धर्मेश शिंदे
तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये एआय उत्पादनांसह तरुणांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. अशातच आता १३ वर्षांखालील किशोरवयीन मुलांसाठी गुगलने ‘जेमिनी’ आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट बाजारात आणला आहे. या ‘जेमिनी’बाबतचा थोडक्यात आढावा.
काय आहे ‘जेमिनी’?
गुगल कंपनीने एका ८ वर्षांच्या मुलाच्या पालकांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये या संदर्भात माहिती देताना सांगितले की, तुमच्या मुलासाठी लवकरच जेमिनी ॲप उपलब्ध होणार आहे. मुले जेमिनीला प्रश्न विचारू शकतील तसेच हे ॲप मुलांना त्यांच्या गृहपाठात मदत करू शकेल आणि कथा तयार करू शकेल.
‘जेमिनी’ ॲप कोणासाठी?
‘जेमिनी’ ॲपचा वापर तीच मुले करू शकतील ज्यांचे पालक गुगलची ‘फॅमिली लिंक’ वापरतात. ‘जेमिनी’ ॲप ही गुगलची सेवा आहे जी कुटुंबांना त्यांच्या मुलासाठी जीमेल सेट करण्यास आणि यूट्यूब सारख्या सेवा निवडण्यास सक्षम करतात. मुलाच्या खात्यासाठी साइन अप करण्यासाठी, पालक कंपनीला त्यांच्या मुलाचे नाव आणि जन्मतारीख यासारखा वैयक्तिक माहिती प्रदान करतील त्यानंतरच हे ॲप वापरता येऊ शकेल.
गुगलचे म्हणणे काय?
गुगलचे प्रवक्ते कार्ल रायन म्हणाले की, जेमिनीकडे वापरकर्त्यांसाठी विशिष्ट ‘रेलिंग’ आहेत जेणेकरून चॅटबॉटला काही असुरक्षित सामग्री तयार करण्यापासून रोखता येईल. जेव्हा फॅमिली लिंक खाते असलेली मुले जेमिनी वापरतील, तेव्हा कंपनी त्या माहितीचा वापर त्यांच्या एआय प्रशिक्षणासाठी करणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. शाळा, महाविद्यालये, कंपन्या आणि इतर संस्था एआय तंत्रज्ञानाच्या परिणामांशी झुंजत असताना, मुलांसाठी जेमिनीची ओळख करून दिल्याने चॅटबॉटचा वापर वाढू शकतो, असा कंपनीला विश्वास आहे.
चॅटबाॅटचे धोके कोणते?
गुगल आणि इतर एआय चॅटबॉट बनवणारे वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी तीव्र स्पर्धेत अडकले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच शाळांना शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी एआय साधने स्वीकारण्याचे आवाहन केले. लाखो किशोरवयीन मुले आधीच अभ्यासाचे साधन, लेखन प्रशिक्षक आणि आभासी साथीदार म्हणून चॅटबॉट वापरत आहेत. काही संघटनांनी इशारा दिला आहे की, चॅटबॉट मुलांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. हे चॅटबॉट कधीकधी बनावट गोष्टीदेखील बनवतात. युनिसेफ, युनेस्को आणि इतर बालहित आंतरराष्ट्रीय व स्वयंसेवी संघटनांनी असे म्हटले आहे की, एआय प्रणाली गोंधळात टाकू शकतात, चुकीची माहिती देऊ शकतात. चॅटबॉट मानव नाहीत हे मुलांना समजण्यास अडचण येऊ शकते. जनरेटिव्ह एआयने धोकादायक सामग्री तयार केली आहे, असे युनिसेफच्या जागतिक संशोधन कार्यालयाने मुलांसाठी एआय जोखीम आणि संधी यावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुले आणि पालकांसाठी सूचना
गुगलने कुटुंबांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये काही धोके मान्य केले. त्यांनी म्हटले की, जेमिनी चुका करू शकतात. त्यामुळे तुमच्या मुलांना गंभीरपणे विचार करण्यास मदत करा, असे सुचवले आहे. ई-मेलमध्ये पालकांना त्यांच्या मुलाला जेमिनीच्या उत्तरांची तथ्ये कशी तपासायची हे शिकवण्याची शिफारस देखील करण्यात आली होती. कंपनीने पालकांना त्यांच्या मुलाला आठवण करून देण्यास सांगितले की जेमिनी मानव नाही हे त्यांना सांगा तसेच मुलांना जेमिनीमध्ये संवेदनशील किंवा वैयक्तिक माहिती प्रविष्ट करण्यापासून रोखा, असेही सांगितले आहे. कंपनीने अनुचित सामग्री फिल्टर करण्याचे प्रयत्न केले असूनही, ई-मेलमध्ये असेही म्हटले आहे की, मुलांना अशी सामग्री आढळू शकते जी तुम्ही त्यांना पाहू देऊ इच्छित नाही.
हायटेक कंपन्या नि मुले
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी किशोरवयीन मुलांसाठी विविध उत्पादने विकसित केली आहेत. २०१५ मध्ये गुगलने यूट्यूब किड्स सादर केले. हे मुलांसाठी एक स्वतंत्र व्हिडिओ ॲप आहे. त्या पूर्वी २०२१ मध्ये मेटाने इंस्टाग्राम किड्स सेवा आणण्याचा विचार केला होता. १३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असलेल्या त्यांच्या इंस्टाग्राम ॲपची ही आवृत्ती सुरू करण्याची योजना त्यांनी थांबवली.
कायदा काय सांगतो?
मुलांच्या ऑनलाइन गोपनीयता संरक्षण कायद्यानुसार १३ वर्षाखालील मुलांकडून घराचा पत्ता किंवा सेल्फी यासारखी वैयक्तिक माहिती गोळा करण्यापूर्वी मुलांसाठी असलेल्या ऑनलाइन सेवांना पालकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. जेमिनी अंतर्गत, कुटुंबाचे गुगल खाते असलेली मुले सुरुवातीला स्वतःहून चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतील. परंतु कंपनीने म्हटले आहे की ते पालकांना या विषयी सतर्क करेल आणि त्यानंतर पालक त्यांच्या मुलाच्या चॅटबॉट सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकतील. यामध्ये खाते बंद करणेदेखील समाविष्ट आहे.
dharmesh.shinde@expressindia.com