काळात त्यांच्या गणवेशावर विशिष्ट प्रतीक चिन्ह राहणार आहे. सेवा काळात अग्निवीरांना लष्करी रुग्णालयात वैद्यकीय सुविधा, सैन्य भांडार विभागाच्या दुकानांचा लाभ घेता येईल. दरवर्षी ३० दिवसांची रजा तसेच वैद्यकीय कारणास्तव आजारपणाची वेगळी रजाही मिळेल. सैन्यदलाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ते सन्मान, पुरस्कारास पात्र असणार आहेत. कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर मात्र ते कुठल्याही प्रकारची निवृत्तिवेतन योजना आणि उपदानास पात्र नसतील. त्यांना माजी सैनिकांसाठीची आरोग्य योजना, सैन्य भांडार विभागाची दुकाने (सीएसडी) आणि तत्सम लाभ मिळणार नाहीत. शासकीय गुपिते अधिनियम १९२३ अन्वये सेवा काळात मिळालेली माहिती उघड करण्यापासून अग्निवीरांना प्रतिबंध राहणार आहे.

हुद्द्यात बदलाची शक्यता आहे का?

चार वर्षांचा सेवा काळ पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना नियमित संवर्गात समाविष्ट होण्याकरिता अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्या अंतर्गत प्रत्येकाची सेवा काळातील कामगिरी जोखली जाईल. वैद्यकीय तपासणी, शारीरिक, लेखी चाचण्यांमधून ही निवड केली जाईल. तुकडीतील २५ टक्के अग्निवीरांना स्थायी सेवेची संधी मिळेल. उर्वरित अग्निवीरांना कार्यकाळ झाल्यानंतर सेवा निधी अंतर्गत प्रत्येकी ११.७१ लाख रुपये दिले जातील. नियमित संवर्गात निवड झालेल्या अग्निवीरांची सैन्यदलातील अस्तित्वातील पदांवर नियुक्तीची शक्यता आहे. म्हणजे अग्निवीरांचा आधीचा हुद्दा स्थायी सेवेत दाखल झाल्यानंतर बदलू शकतो.

सैन्य दलात चिन्हांचे प्रयोजन का केले जाते?

कुठल्याही सैन्यदलात सैनिकांना भावनिक, मानसिक  प्रेरणा देण्यासाठी विशिष्ट रंगसंगतीत चिन्ह, प्रतीकांच्या वापराची पूर्वापार परंपरा आहे. त्यातून सैन्यदलाची चिकाटी, धैर्य, प्रतिष्ठा अधोरेखीत होते. शिवाय ती विविध विभागांत अंतर्गत संवादात उपयुक्त ठरतात. त्यामुळे सैन्यदलात चिन्हे, मानकांना विशेष स्थान आहे. गणवेशापासून ते युद्ध कार्यवाहीपर्यंत विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो. रशियाने युक्रेनच्या युद्धात आपल्या लष्करी आयुधांवर रेखाटलेले झेड हे त्याचे उदाहरण. नियमित कामकाजात प्रतीकांना महत्त्व दिले जाते. अगदी गणवेशावरील विशिष्ट चिन्हांतून संबंधित अधिकारी, जवान यांचे पद, त्यांच्यावरील जबाबदारी प्रतीत होते.

पदनिहाय प्रतीक चिन्हे कशी आहेत?

भारतीय सैन्यदल जगातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षित सैन्यदलांपैकी एक मानले जाते. लष्कर, हवाई दल आणि नौदलात राजपत्रित (कमिशन्ड) अधिकारी, अराजपत्रित (नॉन कमिशन्ड) अधिकारी आणि इतर या गटात पदांची विभागणी केलेली आहे. तुकडीपासून ते दलापर्यंतचे नेतृत्व राजपत्रित अधिकारीच करतो. गणवेशावरील प्रतीक चिन्हांतून प्रत्येकाची वेगळी ओळख होते. भारतीय लष्करात फील्ड मार्शल हा सर्वोच्च हुद्दा मानला जातो. पाच तारांकित असणारा हा हुद्दा सन्मानार्थीच दिला जातो. आतापर्यंत फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांंना हा गौरव प्राप्त झाला आहे. कमळ पुष्पाच्या नक्षीदार रचनेत आडव्या प्रकारे तलवार-छडी आणि वरील बाजूस अशोक स्तंभ असे या पदाचे चिन्ह आहे. लष्करात चार तारांकित जनरल अर्थात लष्करप्रमुख हे पद आहे. त्यांच्या गणवेशावर विशिष्ट रंगसंगतीत आडव्या प्रकारात तलवार-छडी, वर पाच बिंदूंचा तारा आणि त्यावर अशोक स्तंभ असतो. लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडिअर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट पदनिहाय चिन्हात बदल होतो. कनिष्ठ अधिकारी गटात सुभेदार मेजर, सुभेदार, नायब सुभेदार आणि इतर गटात हवालदार, नायक, लान्स नायक, शिपाई ही पदे आहेत. सामान्य भरती प्रक्रियेतून येणाऱ्यास शिपाई पद मिळते. या पदाला कोणतीही निशाणी नसते. त्यांच्या गणवेशावर केवळ त्यांच्या रेजिमेंटचे चिन्ह असते. लान्स नायक पदावर कार्यरत जवानाच्या खांद्यावर व्ही आकाराची पट्टी असते. लान्स नायक पदासाठी व्ही आकारातील दोन पट्ट्या असतात. भारतीय नौदलाचे प्रमुख आणि हवाई दलाचे प्रमुख ही लष्करप्रमुखांशी समकक्ष पदे आहेत. ही दोन्ही चार तारांकित पदे आहेत.  हवाईदलातील एकमेव पंचतारांकित अधिकारी म्हणजे मार्शल ऑफ द एअरफोर्स अर्जनसिंग. नौदलात हा बहुमान आजवर कोणालाही मिळालेला नाही. नौदल आणि हवाई दलात पदांची नावे वेगवेगळी असली तरी त्यांची विभागणी लष्कराच्या धर्तीवर आहे. संबंधितांची प्रतीक चिन्हे वेगवेगळी असतात. हवाई दलात राजपत्रित अधिकारी गटात निळ्या पट्ट्यांची पदनिहाय वेगळी रचना असते. पहिली पट्टी इतर पट्ट्यांच्या तुलनेत आकाराने मोठी असते. पदनिहाय पट्ट्यांचे अंतर वेगळे असते. काही पदांच्या चिन्हांत गरूड पक्षाचाही समावेश आहे. नौदलात पदनिहाय सोनेरी रंगाची पट्टी आणि पट्ट्यांच्या संख्येत बदल असतो. पदनिहाय प्रतीक चिन्हांची वेगळी रचना असते. त्यातून संबंधितांची जबाबदारी अधोरेखीत होते. अग्निवीरांना अस्तित्वातील पदे आणि चिन्हांऐवजी वेगळे  पद आणि चिन्ह दिले जाणार आहे. त्यांचे प्रतीक चिन्ह कसे असेल याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.