Google AI layoffs एआय टुलच्या वापरामुळे हजोर कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागत आहेत. त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचाही फटका आयटी सेक्टरला बसल्याचे पहायला मिळत आहे. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. Google ने आपल्या २०० कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले आहे. AI कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि पारदर्शकतेची मागणी केल्यामुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

‘Wired’ च्या अहवालानुसार, Google ला AI मॉडेल्स विकसित आणि प्रशिक्षित करण्यासाठी मदत करणाऱ्या २०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. Meta किंवा Google ने थेट ही कपात केली नसून, GlobalLogic या आउटसोर्सिंग कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. नेमके प्रकरण काय? कंपनीने Gemini अन् AI चे ट्रेनिंग देणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून का काढले? जाणून घेऊयात…

(छायाचित्र-एआय जनरेटीव्ह)

Google ची २०० कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई

  • अहवालानुसार, २०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. GlobalLogic या संस्थेने या कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचे म्हटले आहे.
  • ही संस्था Google च्या AI रेटिंग प्रोजेक्ट्समध्ये विशेषज्ज्ञ आहे. या कर्मचाऱ्यांनी असा दावा केला आहे की, Google ने त्यांच्याकडून AI मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी काम करून घेतले आणि आता यामुळेच त्यांची नोकरी धोक्यात आली आहे.
  • भविष्यात हे प्रशिक्षित मॉडेल्स या कंत्राटी कर्मचाऱ्यांची जागा घेऊ शकतात, ज्यामुळे या कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव वाढला आहे.

Google च्या AI प्रशिक्षणात महत्त्वाची भूमिका

हे कंत्राटी कर्मचारी ‘सुपर रेटर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशेष गटाचा भाग होते. या तज्ज्ञांवर AI ने तयार केलेल्या प्रतिसादांचे मूल्यांकन करण्याची आणि त्यांना अधिक नैसर्गिक व अचूक बनवण्याची जबाबदारी होती. यापैकी अनेकांकडे मास्टर्स आणि पीएचडी सारख्या उच्च पदव्या आहेत. ते शिक्षण, लेखन आणि कला अशा विविध क्षेत्रांतून आलेले आहेत. Google च्या AI उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यात त्यांच्या कामाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

त्यांच्या भूमिकेत जनेरेटिव्ह AI वापरून शोध परिणामांचा सारांश देणाऱ्या ‘AI Overviews’चादेखील समावेश असतो. GlobalLogic मध्ये काम करणाऱ्या अलेक्स नावाच्या एका रेटरने सांगितले, “आम्ही रेटर्स म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.” ते म्हणाले, “इंजिनीअर्सकडे कोडमध्ये बदल करून आणि इतर कामे करून मॉडेल्स योग्य प्रतिसाद देतात की नाही, हे जाणून घेण्याचा वेळ नसतो. मात्र, आम्ही समुद्रकिनाऱ्यावरच्या जीवरक्षकांसारखे (Lifeguards) आहोत. आम्ही हे सुनिश्चित करतो की काहीही चुकीचे होऊ नये.”

Google कर्मचाऱ्यांची नोकर कपातीवर प्रतिक्रिया

“मला अचानक काढून टाकण्यात आले. मी कारण विचारले, तर ते म्हणाले की ‘प्रोजेक्ट रॅम्प-डाउन’ झाला आहे. त्याचा नेमका अर्थ काय हे मलाही कळला नाही,” असे अँड्र्यू लॉझॉन म्हणाले. त्यांनी सांगितले की १५ ऑगस्ट रोजी त्यांना कामावरून काढल्याचा ईमेल आला. त्यांनी मार्च २०२४ मध्ये GlobalLogic मध्ये कामाला सुरुवात केली होती.

नोकरी कपातीपूर्वी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

मागील वर्षापासून, काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन चांगले वेतन आणि पारदर्शकता (Transparency) मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. इतरांनी कामाच्या दबावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना कामासाठी ठराविक वेळेची मर्यादा दिली जात होती, ज्यामुळे गुणवत्तेऐवजी वेगावर लक्ष केंद्रित करावे लागत होते. एका गटाने ‘अल्फाबेट वर्कर्स युनियन’ (Alphabet Workers Union) अंतर्गत युनियन (संघटन) स्थापन करण्याचा विचार केला होता, परंतु कर्मचाऱ्यांचा दावा आहे की या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले गेले नाही. या कर्मचाऱ्यांनी अमेरिकेच्या कामगार मंडळाकडे (US labour board) तक्रार दाखल केली असून, कामकाजाच्या स्थितीबद्दल बोलल्यामुळे त्यांना कामावरून काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वेतनातील असमानता

कर्मचाऱ्यांच्या वेतनात असमानता वाढत असल्याचाही अहवाल आहे. GlobalLogic ने थेट कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रति तास २८ डॉलर्स ते ३२ डॉलर्स मिळत होते, तर ‘Third-party agencies’मार्फत आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्याच कामासाठी १८ डॉलर्स ते २२ डॉलर्स दिले जात होते. ज्या रेटर्सकडे उच्च पदव्या नव्हत्या, त्यांना त्याहून कमी वेतन मिळत होते. त्यांना कधीकधी अधिक कठीण प्रकल्पांवर काम करावे लागत असे.

काही उर्वरित कर्मचारी म्हणतात की त्यांना अडकून पडल्यासारखे वाटत आहे. बहुतांश लोक अजूनही अल्प-मुदतीच्या करारांवर (short-term contracts) काम करत आहेत, ज्यात कोणतेही फायदे किंवा सशुल्क सुट्ट्या मिळत नाहीत. अनेकांनी सांगितले की, आता त्यांना कोणतीही चिंता व्यक्त करण्यास भीती वाटते, कारण त्यांनाही कामावरून काढले जाण्याची शक्यता आहे. एका रेटरने म्हटले की, “एकंदरीत वातावरण खूपच दडपशाहीचे आहे.”

Google ने या नोकर कपातीविषयी काय म्हटले?

Google ने नोकर कपातीमध्ये थेट सहभाग असल्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट केले की हे कर्मचारी GlobalLogic चे होते. “कर्मचारी म्हणून, GlobalLogic आणि त्यांचे उप-कंत्राटदार त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरी आणि कामकाजाच्या परिस्थितीसाठी जबाबदार आहेत,” असे Google च्या प्रवक्त्या कोर्टनी मेंसिनी यांनी सांगितले. Google कंपनी OpenAI आणि Microsoft सारख्या प्रतिस्पर्धकांशी स्पर्धा करण्यासाठी AI मध्ये गुंतवणूक वाढवत आहे, अशाच वेळी ही कपात झाली आहे.

सीईओ सुंदर पिचाई यांनी अलीकडेच कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढवावी असे सांगितले होते आणि कमी संसाधनांमध्ये अधिक काम करण्याच्या गरजेवर भर दिला होता. कामगार तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, हा वाद AI विकासातील मोठ्या नैतिक समस्यांना (ethical concerns) दर्शवतो, जिथे चॅटबॉट प्रशिक्षणामागे असलेले कर्मचारी अनेकदा कमी वेतन, अस्थिरता यांसारख्या समस्यांना सामोरे जातात.

AI च्या युगात नोकरीची असुरक्षितता

कर्मचाऱ्यांना भीती आहे की ते, स्वतःलाच कामावरून काढण्यासाठी AI ला प्रशिक्षण देत आहेत. WIRED ने पाहिलेल्या अंतर्गत दस्तऐवजांनुसार, GlobalLogic स्वतःच असे सिस्टीम विकसित करत आहे, जे मानवी कंत्राटी कर्मचारी सध्या करत असलेली रेटिंगची कामे स्वयंचलित (Automate) करतील. “एकंदरीत वातावरण दडपशाहीचे आहे,” असे अलेक्स म्हणाले. “आम्ही संघटित होऊ शकत नाही. आम्ही बोललो, तर आम्हाला कामावरून काढले जाईल किंवा आमची नोकरी जाईल, अशी भीती आम्हाला वाटते.”