गेले दोन आठवडे सुरू असलेले वाद आणि राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर चित्रपटाविरोधात झालेली घोषणाबाजी, हिंदुत्ववादी संघटनांनी थेट राज्य सरकारला पत्र लिहून चुकीचा इतिहास पसरवणाऱ्या चित्रपटावर बंदी घालण्याची केलेली मागणी याचे फलित म्हणून ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले आहे. या चित्रपटासंदर्भात निर्णय देताना इतिहासाची मोडतोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मांडली.
आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खुद्द राज्य सरकारनेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करून प्रदर्शनच थांबवण्यासाठी साकडे घातले. लगोलग या निर्णयावर अंमलबजावणी होऊन चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले. मात्र, खरोखरच या चित्रपटासंदर्भात जो इतिहासाच्या विकृतीकरणाचा आक्षेप घेतला आहे तो किती खरा आहे? केवळ ऐतिहासिक संदर्भ चुकले म्हणून ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट वादाचा धनी झाला आहे का? या ऐतिहासिक संदर्भाबाबत चित्रपटाच्या चमूने समाजमाध्यमांवर प्रसिद्धपत्रकाद्वारे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची दखल घेतली गेली का? असे कित्येक प्रश्न अनुत्तरित आहेत.
चित्रपटाचा वाद नेमका काय?
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाच्या शीर्षकावरूनच वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी खालिदचा कसा असू शकतो, हा या आक्षेपांमधला महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये ऐकू येणाऱ्या संवादांमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुसलनान सैनिक होते, त्यांचे ११ अंगरक्षक मुसलमान होते, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच, रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली होती, असाही उल्लेख ट्रेलरमध्ये आहे. या तीन गोष्टींबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत चुकीचा इतिहास पसरवला जात असल्याकारणाने चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
चित्रपटाच्या लेखक – दिग्दर्शकाचे म्हणणे काय?
‘खालिद का शिवाजी’ चित्रपटासंदर्भात घेतलेल्या हरएक आक्षेपाबद्दल चित्रपटाचे लेखक कैलास वाघमारे, दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांनी समाजमाध्यमांवरून एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. ‘खालिद का शिवाजी’ हा मुळातच ऐतिहासिक पट नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘खालिद नामक एक मुस्लिम मुलगा शिवाजी महाराजांविषयी नेमका कशा पद्धतीने विचार करतो, याचे कथाबीज या चित्रपटात आहे. महाराज हे कोणा एका राज्याचे, एका देशाचे किंवा खंडाचे नाही तर जगाचे आदर्श आहेत. जगभरातील प्रत्येकाला महाराज समजून घेण्याचा आणि त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करत शिवाजी खालिदचा कसा असू शकतो हा प्रश्नच कसा निरर्थक ठरतो, हे चित्रपटाच्या चमूने स्पष्ट केले. शिवाजी महाराजांच्या अवतीभोवती कथा फिरत असल्याने त्यात त्यांच्या सैन्याविषयी उल्लेख आहेत.
या संवादात महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लिम सैनिक होते, हा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे केलेला नाही हे प्रामाणिकपणे कबूल करावे लागेल, असे सांगतानाच महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते, हे म्हणणे अनैतिहासिक नाही. याचे कितीतरी दाखले इतिहासात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय, रायगडावर मशीद बांधण्यात आली होती, असे उल्लेख ऐतिहासिक संदर्भग्रंथात आहेत, याचे दाखलेही लेखक-दिग्दर्शक द्वयीने दिले आहेत. सरतेशेवटी, शिवाजी महाराजांच्या विचारांवर विश्वास ठेवून केलेली ही कलाकृती आहे. ती पूर्णपणे न पाहता केवळ ३ मिनिटांचा ट्रेलर पाहून टीका करू नये, अशी विनंतीही त्यांनी प्रेक्षकांना केली आहे. त्यातले चुकीचे संवाद काढून टाकण्याची प्रक्रियाही सुरू केली असल्याचे त्यांनी जाहीर केले असून चित्रपटाचे प्रदर्शन थांबवू नये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. तरीही चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले असल्याने पुढे काय, हा प्रश्न आहे.
‘छावा’ चित्रपटावरही आक्षेप होते…
गेल्या काही वर्षांत सातत्याने ऐतिहासिक संदर्भ चुकीचे आहेत म्हणून वा काही विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून अनेक मराठी – हिंदी चित्रपटांना प्रदर्शनाआधी वादाला तोंड द्यावे लागले आहे. यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हिंदी ऐतिहासिकपटही याला अपवाद ठरला नाही. संभाजी महाराज लेझीम घेऊन सगळ्यांबरोबर नृत्य कसे करू शकतात, अशी टीका करत या चित्रपटातील पहिल्याच गाण्यावरून वादाला तोंड फुटले. अखेर हे गाणेच दिग्दर्शक उतेकर यांनी चित्रपटातून काढून टाकले. मात्र वादाचे मोहोळ काही थांबले नाही. चित्रपटात राजेशिर्के कुटुंबाची बदनामी करण्यात आली आहे, अशी टीका राजेशिर्के यांच्या वारसदारांकडून करण्यात आली आणि हा वाद वेगळ्याच दिशेने वाढत गेला. यावरून काही काळ राजकीय कलगीतुराही रंगला. पण चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे हे वाद धुवून निघाले.
‘हर हर महादेव’चा वाद
असाच वाद २०२२ साली प्रदर्शित झालेल्या अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ चित्रपटासंदर्भात झाला. या चित्रपटात काही चुकीच्या ऐतिहासिक घटना दाखवण्यात आल्याचा आरोप करत चित्रपटाचे शो बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. चित्रपटात बाजीप्रभूंच्या तोंडी असणाऱ्या संवादांवरही काहींनी आक्षेप घेतला होता.
‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’…
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळीही वेगवेगळ्या समाजाने चित्रपटात चुकीचे संदर्भ दाखवल्याप्रकरणी आक्षेप घेत चित्रपट बंद पाडण्याची मागणी केली होती. राणी पद्मावतीवरील चित्रपटाला राजस्थानमधील कर्णी सेनेने आक्षेप घेतला होता. तर ‘बाजीराव मस्तानी’मधील काही दृश्यांना पेशव्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला होता.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’…
महाराष्ट्रात याआधी १९८९ मध्ये ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या प्रशांत दळवी लिखित, विनय आपटे दिग्दर्शित नाटकाविरोधात भूमिका घेत राज्य सरकारनेच नाटक सादर करण्याची परवानगी नाकारली होती. या नाटकावर महाराष्ट्र आणि केरळ सरकारने बंदी घातली होती, अखेर निर्मात्यांनी न्यायालयीन लढा दिल्यानंतर नाटकाच्या प्रयोगाचा मार्ग खुला झाला.
पहिलीच वेळ?
मात्र, कुठल्याही प्रकारे ऐतिहासिकपट, चरित्रपट नसताना केवळ काही चुकीचे ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणून प्रदर्शन रोखण्यात आलेला ‘खालिद का शिवाजी’ हा पहिलाच सामाजिकपट असेल. सध्या ज्या पद्धतीचे सामाजिक – राजकीय वातावरण आहे ते पाहता खरोखरच चुकीचे संदर्भ आहेत म्हणून चित्रपटाचे प्रदर्शन रोखले गेले आहे की शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे राजे होते हेच समाजमनावर बिंबवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याचा भाग म्हणून हिंदू – मुस्लिम ऐक्यासंदर्भात बोलणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ या सामाजिक चित्रपटाला टीकेचा धनी केले गेले आहे असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.