रणथंबोर व्याघ्रप्रकल्पात काही वाघिणींना जिवंत म्हशी देण्याची प्रथा आहे. आजारी आणि वृद्धावस्थेकडे झुकलेल्या वाघिणींसाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. मात्र, यामुळे वाघिणींच्या नैसर्गिक शिकारीची सवय कमी होते. माणसांना घाबरण्याची सवय सुटते आणि त्यातूनच मग समोर येणाऱ्या व्यक्तींचा बळी जातो.

रणथंबोरमध्ये काय घडले?

सवाई माधोपूर येथील रणथंबोर व्याघ्रप्रकल्पात वाघिणीच्या हल्ल्यात एका वनसंरक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर एक वेगळीच गोष्ट समोर आली. या व्याघ्रप्रकल्पात सफारीदरम्यान एका पर्यटकाला याठिकाणी एक दृश्य दिसले. पदम तलाव, राजबाग, मलिक तलावांच्या आसपासच्या पर्यटन क्षेत्राकडे जाणाऱ्या जोगी महालपासून काही मीटर अंतरावर एका झुडूपाजवळ वाघ बसलेले होते. या परिसरातील भिंतीच्या मागे असलेल्या दोन लहान खोल्यांपैकी एका खोलीकडे वाघांचे लक्ष होते. यावेळी त्या बंदद्वारापलीकडे त्यांना म्हशींचा आवाज ऐकू आला. त्यांनी अधिक माहिती काढल्यानंतर ‘ॲरोहेड’ नावाच्या वाघिणीसाठी ते या म्हशींचा ‘आमिष’ म्हणून वापर करत असल्याचे त्यांना कळले. वनसंरक्षक देवेंद्रसिंग चौधरी या म्हशी ठेवलेल्या खोल्यांपासून अवघ्या काही मीटर अंतरावर होते आणि त्याठिकाणी त्यांच्यावर वाघाने हल्ला केला, ज्यात ते मृत्युमुखी पडले.

वाघांना जिवंत जनावर देणे योग्य आहे का?

जोगी महाल, रणथंबोर किल्ला आणि त्रिनेत्र गणेश मंदिराभोवती सुमारे पाच चौरस किलोमीटर परिसरात १५ वाघांचा वावर आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही या परिसरात अधिक आहे. यातील नऊ वाघांना जिवंत प्राण्यांच्या आहाराची सवय आहे. त्यातूनही सहा वाघांना थेट जन्मापासूनच अशी सवय आहे. त्यामुळेच वाघांच्या असामान्य वर्तनाच्या अनेक घटना समोर येऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. धोक्यातील या प्रजातीच्या संरक्षणासाठी अनेकदा मानवी हस्तक्षेप आवश्यक असला तरीही काही तज्ज्ञांच्या मते वृद्ध किंवा आजारी वाघांच्या आयुष्यात किती हस्तक्षेप करावा हे ठरवता आले पाहिजे. रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ‘मछली’ वाघांच्या नियमित आयुर्मानापेक्षा चार वर्षे अधिक जगली. वाघाचे जंगलातील आयुष्य साधारणपणे १३ किंवा १४ वर्षांचे असते. ‘मछली’ जवळजवळ २० वर्ष जगली. जिवंत आमिष खायला देण्याच्या पद्धतीमुळे हे घडले आणि ते चुकीचे आहे. हेच ‘सुंदरी’ या वाघिणीसोबत सुद्धा घडले. मात्र, यामुळे वाघांना त्यांच्या आमिषावर अवलंबून राहण्याची सवय लागते आणि माणसांना न घाबरता ते त्यांच्यावर हल्ला करतात.

इतर वाघांनाही ही सवय कशामुळे?

रणथंबोर व्याघ्रप्रकल्पातील ‘ॲरोहेड’ या वाघिणीच्या पोटी ‘कनकटी’ उर्फ ‘अन्वी’ आणि तिच्या दोन भावंडांचा जन्म झाला. गेल्या १३ महिन्यांत आजारी झालेल्या ‘ॲरोहेड’ या वाघिणीवर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. धावून शिकारीचा पाठलाग करता येत नसल्याने तिला जगण्यासाठी जिवंत जनावर देण्यात येत आहे. मात्र, हे जिवंत आमिष बरेचदा इतर वाघांनाही आकर्षित करते. ‘ॲरोहेड’च्या बछड्यांनाही कदाचित सहज शिकार मिळवण्याची सवय झाली असावी. रणथंबोरचे अधिकारी ‘ॲरोहेड’ला आजारातून बरे करून आणि तिला जिवंत जनावर देऊन अधिक काळ जगण्यास मदत करत असावेत. कारण ‘कनकटी’ उर्फ ‘अन्वी’ आणि तिचे बछडे लहान असल्याने त्यांना आईची म्हणजेच ‘ॲरोहेड’ची गरज होती. मात्र, हा निर्णय चुकीचाच होता.

‘ॲरोहेड’ची पार्श्वभूमी काय?

राजस्थानमधील रणथंबोरमधील ‘ॲरोहेड’ आठ वर्षांपेक्षा अधिक वयाची झाली. तलावाचे क्षेत्र या वाघिणीचे होते आणि ‘ॲरोहेड’ची बछडी असलेली ‘रिद्धी’ने या क्षेत्राचा ताबा घेतला. त्यामुळे ‘ॲरोहेड’ ही वाघीण जवळच्या नलघाटी परिसरात वावरत होती. ती लंगडताना दिसली आणि तिच्या कंबरेचे हाड मोडले होते. मात्र, अपंगत्व असूनही आणि अशाही परिस्थितीत तिने चौथ्यांदा बछड्यांना जन्म दिला. यात दोन मादी आणि एक नर बछड्याचा समावेश होता. तिची ही अवस्था पाहूनच ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांनी ‘ॲरोहेड’ला जिवंत म्हशीचे आमिष देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी ‘रिद्धी’ने सुद्धा तीन बछड्यांना जन्म दिला. त्यातही दोन मादी आणि एका नर बछड्याचा समावेश होता. त्यामुळे तेदेखील ‘ॲरोहेड’साठी असलेल्या आमिषांना खायला येऊ लागले. त्यानंतर लगेच दुसरी वाघीण ‘सुलताना’ हीदेखील तिच्या तीन बछड्यांसह त्याच झोनमध्ये येऊ लागलीे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rakhi.chavhan@expressindia.com