राजकारणात कोणत्या गोष्टीला कधी, कशा प्रकारे महत्त्व येईल हे सांगता येत नाही. आपल्या देशात कबुतरे आणि श्वानांवरून राजकारण होऊ शकते तर पश्चिमेत फ्रान्समध्ये वातानुकूलित यंत्रणा अर्थात एअर कंडिशनिंगवरून राजकारण पेटले आहे.
एअर कंडिशनिंगवरून राजकीय वादळ काय?
युरोपमध्ये उष्णतेची लाट आली आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यातील तापमानात गतवर्षीपेक्षा काकणभर वाढच होत आहे. अशा वातावरणात तगून राहण्यासाठी आणि काहिलीपासून जीव वाचविण्यासाठी एअर कंडिशनर गरजेचा आहे, असे काही जणांचे म्हणणे आहे. तर फ्रान्समध्ये काही जणांचा याला तीव्र विरोध आहे.
वादाला सुरुवात कुठून झाली?

हा वाद उष्णतेने तडाखा बसलेल्या जून महिन्याच्या अखेरीस सुरू झाला. अति-उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ले पेन यांनी फ्रेंच टीव्हीवर सांगितले की एअर कंडिशनिंग जीव वाचवते. त्यांनी शाळा आणि रुग्णालयांमध्ये एसी नसणे हे अत्यंत हास्यास्पद असल्याचे म्हटले. त्यांच्या या विधानावरून वादाला तोंड फुटले. उष्णतेच्या लाटेदरम्यान १,८०० शाळा बंद कराव्या लागल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास, देशभरात एसी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावर लगेचच फ्रान्सच्या ग्रीन पार्टीकडून प्रतिक्रिया आली. पक्ष नेत्या मरीन टॉडलिये यांनी फ्रान्स इन्फो रेडिओवर सांगितले की त्या शाळा आणि रुग्णालयांमध्ये एसीच्या विरोधात नाहीत, पण तोच एकमेव उपाय असू नये, यावर त्यांनी जोर दिला. त्यांचा पक्ष ऊर्जा-कार्यक्षम इमारतींमध्ये जास्त गुंतवणुकीची मागणी करत आहे.

किती लोकांकडे एसी?

‘ओपिनिअन वे’च्या अलीकडच्या सर्वेक्षणानुसार, निम्म्याहून थोड्या अधिक फ्रेंच लोकांच्या मते सर्व सार्वजनिक ठिकाणी एसी असायला हवा. तेथील घरांमध्ये तर एसी फारच दुर्मीळ आहे. फ्रान्समधील फक्त २५ टक्के घरांमध्ये एसी आहे, तर अमेरिकेत हे प्रमाण ९० टक्के आहे. अर्थतज्ज्ञ निकोलस बुजू यांच्या मते, कडाक्याच्या उन्हाळ्यातील ही गंभीर समस्या आहे. त्यांनी ‘ला फिगारो’ दैनिकातील लेखात लिहिले की काहिलीमुळे काम करणे अवघड होते, अभ्यास करणे अवघड होतं, आणि हवामान बदलाशी लढणेही अवघड होते. फ्रान्समधील बहुतेक वीज ही अणुऊर्जेतून तयार होते. म्हणजेच एसी वापरला तरी हरितगृह वायू उत्सर्जन वाढत नाही. तरीही, एसी यंत्रांमध्ये वापरले जाणारे रेफ्रिजरंट्स गळून हवामान बदल आणखी गंभीर करू शकतात.

एसीला विरोध का?

पॅरिसमध्ये दहा सर्वात उष्ण उन्हाळ्यांपैकी आठ मागील दशकात झाले आहेत. तरीही, ३२ अंश सेल्शियस तापमानात दुपारी अनेक पॅरिसवासी सेन नदीच्या काठावर निवांत बसलेले दिसायचे. लोकांनी उन्हाळ्याशीही जुळवून घेतले होते.

युरोपमधील केवळ १० पैकी एका घरातच एअर कंडिशनर आहे. चीन, जपान किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये मात्र ९० टक्के घरांमध्ये एसी आहे. युरोपियन नेत्यांनी बहुतांश या तंत्रज्ञानाला नाकारले आहे किंवा त्याच्या वापरावर बंधने घातली आहेत. उदाहरणार्थ, स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी एसीचे तापमान २६ डिग्री सेल्शियसपेक्षा कमी ठेवू नये असा नियम लागू केला आहे. अशाच उपाययोजना आधीच इटली व ग्रीसमध्ये करण्यात आल्या आहेत.

हे उष्णतेच्या लाटेत विरोधाभासी पाऊल वाटू शकते, पण यामागचे कारण म्हणजे युरोप तीव्र ऊर्जा संकटातून जात आहे. रशियाने खंडाला मिळणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर टाच आणली आहे. त्यामुळे युरोपमध्ये १५ टक्के गॅस वापर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच अनेक देशांनी पॅरिस हवामान करार लक्षात घेऊन एसीचा मर्यादित वापर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. २०३० पर्यंतच्या पॅरिस करारातील उत्सर्जन लक्ष्यांवर त्यांची नजर आहे.

सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकता काय?

युरोपमध्ये पारंपरिक घरे दगड, विटा आणि जाड भिंतींनी बांधलेली असतात. यामुळे उन्हाळ्यात घरे थंड राहतात आणि हिवाळ्यात उबदार. त्यामुळे एसीची गरजच भासत नसे. बराच काळ युरोपमध्ये तीव्र उष्णतेचे उन्हाळे अपवादात्मक समजले जात होते. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियमसारख्या देशांत उन्हाळा तुलनेने लहान आणि सहन करण्याजोगा होता. उष्णकटिबंधीय हवामान असलेल्या देशांच्या तुलनेत येथे एसीवर अवलंबून राहण्याची सवय कधीच लागली नाही. फ्रेंच व युरोपियन लोक “नैसर्गिक हवा” पसंत करतात. खिडकी उघडून हवा खेळू देणे हा संस्कृतीचा भाग आहे. अनेकांना एसीमुळे “हवा कृत्रिम वाटते, डोकेदुखी होते, सर्दी-खोकला वाढतो” असा अनुभव आलेला आहे. ऑफिस / सार्वजनिक ठिकाणी एसीच्या तापमानावरून सतत वाद होतात.

युरोपियन लोकांचा भर ऊर्जासंवर्धनावर असतो. त्यांना एसी हे अत्याधिक वीज वापर आणि प्रदूषणाचे साधन वाटते. एसी बसवणे आणि त्याचा नियमित वीजखर्च महागडा वाटतो. लोक एसीला अनावश्यक चैनीची वस्तू मानतात.