Millionaires are flocking to Dubai दुबई हे जगभरातील अब्जाधीश आणि कोट्याधीशांसाठी एक मोठे आकर्षण केंद्र म्हणून उदयास येत आहे. एकेकाळी लोक दुबईत केवळ खरेदी, लक्झरी अनुभव आणि सुट्ट्यांसाठी जात होते. मात्र, आता श्रीमंत लोक स्थायिक होण्यासाठी दुबईची निवड करत आहेत. जगभरातील अब्जाधीश आपला देश सोडून दुबईकडे धावत आहेत. काय आहे त्यामागील कारण? लाखो अब्जाधीश वास्तव्यासाठी दुबईचीच निवड का करत आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात.
दुबईचीच निवड का?
- दुबईत कोणताही उत्पन्न कर (Income tax) नाही, राजकीय स्थिरता आहे, गुन्हेगारीचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे आणि व्यवसाय सुरू करणे किंवा चालवणे खूप सोपे आहे.
- त्याशिवाय इथे लक्झरी हा रोजच्या जीवनाचा एक भाग आहे.
- ‘हेनली अँड पार्टनर्स’ (Henley & Partners) या सल्लागार फर्मनुसार, या वर्षी संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये सुमारे ९,८०० अब्जाधीश येण्याची शक्यता आहे, ही संख्या जगात इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा सर्वाधिक आहे.

‘हेनली अँड पार्टनर्स’नुसार, दुबईमध्ये आधीच ८१,२०० अब्जाधीश राहतात, त्यामुळे दुबई श्रीमंत रहिवाशांसाठी जगातील शीर्ष २० शहरांपैकी एक ठरले आहे. परंतु, ही संख्या वेगाने वाढत आहे. अशी वाढ यापूर्वी जगाने यापूर्वी कधीही पाहिली नाही. ‘हेनली अँड पार्टनर्स’नुसार, २०२४ मध्ये जगभरात १,३४,००० अब्जाधीशांनी स्थलांतर केले. २०२५ मध्ये ही संख्या वाढून १,४२,००० होण्याचा अंदाज आहे. जर यातील पाच टक्के लोकांनी जरी दुबईची निवड केली, तरी एका वर्षात सुमारे ७,१०० नवीन अब्जाधीश दुबईत येतील.
विश्लेषकांच्या मते, अब्जाधीश दुबईत स्थायिक होण्यासाठी आल्यास त्यांच्याबरोबर येणाऱ्या संपत्तीमुळे दुबईच्या अर्थव्यवस्थेत ७.१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पैसा येईल. हा आकडा २०२४ मधील एकूण परदेशी थेट गुंतवणुकीच्या (Foreign Direct Investment) अधिक आहे, असे ‘गल्फ बिझनेस’ने सांगितले आहे. ‘बेटरहोम्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस हार्डिंग यांनी ‘गल्फ बिझनेस’ला सांगितले की, “दुबई जगातील सर्वात आकर्षक ‘प्लग-अँड-प्ले’ शहर ठरत आहे.” ते म्हणाले, “बदल झालेला एक महत्त्वाचा भाग म्हणजे, हे लोक इथे आता काही काळासाठी येत नसून स्थायिक होण्यासाठी येत आहेत.”
श्रीमंत लोक दुबईत स्थलांतर का करत आहेत?
स्थलांतराचे मुख्य कारण आहे दुबईचे शून्य उत्पन्न कर (Zero income tax) धोरण. हे जगात दुर्मीळ आहे. कारण जगात संपत्तीवर कडक नियम लादण्यात येत आहेत. ‘स्कायबाउंड वेल्थ मॅनेजमेंट’चे प्रमुख माईक कोडी यांनी ‘एएफपी’ला सांगितले की, त्यांच्या अनेक ग्राहकांना वाटते की, “इतर देशात त्यांच्यावर जास्त कर लावला जातो, जास्त तपासणी केली जाते आणि कमी सुविधा दिल्या जातात. दुबईमध्ये असलेली संपत्ती लपवली जात नाही, ती एक सामान्य बाब आहे. लंडनमध्ये माझे ग्राहक त्यांच्या संपत्तीबद्दल चर्चा करत नाही, मात्र, दुबईमध्ये ते मुक्तपणे जगू शकतात.”
गोल्डन व्हिसा (Golden Visa) योजनेनेदेखील एक महत्त्वाचा बदल घडवून आणला आहे. या अंतर्गत श्रीमंत किंवा कुशल परदेशी लोकांना १० वर्षांची रहिवासी (residency) सुविधा दिली जाते. त्यामुळे उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना शहरात आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळते. दुबईमध्ये व्यवसायदेखील सहज चालतो. ‘हेनली अँड पार्टनर्स’चे फिलिप अमारांटे म्हणाले, इथे रिअल इस्टेट पण महत्त्वाचा घटक आहे. दुबईचा लक्झरी मालमत्ता बाजार तेजीत आहे. २०२४ मध्ये १० दशलक्ष डॉलर्स किंवा त्याहून अधिक किमतीची ४३५ घरे विकली गेली, हा आकडा लंडन आणि न्यूयॉर्कच्या एकत्रित विक्रीपेक्षा जास्त आहे.
मोन्टे कार्लो किंवा स्वित्झर्लंडसारख्या युरोपियन शहरांच्या तुलनेत दुबई अजूनही परवडणारे वाटते. ‘नाइट फ्रँक’ कंपनीचे फैसल दुर्रानी यांनी सांगितले, “मोन्टे कार्लो किंवा स्वित्झर्लंडमधील खरेदीदार १०० दशलक्ष डॉलर्स किमतीचे अपार्टमेंट शोधत येतात. दुबईमध्ये त्याच किमतीत तुम्ही पूर्ण इमारत खरेदी करू शकता.”
दुबईची जीवनशैली
अनेक अब्जाधीशांसाठी हे आकर्षण केवळ पैशांपुरते मर्यादित नाही. दुबई अशी जीवनशैली देते, जी इतरत्र मिळणे कठीण आहे. दुबईत उत्कृष्ट दर्जाच्या शाळा, जागतिक दर्जाची आरोग्यसेवा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेची भावना आहे. या सर्व बाबी एकाच ठिकाणी मिळणे कठीण आहे. अमेरिकेतून स्थलांतरित झालेले ‘पॅडको रिअल इस्टेट’चे कार्यकारी अधिकारी मॅक्स मॅक्सवेल यांनी ‘बिल्डिंग वेल्थ विथ नो बॉर्डर्स’ पॉडकास्टवर सांगितले, “आपण सर्वजण एका जीवनशैलीचा पाठलाग करत असतो, प्रत्येकासाठी त्याचा अर्थ वेगळा असतो. अमेरिकेला सोडून युएईमध्ये आल्यानंतर मला समजले की माझ्या कुटुंबाला त्याच पैशांमध्ये तुलनेने चांगली जीवनशैली मिळू शकते.”
दुबईची लोकप्रियता
गेल्या काही वर्षांमध्ये दुबई मोठ्या संख्येने श्रीमंतांना, कलाकारांना आकर्षित करत आहे. दुबईमध्ये इनडोअर स्की क्षेत्र असलेले मोठे मॉल, जगातील सर्वात उंच इमारत आणि ‘पाम’ नावाचे कृत्रिम बेट, जिथे मोठमोठे पंचतारांकित हॉटेल्स आहेत. या शहरातील जलद विकासावर मोठी टीकाही झाली आहे. याचे कारण म्हणजे कमी पगारावर काम करणारे स्थलांतरित कामगार. ते दुबईतील अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, मात्र त्यांना फार कमी पगारावर याठिकाणी काम करावे लागत आहे.