कोविड काळात २२ मार्च २०२० रोजी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत अनेक कंपन्यांनी विशेषतः आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. जवळपास पाच वर्षांपासून कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असल्याने त्यांना या कामाची सवय झाली आहे. परंतु, अनेक नामांकित आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची ही सुविधा बंद केली आहे आणि त्यांनी हायब्रिड मॉडेल कायम ठेवले आहे. मात्र, जगातील सर्वांत मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या गूगलनेही अशाच स्वरूपाचा निर्णय जाहीर केला आहे. गूगलने नक्की काय म्हटले आहे? गूगलने कर्मचाऱ्यांना कोणता इशारा दिला? ‘वर्क फ्रॉम होम’चा नियम न पाळल्यास कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाईल का? त्याविषयी जाणून घेऊ.

वर्क फ्रॉम होम

पाच वर्षांपासून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांना ना केवळ कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळाली, तर प्रवासाचा खर्च आणि इतर खर्चही वाचला. अनेक कंपन्यांनी ही सुविधा बंद केली आहे, तर अशाही अनेक आयटी कंपन्या आहेत की, जिथे अजूनही ही सुविधा दिली जात आहे; पण त्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. जसे की, काही कंपन्यांनी आठवड्यातून दोन ते तीन कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे.

जगातील सर्वांत मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘गूगल’ने ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्याचे निर्देश दिले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘गूगल’चा निर्णय काय?

जगातील सर्वांत मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘गूगल’ने ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्याचे निर्देश दिले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, गूगलने त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करणाऱ्यांनी कंपनीत परत यावे; अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकण्याचा इशारा कंपनीकडून करण्यात आल्याची माहिती आहे. गूगलबरोबर, अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी आणि कामकाज वाढवण्यासाठी अशा स्वरूपाचा निर्णय घेतला आहे.

‘गूगल’ने नक्की काय म्हटले?

‘सीएनबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, गूगलने त्यांच्या वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले आहे. गूगल टेक्निकल सर्व्हिसेस आणि पीपल ऑपरेशन्समधील वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांसह अनेक गूगल युनिट्सना नोटीस पाठविण्यात आली आहे. ‘आउटलेट’ने दिलेल्या वृत्तात असे सांगण्यात आले आहे की, कार्यालयात येऊन काम करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याचा धोका आहे. यापूर्वी गूगलने काही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली होती. ‘सीएनबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, गूगल टेक्निकल सर्व्हिसेसमधील कार्यालयापासून ८० किलोमीटरच्या आत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम बंधनकारक आहे. त्यांना एका बाजूच्या प्रवासाचा खर्च दिला जाणार आहे.

गूगलचे प्रवक्ते कोर्टने मेन्सिनी यांनी सांगितले, “आम्ही पूर्वी म्हटल्याप्रमाणे नोकरीमध्ये वैयक्तिक सहकार्य महत्त्वाचे आहे. आपण नवीन उपक्रम कसे करतो आणि कठीणातील कठीण समस्या कशा सोडवतो, त्यासाठी वैयक्तिक सहकार्य महत्त्वाचे असते,” असे त्यांचे म्हणणे आहे . मेन्सिनी म्हणाले की, हा निर्णय कंपनीचे धोरण म्हणून घेण्यात आलेला नाही, तर विशिष्ट टीम्सने हा निर्णय घेतला आहे. “काही टीम्सनी कार्यालयाजवळ राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस प्रत्यक्ष कामावर परतण्यास सांगितले आहे,” असेही ते म्हणाले.

गूगलबरोबर, अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी आणि कामकाज वाढवण्यासाठी अशा स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘फॉर्च्यून’च्या वृत्तानुसार, गूगल टेक्निकल सर्व्हिसेसमधील वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन पर्याय देण्यात आले होते. त्यातील एक पर्याय म्हणजे हायब्रिड वेळापत्रकाचे पालन करणे किंवा स्वेच्छेने एक्झिट पॅकेज घेऊन बाहेर पडणे. दरम्यान, ऑफिसपासून ८० किलोमीटरच्या आत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हायब्रिड वेळापत्रक पाळण्याचे निर्देश देण्यात आले होते; अन्यथा त्यांना नोकरीवरून काढणार येणार असल्याचे सांगण्यात आले होते . ८० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीत पदोन्नती हवी असल्यास त्यांना कार्यालयात येऊन काम करावे लागणार असल्याचे सांगितले गेले. ‘गूगल’ने अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना स्वतःच्या इच्छेने एक्झिट प्रोग्रामची ऑफर दिली होती, ज्याला ‘गूगल पीपल रिसोर्सेस’ म्हणतात. याचा अर्थ कर्मचारी स्वतःच्या इच्छेने नोकरी सोडू शकतात.

मेटा अन् एक्सच्या पावलावर गूगलचे पाऊल

गूगल इतर आयटी कंपन्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमध्ये येणे अनिवार्य केले आहेत. मेटा आणि गूगल दोन्ही कंपन्या हायब्रिड वेळापत्रकानुसार काम करीत असून, अॅमेझोन आणि एक्सने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमध्ये येण्याचे आदेश दिले आहेत. गूगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन हे गूगलमधील एआय विभागाचे नेतृत्व करतात. त्यांनी फेब्रुवारीमध्ये कर्मचाऱ्यांना आठवड्यात जास्तीत जास्त दिवस काम करण्यास सांगितले आहे. ब्रिन यांनी, “आठवड्यातून ६० तास काम केल्याने उत्पादकता वाढते”, असे जेमिनी एआय मॉडेलवर काम करणाऱ्यांना सांगितले.

‘आउटलूक बिझनेस’नुसार, गूगलने जानेवारीमध्ये प्लॅटफॉर्म आणि डिव्हायसेस विभागातील कर्मचाऱ्यांसाठी वेगळे पॅकेज जाहीर केले. गूगलने एप्रिलमध्ये प्लॅटफॉर्म आणि डिव्हायसेस विभागातील जवळपास २४ नोकऱ्या कमी केल्या आहेत. कंपनीने अंतर्गत मेमोमध्ये रिमोट वर्कचा उल्लेख केला आहे. गेल्या वर्षी गूगलने वरिष्ठ उपाध्यक्ष रिक ऑस्टरलोह यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अँड्रॉइड आणि हार्डवेअर टीम्सचे विलीनीकरण केले. जानेवारीमध्ये ऑस्टरलोह म्हणाले की, हायब्रिड मॉडेलशी जुळवून घेऊ न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक्झिट पर्याय योग्य असू शकतो. २०२४ च्या अखेरीस, गूगलमध्ये जागतिक स्तरावर सुमारे १,८३,००० कर्मचारी होते. २०२२ च्या तुलनेत हा आकडा कमी आहे.

गूगलची एक्झिट पॉलिसी काय?

गूगलने यापूर्वी पीपल ऑपरेशन्समधील त्यांच्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना मार्चपासून एक्झिट पॉलिसी ऑफर केली होती, असे एचआर प्रमुख फियोना सिकोनी यांनी एका मेमोमध्ये म्हटले आहे. अँड्रॉइड, क्रोम व फिटबिट आणि नेस्ट सारख्या प्लॅटफॉर्म आणि डिव्हायसेस ग्रुपमधील कर्मचाऱ्यांना ही एक्झिट पॉलिसी ऑफर करण्यात आली होती.

गूगलचे प्रवक्ते कोर्टने मेन्सिनी यांनी ‘सीएनबीसी’ला सांगितले की, टीमने अधिक विकासावर आणि अधिक प्रभावीपणे काम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने एक्झिट प्रोग्राम ऑफर करण्याबरोबरच काही नोकऱ्यांमध्येही कपात केली आहे. गूगल अमेरिकेत तसेच जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची भरती करत राहील, असेही त्यांनी सांगितले.