-अन्वय सावंत

कतारमध्ये सुरू असलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला जगभरातील चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. तसेच आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी विविध देशांतील चाहत्यांनी कतार गाठले आहे. खेळाडूंनी विश्वचषकाबाबत काही तक्रारी केल्याचे ऐकायला मिळालेले नाही. एकंदरीतच कतारने विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, यजमान कतारच्या संघाला मैदानावर फारशी चमक दाखवता आली नाही. अ-गटात समाविष्ट असलेल्या कतारचे आव्हान केवळ पाच दिवस आणि दोन सामन्यांनंतरच संपुष्टात आले. विश्वचषकाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात अन्य कोणताही यजमान देश इतक्या लवकर स्पर्धेबाहेर गेला नव्हता. या पार्श्वभूमीवर, विश्वचषकाच्या यापूर्वीच्या यजमानांनी कशी कामगिरी केली होती, याचा आढावा.

England cricket great Derek Underwood dies
व्यक्तिवेध : डेरेक अंडरवूड
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
IPL 2024 PBKS vs DC Rishabh Pant
IPL 2024 PBKS vs DC: रिव्ह्यू गमावला, कॅच सुटला, सामनाही हरले- अपघातापूर्वीच्या ऋषभ पंतच्या सामन्यात काय घडलं होतं?

आकडे काय सांगतात?

यंदाच्या स्पर्धेपूर्वी २१ विश्वचषक स्पर्धा झाल्या होत्या आणि २२ देशांनी (२००२च्या विश्वचषकाचे जपान आणि कोरिया संयुक्त यजमान) विश्वचषकाचे आयोजन केले होते. यापैकी २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेचा अपवाद वगळता, सर्वच यजमान देशांना किमान पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात यश आले होते. २०१०च्या स्पर्धेत यजमान दक्षिण आफ्रिकेच्या गटात फ्रान्स आणि उरुग्वे या बलाढ्य संघांसह मेक्सिकोचाही समावेश होता. त्यांनी साखळी फेरीत फ्रान्सला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, अखेरीस त्यांना या गटात तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे ते आगेकूच करू शकले नाहीत.
साखळी फेरीचा टप्पा ओलांडणाऱ्या यजमानांपैकी ६ देशांनी घरच्या मैदानांवर झालेल्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. तसेच दोन वेळा यजमानांनी उपविजेतेपद मिळवले आहे. मात्र, केवळ या आकड्यांवरून कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. बहुतांश वेळा ज्या देशांना फुटबॉलचा मोठा इतिहास आहे, तिथेच विश्वचषक स्पर्धांचे आयोजन होते. त्यामुळे हे संघ विश्वचषक जिंकण्याची शक्यता मोठी असते.

सुरुवातीच्या पर्वांमध्ये यजमानांची कामगिरी कशी होती?

उरुग्वेने १९३०मध्ये पहिल्यावहिल्या विश्वचषकाचे आयोजन केले होते, तर दुसरी विश्वचषक स्पर्धा १९३४ मध्ये इटलीमध्ये झाली होती. या दोनही स्पर्धांचे यजमानांनी जेतेपद मिळवले होते. १९३८ मध्ये यजमान फ्रान्सला त्यावेळच्या गतविजेत्या इटलीने उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते. पुढे इटलीने विजयी घोडदौड कायम राखत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले होते.
सुरुवातीच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये प्रवास हे बहुतांश संघांपुढील आव्हान असायचे. या आव्हानामुळेच उरुग्वे येथे झालेल्या पहिल्या विश्वचषकात खेळण्यास अनेक युरोपीय संघांनी नकार दिला होता. तसेच जे युरोपीय संघ या स्पर्धेत सहभागी झाले, त्यांना बोटींमधून दक्षिण अमेरिकेचा प्रवास करावा लागला. हा प्रवास १५-२० दिवस चालायचा. मात्र, वर्षांगणिक आणि स्पर्धांगणिक ही आव्हाने कमी होत गेली.

यजमानांची आजवरची कामगिरी

१९३० : यजमान उरुग्वे – जेतेपद (अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर ४-२ असा विजय)
१९३४ : इटली – जेतेपद (अंतिम सामन्यात चेकोस्लोव्हाकियावर २-१ अशी मात)
१९३८ : फ्रान्स – उपांत्यपूर्व फेरी (इटलीकडून १-३ असा पराभव)
१९५० : ब्राझील – उपविजेते (अंतिम फेरीसाठी ब्राझीलसह उरुग्वे, स्वीडन आणि स्पेन हे संघ पात्र ठरले. या फेरीत उरुग्वेने तीनपैकी दोन सामने जिंकले व एक सामना बरोबरीत राखत जेतेपद मिळवले. ब्राझीलने दोन सामने जिंकले, पण उरुग्वेविरुद्धचा सामना गमावला. त्यामुळे ब्राझीलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.)
१९५४ : स्वित्झर्लंड – उपांत्यपूर्व फेरी (ऑस्ट्रियाकडून ५-७ असा पराभव)
१९५८ : स्वीडन – उपविजेतेपद (अंतिम सामन्यात ब्राझीलकडून २-५ असा पराभव)
१९६२ : चिली – तिसरे स्थान (तिसऱ्या स्थानाच्या लढतीत युगोस्लाव्हियावर १-० अशी मात)
१९६६ : इंग्लंड – जेतेपद (अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीला ४-२ असे नमवले)
१९७० : मेक्सिको – उपांत्यपूर्व फेरी (इटलीकडून १-४ असा पराभव)
१९७४ : पश्चिम जर्मनी – जेतेपद (अंतिम सामन्यात नेदरलँड्सचा २-१ असा पराभव)
१९७८ : अर्जेंटिना – जेतेपद (अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर ३-१ अशी मात)
१९८२ : स्पेन – दुसरी साखळी फेरी (दुसऱ्या साखळी फेरीत यजमान स्पेनचा इंग्लंड आणि पश्चिम जर्मनीसह ब-गटात समावेश होता. स्पेनने इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले, पण जर्मनीकडून स्पेनचा १-२ पराभव झाला. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरी गाठता आली नाही.)
१९८६ : मेक्सिको – उपांत्यपूर्व फेरी (पश्चिम जर्मनीकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये १-४ असा पराभव)
१९९० : इटली – तिसरे स्थान (तिसऱ्या स्थानाच्या लढतीत इंग्लंडवर २-१ अशी मात)
१९९४ : अमेरिका – उपउपांत्यपूर्व फेरी (ब्राझीलकडून ०-१ असा पराभव)
१९९८ : फ्रान्स – जेतेपद (अंतिम सामन्यात ब्राझीलचा ३-० असा पराभव)
२००२ : दक्षिण कोरिया व जपान – दक्षिण कोरिया चौथे स्थान (तिसऱ्या स्थानाच्या लढतीत तुर्कीकडून ३-२ असा पराभव), जपान उपउपांत्यपूर्व फेरी (तुर्कीकडून ०-१ असा पराभव)
२००६ : जर्मनी – तिसरे स्थान (तिसऱ्या स्थानाच्या लढतीत पोर्तुगालवर ३-१ अशी मात)
२०१० : दक्षिण आफ्रिका – साखळी फेरी (एक विजय, एक पराभव, एक बरोबरी : गटात तिसरे स्थान)
२०१४ : ब्राझील – चौथे स्थान (तिसऱ्या स्थानाच्या लढतीत नेदरलँड्सकडून ०-३ असा पराभव. त्यापूर्वी उपांत्य फेरीत जर्मनीकडून १-७ असा धुव्वा)
२०१८ : रशिया – उपांत्यपूर्व फेरी (क्रोएशियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव)