-राम भाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवामध्ये जे काही पारंपरिक उत्सव साजरे केले जातात त्यात पारंपरिक गणेशोत्सवानंतर साजरा होणाऱ्या हडपक्या (मस्कऱ्या) गणपतीचाही समावेश होतो. या उत्सवालाही ऐतिहासिक वारसा आणि परंपरा आहेत. ती आजतागायत विदर्भाने जपली. मंगळवारपासून या उत्सवाला सुरुवात झाली.

गणपतीला ‘हडपक्या’ का म्हणतात?

भाद्रपद महिन्यात पारंपरिक गणेशोत्सव साजरा झाल्यावर पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्षाला विदर्भात ‘हडपक’ असे म्हणतात. या काळात या गणपतीची प्रतिष्ठापना केली जात असल्याने या गणपतीला भोसले काळापासून ‘हडपक्या गणपती’ असे संबोधले जाते. गणेशोत्सवाच्या काळात मनोरजंनासाठी लोककला (खडी गंमत) सादर केली जाते. त्याच्या सादरीकरणादरम्यान मस्करी केली जात असल्याने या गणपतीला मस्कऱ्या गणपती म्हणूनही ओळखले जाते.

हडपक्या गणपतीचा इतिहास काय?

लढवय्ये सरदार समशेर बहाद्दूर राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू हे बंगालच्या स्वारीवर गेले होते. तेथे विजय प्राप्त करून परत येत असताना कुळाचाराच्या घरगुती गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे बंगालवरील विजयोत्सव साजरा करण्यासाठी पितृपक्षात इ.स. १७८७ मध्ये चिमणाबापू यांनी हडपक्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून या उत्सवाची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून नागपुरातील भोसले घराण्यात दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. यंदा या उत्सवाला २३५ वर्षे पूर्ण होत आहेत.

भोसले वाड्यातील गणपतीचे महत्त्व काय?

भोसले घराण्यात चिमणाबापूंनी १२ हातांची, २१ फुटाची मूर्ती स्थापन केली होती. अनेक वर्षे याच प्रकारच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. परंतु २००५ पासून मूर्तीची उंची कमी करण्यात आली. आता साडेतीन फुटांची मूर्ती पूजेसाठी ठेवण्यात येते. संकष्टी चतुर्थीला त्याची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी भोसलेवाड्यात हा उत्सव साजरा केला जातो.

हडपक्या गणपती आणि लोककलांचा संबंध काय?

चिमणाबापू यांनी सुरू केलेल्या या उत्सवात लोककलांना प्राधान्य दिले जात होते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात खडीगंमत, लावण्या, भजन, पोवाडे यासारखे विविध लोककला प्रकार सादर केले जात असे. आजही ती परंपरा सुरू असली तरी स्वरूप बदलले. लोककलांच्या कार्यक्रमांची जागा सुगम संगीत, हास्यकल्लोळ, जागरण, आनंद मेळावा व तत्सम कार्यक्रमांनी घेतली आहे.

वेगळेपणा काय आहे?

सार्वजनिक गणेशोत्सवासारखेच या गणेशोत्सवाचे स्वरूप असले तरी त्याचे वेगळेपण त्याची प्रतिष्ठापना ही पितृपक्षात होणे एवढेच आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या तुलनेत या उत्सवाची व्याप्ती कमी असते. नागपूरसह विदर्भाच्या अन्य जिल्ह्यातही तो साजरा केला जातो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History and importance of hadpakya ganpati which comes in month of pitru paksha print exp scsg
First published on: 15-09-2022 at 09:57 IST