scorecardresearch

विश्लेषण: फुटबॉलमधील युरोप, दक्षिण अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारे आशियाई युग अवतरले का?

या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच आशियाई संघ फुटबॉलमधील युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघांच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकतात, असे वाटू लागले आहे.

विश्लेषण: फुटबॉलमधील युरोप, दक्षिण अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारे आशियाई युग अवतरले का?
फुटबॉलमधील युरोप, दक्षिण अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारे आशियाई युग अवतरले का? (फोटो – रॉयटर्स)

अन्वय सावंत

कतार येथे सुरू असलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांतच दोन धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. हे दोनही धक्कादायक निकाल आशियाई संघांनी नोंदवले. प्रथम सौदी अरेबियाने लिओनेल मेसीचा समावेश असलेल्या अर्जेंटिनाचा २-१ असा पराभव केला. त्यानंतर जपानने जर्मनीला अशाच फरकाने पराभूत केले. या दोन्ही सामन्यांत आशियाई संघ पिछाडीवर होते. मात्र, कोणालाही अपेक्षा नसताना त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि विजय मिळवले. शुक्रवारच्या आणखी एका सामन्यात इराणने पाठोपाठ दोन गोल करून वेल्सचा पाडाव केला. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच आशियाई संघ फुटबॉलमधील युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघांच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकतात, असे वाटू लागले आहे.

आशियाई संघांचा विश्वचषकातील इतिहास कसा आहे?

‘फिफा’ विश्वचषक स्पर्धांवर युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील देशांनी वर्चस्व गाजवले आहे. युरोप आणि दक्षिण अमेरिकेबाहेरील संघाला अजूनही विश्वचषक जिंकता आलेला नाही. आतापर्यंतच्या २१ विश्वचषक स्पर्धांमध्ये या दोन खंडांबाहेरील संघांना दोन वेळाच उपांत्य फेरीचा टप्पा गाठता आला आहे. केवळ १३ संघांचा समावेश असलेल्या १९३०च्या विश्वचषकात अमेरिकेने, तर २००२मध्ये यजमान दक्षिण कोरियाने उपांत्य फेरी गाठली होती. आफ्रिका आणि उत्तर अमेरिकन देशांनीही विश्वचषक स्पर्धांमध्ये चमक दाखवली आहे. मात्र, सर्वोच्च स्तरावर आशियाई संघांची गुणवत्ता तोकडी पडते असा आजवरचा इतिहास आहे.

तारांकित खेळाडूंच्या कमतरतेचा आशियाई संघांना फटका बसतो का?

दक्षिण अमेरिकन, आफ्रिकन आणि उत्तर अमेरिकन देशांमधील बहुतांश खेळाडू हे युरोपातील सर्वोत्तम लीगमध्ये आघाडीच्या संघांचे प्रतिनिधित्व करतात. आशियातील देश मात्र सातत्याने तारांकित खेळाडू तयार करण्यात अपयशी ठरतात. गेल्या दोन दशकांत जी-संग पार्क (दक्षिण कोरिया), शुनसुके नाकामुरा (जपान), अली डेई (इराण), हिडेटोशी नकाटा (जपान), केसुके होंडा (जपान) आणि आता सॉन ह्युंग-मिन (दक्षिण कोरिया) अशा काही खेळाडूंचा अपवाद वगळता आशियाई देशांच्या संघांमध्ये तारांकित फुटबॉलपटूंची कमतरता जाणवते. आशियाई देशांची लोकसंख्या लक्षात घेता, दर्जेदार फुटबॉलपटू तयार करण्यास त्यांना वाव आहे. मात्र, खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना सर्वोत्तम प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळवून देणे यात आशियाई देश कमी पडतात.

विश्लेषण: फुटबॉलमध्ये ‘ऑफसाइड’ म्हणजे काय? २०२२ ‘फिफा’ विश्वचषकात कोणते तंत्रज्ञान वादग्रस्त ठरत आहे?

२००२च्या विश्वचषकातील कोरियाची कामगिरी का खास होती?

२००२च्या ‘फिफा’ विश्वचषकाचे दक्षिण कोरिया आणि जपान यांनी संयुक्त यजमानपद भूषवले होते. आशियात विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. यजमान दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या संघांना बाद फेरी गाठण्यात यश आले होते. विशेषत: कोरियाने कोणलाही अपेक्षा नसताना उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. युरोप आणि दक्षिण अमेरिकेबाहेरील संघाची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. दक्षिण कोरियाच्या संघात तारांकित खेळाडूंचा समावेश नव्हता. सिओल कि-हिओन आणि आहन जुंग-हवान या दोनच खेळाडूंना आशियाबाहेरील लीगमध्ये खेळण्याचा अनुभव होता. मात्र, डच प्रशिक्षक गस हिडिंक यांची अचूक योजना आणि संघरचना यांमुळे कोरियाच्या संघाला अनपेक्षित यश मिळवता आले होते.

कोरियन संघ भक्कम बचावासाठी ओळखला जायचा. त्यांनी साखळी फेरीत केवळ एक आणि स्पर्धेच्या एकूण सहा सामन्यांत मिळून केवळ तीन गोल दिले होते. त्यांनी साखळी फेरीत पोलंड आणि पोर्तुगालला पराभवाचे धक्के दिले होते, तर अमेरिकेविरुद्धचा सामना बरोबरीत राखला होता. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांनी इटलीवर मात केली होती. चुरशीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोरियाने स्पेनवर शूटआऊटमध्ये ५-३ असा विजय मिळवला होता. मात्र, उपांत्य फेरीत त्यांना जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला. परंतु कोरियन संघाची कामगिरी आजही फुटबॉल रसिकांच्या लक्षात आहे.

पात्रतेचे नियम आशियाई संघांच्या विरोधात आहेत का?

विश्वचषक फुटबॉल स्पर्धांसाठीच्या पात्रतेचे नियम हे काहीसे आशियाई संघांच्या विरोधात आहेत. विश्वचषकाच्या आशियाई पात्रता स्पर्धेत ४५ संघ सहभागी होतात. मात्र, विश्वचषकासाठी आशियातून केवळ चार ते पाच संघच पात्र ठरू शकतात. याउलट युरोपातून पात्रता स्पर्धेत ५५ संघ सहभागी होतात. यापैकी १३ संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आशियाई संघांना पुरेशा जागा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. युरोपात अधिक दर्जेदार संघ आहेत आणि ते पात्र ठरल्यास विश्वचषकाचा दर्जा वाढतो, असे म्हटले जाते. मात्र, पात्रतेच्या या नियमांमुळे आशियातील संघांची प्रगती खुंटते. २०२६च्या विश्वचषकात ४८ संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे आशियाई संघांचीही संख्या वाढेल.

विश्लेषण: कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भरपाई वेळ का वाढतोय?

यंदाची स्पर्धा आशादायी चित्र निर्माण करते का?

यंदाच्या स्पर्धेत सौदी अरेबिया आणि जपान यांनी धक्कादायक निकाल नोंदवले. तसेच इराणच्या संघानेही आपली गुणवत्ता सिद्ध करताना वेल्सवर २-० असा विजय मिळवला. या निकालांमुळे आशियाई फुटबॉलसाठी आशादायी चित्र निर्माण झाले आहे. तसेच आता विविध देशांचे काही नामांकित खेळाडू कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर का होईना, पण आशियाई देशांमधील लीगमध्ये खेळण्यास पसंती देतात. त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव युवा आशियाई खेळाडूंसाठी फायदेशीर ठरतो. तसेच जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचे काही खेळाडू युरोपातील लीगमध्ये खेळत आहेत. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या खेळावर दिसून येतो आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 08:24 IST

संबंधित बातम्या