“And how can man die better
Than facing fearful odds,
From the ashes of his fathers,
And the temples of the gods.”
चुषुल, लडाख येथील रेजांग ला या युद्धस्मारकावरील या पहिल्या चार ओळी थॉमस बाबिंग्टन मॅकॉले यांच्या होरेशियस (Horatius) या कवितेतून घेतल्या आहेत. या ओळी अत्यंत समर्पक आहेत. होरेशियस ही एक कथा आहे. तीन रोमन वीरांची, या वीरांनी टायबर नदीवरील सब्लिशियन पुलावर आक्रमक एट्रस्कन सैन्याविरुद्ध शेवटचा शौर्यपूर्ण लढा दिला होता. भारतीय जवानांनीही असाच लढा दिला, त्याचेच हे स्मरण!
१९६२ साली कुमाऊँ रेजिमेंटच्या १२० जवानांच्या तुकडीने रेजांग ला येथे असाच शेवटचा लढा दिला. त्यांच्या समोर संख्येने अधिक आणि आधुनिक शस्त्रांनी सज्ज असे चिनी सैन्य होते. भारतीय सैन्य तुकडीतील फक्त सहा सैनिक जिवंत राहिले. तरी त्यांच्या अदम्य प्रतिकारामुळे युद्धाचा रोख बदलला आणि संपूर्ण लडाख चीनच्या ताब्यात जाण्यापासून वाचले.
फरहान अख्तर याची मुख्य भूमिका असलेला १२० बहादूर हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाची कथा याच घटनेवर आधारलेली आहे. मात्र, प्रदर्शनाआधीच या चित्रपटाला त्या सैनिकांशी संबंधित असलेल्या अहिर समाजाकडून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. १९६२ साली चीनबरोबर झालेल्या युद्धाची सावली भारताच्या लष्करी इतिहासावर अजूनही गडद आहे. लडाख आणि ईशान्य सीमांत एजन्सीवर (नेफा, सध्याचे अरुणाचल प्रदेश) चीनने हल्ला चढवला आणि त्यांचा विजय निर्णायक ठरला.
१८ नोव्हेंबर १९६२ रोजी रेजांग ला येथे लढाई झाली. या लढाईत १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीतील सुमारे १२० भारतीय सैनिकांनी, कोणत्याही तोफखान्याच्या मदतीशिवाय ३,००० ते ५,००० चिनी पायदळातील सैनिकांशी लढा देत रेजांग लाचे रक्षण केले. अखेरीस संख्येने प्रचंड असलेल्या चिनी सैन्याने विजय मिळवला, तरी या १२० शूर सैनिकांनी भारताला अत्यंत आवश्यक अशी विजयाची संधी मिळवून दिली. त्यांच्या लढ्याने चीनची पुढची वाटचाल रोखली गेली, भारतीय सैन्याने महत्त्वाच्या चुषुल विमानतळाचे संरक्षण केले आणि परिणामी, संपूर्ण लडाख चीनच्या ताब्यात जाण्यापासून वाचले.
“…पायदळातील [फक्त] १२० सैनिकांनी जगातील सर्वात मोठ्या सैन्याला रोखण्यात यश मिळवले…,” असे लेखक कुलप्रीत सिंग यांनी ‘द बॅटल ऑफ रेजांग ला’ (२०२१) या पुस्तकात म्हटले आहे. “…[ते] संख्येने कमी, शस्त्रसज्जतेत मागे आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत होते, पण प्रत्येकाने खऱ्या वीराप्रमाणे लढा दिला आणि जगाला सिद्ध करून दाखवले की, दृढनिश्चय, चिकाटी आणि आत्मविश्वास हे कोणत्याही भौतिक अडथळ्यांपेक्षा मोठे असतात.” रेजांग ला येथील लढाईनंतर दुसऱ्याच दिवशी चीनने लडाखमधील आगेकूच थांबवली आणि २१ नोव्हेंबर रोजी एकतर्फी युद्धविरामाची घोषणा केली.
‘शेवटचा माणूस, शेवटची गोळी’
रेजांग ला हे समुद्रसपाटीपासून तब्बल १६,००० फूट उंच असलेले पर्वतीय क्षेत्र आहे. ही नियंत्रणरेषेवरील (LAC) एक अत्यंत महत्त्वाची दरी आहे. या ठिकाणाचे संरक्षण चुषुल येथील अग्रिम हवाई तळासाठी (Forward Air Base) आणि एकूणच लडाखच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर चीनने या भागात आपले वर्चस्व निर्माण केले असते, तर त्यांना लेहपर्यंत मार्ग त्यांच्यासाठी मोकळा झाला असता.
भारत-चीन युद्ध २० ऑक्टोबर १९६२ रोजी सुरू झाले, याची सुरुवात चीनने लडाख आणि ईशान्य सीमांत एजन्सी (नेफा) येथील भारतीय ठाण्यांवर नियोजनबद्ध हल्ल्याने केली. मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखालील १३ कुमाऊँ रेजिमेंटची संपूर्ण हिर जवानांची चार्ली कंपनी रेजांग ला या भारतीय चौकीचे संरक्षण करत होती.
मात्र ही तुकडी अत्यंत अपुऱ्या साधनसामग्रीने हैराण होती. सैनिकांकडे उंच, थंड प्रदेशातील कपडे, पुरेसा अन्नसाठा, तसेच आधुनिक शस्त्रास्त्र आणि दारुगोळा नव्हता. शिवाय, भौगोलिक परिस्थितीमुळे तोफखान्याचे सहाय्य मिळवणे अशक्य होते. “चार्ली कंपनीकडे केवळ ली-एनफिल्ड .३०३ रायफल्स (प्रत्येक सैनिकाकडे प्रत्येकी ६०० गोळ्या), नऊ हलक्या मशीनगन, तीन २-इंच मोर्टार (प्रत्येक पलटणीत एक), दोन ३-इंच मोर्टार आणि हातगोळे (सुमारे ५००, प्रत्येकी दोन प्रमाणे अधिकृत आणि उर्वरित राखीव) एवढीच शस्त्रसामग्री होती,” असे कुलप्रीत सिंग यांनी लिहिले आहे.
काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर १८ नोव्हेंबरच्या पहाटे चीनने हल्ला सुरू केला. भारतीय जवानांच्या हलक्या मशीनगन, मोर्टार आणि ली-एनफिल्ड रायफल्सच्या माऱ्याने शत्रूच्या एकामागून एक लाटा कोसळत होत्या, तरीही क्षितिजावरून चिनी सैनिकांचा नवीन ओघ सुरूच होता. कालांतराने सैनिकांच्या प्रचंड संख्येचा आणि तोफखाना तसेच मशीनगनच्या गोळीबाराचा परिणाम जाणवू लागला. “चीनने कंपनीच्या ठिकाणी तोफखाना, मोर्टार आणि लहान शस्त्रांच्या तीव्र गोळीबाराने हल्ला केला आणि नंतर अनेक बहुसंख्येने आक्रमण सुरू केले,” असे परमवीर चक्रप्राप्त मेजर शैतान सिंग यांच्या अधिकृत गौरवपत्रात म्हटले आहे. मात्र प्रत्येक सैनिकाने शेवटपर्यंत लढा दिला. गोळ्या संपल्यानंतर त्यांनी बंदुकींच्या खंजरांनी आणि मुठींनी लढा दिला आणि “भारतातील प्रत्येक वीरासाठी चार ते पाच शत्रू ठार केले.”
“संपूर्ण लढाईदरम्यान मेजर शैतान सिंग स्वतःचा जीव धोक्यात घालून एका पलटणीच्या पोस्टवरून दुसरीकडे गेले आणि आपल्या जवानांचे मनोबल वाढवले. ते गंभीर जखमी होते, तरी त्यांनी सैनिकांना प्रेरित केले, नेतृत्व केले आणि त्यांच्या धाडसाने प्रभावित होऊन जवानांनी अतिशय शौर्याने लढा दिला आणि शत्रूचे मोठे नुकसान झाले,” असे त्यांच्या परमवीर चक्राच्या प्रशस्तिपत्रात लिहिले आहे.
या लढाईत चार्ली कंपनीतील १२० पैकी ११४ भारतीय जवान शहीद झाले. परंतु चिनी सैन्याचे नुकसान त्याहून मोठे होते. भारतीय अंदाजानुसार सुमारे १,३०० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले. हिवाळा सुरू होताच रेजांग ला चे रणांगण जणू काळाच्या आड गोठून गेले; या लढाईचे पूर्ण स्वरूप आणि शौर्याची व्याप्ती काही महिन्यांनीच समोर आली.
मेजर जनरल इयान कार्डोजो यांनी आपल्या परम वीर: वर हीरोज इन बॅटल (२००३) या पुस्तकात लिहिले आहे की, जेव्हा रेजांग ला ची पाहणी करण्यात आली, तेव्हा खंदकांमध्ये भारतीय जवान मृतावस्थेत सापडले. पण त्यांच्या हातातल्या शस्त्रांची पकड घट्ट होती. या कंपनीतील प्रत्येक सैनिक आपल्या स्थानावर ठाम उभा राहून लढला होता; त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या आणि हातबॉम्बच्या तुकड्यांच्या जखमा होत्या. दोन-इंच मोर्टार हाताळणारा जवान हातात बॉम्ब धरूनच शहीद झाला होता. वैद्यकीय सहाय्यकाच्या हातात सिरिंज आणि बँडेज होते, त्याच वेळी त्याला चिनी गोळी लागली होती. बचाव करणाऱ्या जवानांकडे सुमारे हजार मोर्टार बॉम्ब होते. त्यापैकी फक्त सात शिल्लक राहिले होते; बाकी सर्व डागले गेले होते आणि उर्वरितही डागण्यासाठी तयार होते, तेव्हाच शत्रूने त्या विभागावर ताबा मिळवला.
जात अभिमान आणि भारतीय सेना
अहिर हा उत्तर भारतातील एक पशुपालक समुदाय आहे, या समुदायातील बहुतांश लोक आज यादव हे आडनाव वापरतात. ब्रिटिश काळात या समुदायाची योद्धा वंश (Martial Race) म्हणून ओळख होती आणि त्यामुळे या समाजातून सैन्यात भरतीला प्रोत्साहन देण्यात आले. मात्र इतर अनेक योद्धा समुदायांप्रमाणे अहिरांना स्वतःची स्वतंत्र रेजिमेंट मिळाली नाही (जसे की, जाट किंवा शीख रेजिमेंट). त्याऐवजी त्यांची भरती इतर रेजिमेंट्समध्ये करण्यात आली, विशेषतः कुमाऊँ रेजिमेंटमध्ये भरती करण्यात आली (पूर्वी ही रेजिमेंट हैद्राबाद रेजिमेंट म्हणून ओळखली जात होती). वर्षानुवर्षे अहिर नेते स्वतःच्या स्वतंत्र रेजिमेंटसाठी मागणी करत आले आहेत. या मागणीसाठी ते प्रामुख्याने रेजांग ला च्या लढाईत १२० आहिर सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचा दाखला देतात. परंतु या लढाईच्या लोकप्रिय कथांमध्ये बहुधा मेजर शैतान सिंग यांच्या वैयक्तिक पराक्रमावर अधिक भर दिला जातो आणि हेच अहिर समुदायासाठी दीर्घकाळ दु:खाचे कारण ठरले आहे.
“फरहान अख्तरने साकारलेलं पात्र खरोखरच शंभराहून अधिक अहिर सैनिकांचे नेतृत्व करत आहे, पण केवळ चौहान समाजाला प्रोत्साहन देऊन आमचे बलिदान विसरले जाऊ नये,” असे अलीकडे मानेसर येथे झालेल्या आहिर समाजाच्या आंदोलनात एका भाजप नेत्याने सांगितले. हे आंदोलन मुख्यत्वे चित्रपटाचे नाव बदलण्यासाठी करण्यात येत असले, तरी उपस्थितांनी सांगितले की, हे पुन्हा एकदा स्वतंत्र आहिर रेजिमेंटच्या मागणीला जाग आणण्यासाठीचे पाऊल आहे, असे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. मात्र मागील काही दशकांपासून केंद्र सरकारने जाती किंवा वर्गाच्या आधारावर नवीन रेजिमेंट स्थापन करण्यास नकार दिला आहे आणि सैन्याला अधिक राष्ट्रीय स्वरूप देण्याच्या दिशेने प्रयत्न केले आहेत.
२०२३ साली संसदेतील प्रश्नाच्या उत्तरात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी म्हटले होते, “अहिर रेजिमेंट उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही. सरकारच्या धोरणानुसार, वर्ग, जात, प्रदेश किंवा धर्म यांची पर्वा न करता सर्व नागरिक भारतीय सैन्यात भरतीस पात्र आहेत. स्वातंत्र्यापासून सरकारचे धोरण हेच आहे की, कोणत्याही विशिष्ट वर्ग, समुदाय, धर्म किंवा प्रदेशासाठी स्वतंत्र रेजिमेंट उभारली जाणार नाही.” परंतु, याचा अर्थ असा नाही की, भारतीय सेनेने आहिर सैनिकांच्या बलिदानाची दखल घेतलेली नाही. चुषुलमधील युद्धस्मारकाला ‘अहिर धाम’ असेही म्हटले जाते आणि त्यावर रेजांग ला येथे शहीद झालेल्या सर्व ११४ भारतीय सैनिकांची नावे कोरलेली आहेत. तसेच हरियाणातील रेवाडी येथे जिथून या कंपनीतील बहुतांश सैनिक आले होते त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करणारे आणखी एक स्मारक उभारले गेले आहे.
