scorecardresearch

विश्लेषण : शपथ घ्यावी कुणाची, हिपोक्रेट्सची की चरकाची? काय आहे नवीन वाद?

डॉक्टरांनी हिपोक्रेट्सची नव्हे तर चरकाची शपथ घेऊन रुग्णसेवा सुरू करण्याची सूचनावजा आग्रह नॅशनल मेडिकल कमिशनने धरला आहे

गेल्या शेकडो वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून रुग्णसेवेसाठी दाखल होणारे डॉक्टर हिपोक्रॅटिक (Hippocrates) ओथ – म्हणजेच हिपोक्रेट्सची शपथ घेऊन रुग्णसेवेला सुरुवात करतात. मात्र, नॅशनल मेडिकल कमिशनने (National Medical Commission) नुकत्याच झालेल्या बैठकीत यापुढे डॉक्टरांनी हिपोक्रेट्सची नव्हे तर चरकाची (Charaka) शपथ घेऊन रुग्णसेवा सुरू करण्याची सूचनावजा आग्रह धरला आहे. त्यावरून वैद्यक समुदायात दोन तट पडले आहेत.

हिपोक्रेट कोण होता? त्याची शपथ का?

आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक म्हणून ग्रीक फिजिशियन हिपोक्रेट्स ओळखला जातो. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून रुग्णसेवेत दाखल होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा एक शपथविधी होतो. वैद्यकीय क्षेत्राच्या परिभाषेत याला ‘व्हाईट कोट सेरेमनी’ असेही म्हणतात. या शपथविधीमध्ये हिपोक्रेट्स या ग्रीक फिजिशियनची शपथ घेतली जाते. ख्रिस्तपूर्व ४-५ व्या शतकात, अलेक्झांडरचा मृत्यू होईपर्यंतच्या काळात हिपोक्रेट्स अस्तित्वात होता. प्लुटो, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल हे हिपोक्रेट्सचे समकालीन. रोग किंवा आजार हे देवाच्या प्रकोपामुळे होत नाहीत. वैद्यकशास्त्रावर आधारित उपचारांनी ते बरे करणे शक्य आहे असा नवा विचार मांडण्यात आणि रुजवण्यात हिपोक्रेट्सचे योगदान होते. रुग्णांवर उपचार करताना कोणती नैतिक मूल्ये पाळावीत याबाबतची शपथ असे हिपोक्रेट्स शपथेचे स्वरूप आहे. त्यामध्ये मुख्यत: शारीरिक दुखण्यापेक्षा रुग्णाला उपचारांचा त्रास अधिक होऊ नये यासाठी घेण्याच्या काळजीचा समावेश आहे. शेकडो वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून रुग्णसेवेसाठी दाखल होणारे विद्यार्थी पदवीदान प्रसंगी (व्हाईट कोट सेरेमनी) ही शपथ घेत आले आहेत. हिपोक्रेट्सची शपथ – ‘मी अपोलो फिजिशियन आणि एस्क्लेपियस, हायजिआ, पॅनेशिया आणि सर्व देवदेवतांची शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या क्षमतेनुसार आणि निर्णयानुसार आजारी रुग्णांवर उपाय करेन आणि त्यांना वेदना आणि त्रासापासून मुक्त करेन.’

चरक ऋषी कोण होता?

प्राचीन भारतातील आयुर्वेदाचा जनक म्हणून चरकाचा उल्लेख केला जातो. इसवीसन पूर्व तिसरे शतक हा त्याचा कालावधी समजला जातो. आरोग्यातील चढउतार, रोग यांचा संबंध केवळ आणि केवळ जीवनशैलीतील बदलांशी आहेत असे चरक ऋषीने सांगितले. रोग झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा भारतीय परंपरा आणि आयुर्वेद यांवर आधारित, निसर्ग आणि ऋतुमानाला साजेशी जीवनशैली अमलात आणल्यास रोगांना दूर ठेवणे शक्य आहे असाही त्याचा संदेश होता. स्वत:साठी किंवा कोणत्याही भौतिक लाभांसाठी नव्हे तर मानवजातीच्या व्यापक हितासाठी मी रुग्णांवर उपचार करेन असे चरकाने आपल्या शपथेत लिहिले आहे.

शपथेची चर्चा कशासाठी?

वैद्यकीय शिक्षणाबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या नॅशनल मेडिकल कमिशनने आपल्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यापुढे हिपोक्रेट्सची शपथ रद्द करून चरकाची शपथ रूढ करण्याची सूचना केली आहे. हिपोक्रेट्स हा आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक, तर चरक हा आयुर्वेदाचा जनक म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर हिपोक्रेट्सची शपथ रद्द करून चरकाची शपथ रूढ करण्याचा निर्णय म्हणजे आयुर्वेदाचे महत्त्व वाढवताना आधुनिक वैद्यकशास्त्राचे महत्त्व नाकारण्यासारखे आहे, असा सूर सध्या आधुनिक वैद्यकशास्त्राच्या वर्तुळात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्याचवेळी परदेशी व्यक्तीचे स्मरण ठेवणारी शपथ वर्षानुवर्षे घेतल्यानंतर आता, हिपोक्रेट्सच्या आधीपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत राहिलेल्या भारतीय व्यक्तीच्या शपथेचा समावेश वैद्यकीय पदवीदान समारंभात करण्यास हरकत काय, असा सूरही काही डॉक्टरांकडून वैयक्तिक मत म्हणून व्यक्त करण्यात येत आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्राचा रोष ओढवणार?

मागील काही वर्षांमध्ये आयुष मंत्रालयाच्या स्थापनेनंतर भारतीय आयुर्वेद आणि इतर वैद्यकीय उपचारप्रणालींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नियमित प्रयत्न होताना दिसत आहेत. मागील वर्षी आयुर्वेद शाखेच्या शल्य (जनरल सर्जरी) आणि शालाक्य (ईएनटी) विषयांचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या शस्त्रक्रिया करण्याच्या अधिकाराला कायदेशीर मान्यता देणारे राजपत्र केंद्र सरकारने प्रकाशित केले. आयुर्वेद उपचार करणाऱ्या वैद्यकीय वर्तुळाने या निर्णयाचे स्वागत केले तर आधुनिक वैद्यकशास्त्राचा म्हणजेच ॲलोपॅथीचा अवलंब करणाऱ्या डॉक्टरांनी त्यास कडाडून विरोध केला. त्यानंतर आता हिपोक्रेट्सची शपथ रद्द करून चरकाची शपथ घेऊन विद्यार्थ्यांना पदवी देण्याचा निर्णय अमलात आणायचा निर्णय झाला तर ॲलोपॅथी डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांचा रोष ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

bhakti.bisure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained who is to be sworn in hippocrates or charaka what is the argument asj 82 print exp 0222

ताज्या बातम्या