अनिकेत साठे

परवानाधारकांकडून वापरण्यात येणाऱ्या कुठल्याही पिस्तूलच्या तुलनेत दुप्पट अंतरावरील लक्ष्यभेदाची क्षमता राखणारी ‘प्रबळ’ ही पहिली स्वदेशी बनावटीची हलकी पिस्तूल उपलब्ध झाली आहे. कानपूरच्या प्रगत शस्त्रास्त्र आणि उपकरणे भारत लिमिटेड (एडब्लूईआयएल) या सरकारी मालकीच्या कंपनीने वर्षभराच्या काळात तिची निर्मिती केली. सध्या देशात उपलब्ध पिस्तूलच्या श्रेणींत ती सर्वोत्तम असल्याचा दावा केला जातो. यानिमित्ताने महिलांनाही सुरक्षेसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाल्याचे सांगितले जाते.

Why did RBI advise banks to refund money
RBI ने बँकांना कर्जदारांना जास्त व्याज आकारल्याबद्दल पैसे परत करण्याचा सल्ला का दिला?
cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
loksatta analysis heavy obligations reason behind elon musk delaying tesla in india
विश्लेषण : टेस्लाच्या वाटचालीत स्पीडब्रेकर? जगभर मागणीत घट का? भारतात आगमन लांबणीवर?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

‘प्रबळ’ची वैशिष्ट्ये काय?

संपूर्णत: भारतीय बनावट असलेली ०.३२ कॅलिबरची ही पिस्तूल आहे. काडतुसांशिवाय तिचे वजन केवळ ७०० ग्रॅमच्या आसपास आहे. ७६ मिलिमीटरच्या बॅरलसह पिस्तूलची एकूण लांबी १७७.६ मिलिमीटर आहे. ती ५० मीटरपर्यंत अंतरावर अचूक मारा करू शकते. नागरी वापराच्या इतर पिस्तुलांतून साधारणत: २० ते २५ मीटर अंतरावरील लक्ष्य भेदता येते. तुलनेत ‘प्रबळ’ची मारकक्षमता दुप्पट आहे. तिचा काडतुसे भरण्याचा कप्पा कडेच्या एका बाजूने उघडतो. काही पिस्तुलांचा तो वरून (दट्ट्याजवळ) दुमडून उघडावा लागतो. या रचनेमुळे ‘प्रबळ’ इतर पिस्तुलांपेक्षा चपखल हातात बसते. शिवाय एका बाजूने उघडण्याच्या व्यवस्थेमुळे तिचे वजन २५ ते ५० ग्रॅमने कमी झाले आहे. उणे ३० ते ५५ अंश तापमानात ‘प्रबळ’च्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. ६०० फेऱ्यांच्या चाचण्याअंती हे पिस्तूल बाजारात आले आहे.

महिलांसाठी पिस्तूल उपयुक्त कशी?

वैशिष्ट्यपूर्ण रचना हे प्रबळचे बलस्थान आहे. त्यामुळे ती सहजपणे कुणालाही हाताळता येईल. एका बाजूने उघडणाऱ्या कप्प्यामुळे वापरकर्त्याला काडतुसे काढणे वा भरणे सुकर होते. ‘साइड स्विंग सिलिंडर’ने सुसज्ज असलेले ‘प्रबळ’ हे पहिलेच पिस्तूल आहे. त्यामुळे गोळी झाडण्यासाठी कळ (ट्रिगर) खेचणे सोपे होते. पिस्तूलच्या अन्य आवृत्तीत काडतुसे भरण्यासाठी त्यांना दुमडावे लागत होते. ही समस्या प्रबळने दूर केली. आकाराने लहान व वजनाने हलक्या प्रबळला महिला (परवानाधारक) आपल्या पर्समध्ये ठेवून नेऊ शकतात. स्वसुरक्षिततेसाठी ते वापरू शकतात, याकडे एडब्लूईआयएलचे अधिकारी लक्ष वेधतात.

किंमत काय, कुणाला खरेदी करता येईल?

वर्षभराच्या कालावधीत निर्मिलेली आणि उपलब्ध झालेल्या ‘प्रबळ’ची किंमत वितरकांसाठी एक लाख २६ हजार रुपये इतकी आहे. सामान्य खरेदीदारांसाठी ती एक लाख ४० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता ‘प्रबळ’ची नोंदणी सुरू झाली आहे. केवळ परवानाधारक या पिस्तुलासाठी अर्ज करू शकतात. शस्त्रास्त्र कायद्यानुसार भारतीय नागरिकांना स्वत:च्या सुरक्षेसाठी नॉन-प्रोबिहिटेड बोअर (एनपीबी) अर्थात प्रतिबंधित नसलेल्या ०.२२, ०.३२ अशा काही कॅलिबरमध्ये पिस्तूल ठेवण्यास परवानगी आहे. याकरिता प्रथम परवाना मिळविण्यासाठीच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार ज्याला स्वत:चा व्यवसाय, नोकरी अथवा स्वत:च्या जिवाचे, मालमत्तेचे संरक्षण करण्याची वास्तविक गरज आहे, अशी व्यक्ती परवान्यासाठी पात्र ठरते. नेमबाजी क्लब किंवा रायफल संघटनेचा मागील दोन वर्षांपासून सक्रिय सदस्य असणारा खेळाडू, ज्याला लक्ष्य सरावासाठी नेमबाजी करायची आहे, तोदेखील परवान्यास पात्र ठरतो. याशिवाय संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल किंवा राज्य पोलीस दलात सेवा केलेली कोणतीही व्यक्ती, ज्याला जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे, त्याला पिस्तूल बाळगण्याचा परवाना विहित प्रक्रिया पूर्ण करून मिळविता येतो. दोन वर्षांपूर्वी नेमबाजी सरावासाठी केरळमधील एम. कन्नन या १४ वर्षांच्या मुलाने शस्त्र परवाना मिळविला होता. देशातील तो सर्वात तरुण परवानाधारक ठरला.

बंदुकांची बाजारपेठ विस्तारत आहे का?

शस्त्र परवाना मिळविण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असूनही देशात थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ३८ लाख सक्रिय परवानाधारक आहेत. नागरी बंदुकांच्या वाढत्या बाजारपेठेवर परदेशी शस्त्रास्त्र उत्पादकांचे लक्ष आहे. ‘ग्लॉक’ ही ऑस्ट्रियन शस्त्र उत्पादक कंपनी तमिळनाडूस्थित प्रकल्पातून नागरी वापरासाठी पिस्तूल आणण्याच्या विचारात आहे. ‘व्हेबले ॲण्ड स्कॉट’ या प्रतिष्ठित ब्रिटिश कंपनीने उत्तर प्रदेशातील कारखान्यात यापूर्वीच ०.३२ पिस्तूलचे उत्पादन सुरू केले आहे. बाजारपेठेत स्थान मिळविण्याचा शस्त्रास्त्रनिर्मिती महामंडळाचा (आयुध निर्माणी) भाग असलेल्या कानपूरच्या प्रगत शस्त्रास्त्र आणि उपकरणे भारत लिमिटेडचा (एडब्लूईआयएल) प्रयत्न आहे. या प्रकल्पात भारतीय सशस्त्र दल, परदेशी सैन्य व देशांतर्गत नागरी वापरासाठी लहान शस्त्रे व तोफा तयार केल्या जातात. चालू वर्षात कंपनीला सहा हजार कोटींची नोंदणी मिळाली आहे. त्यात भारतीय लष्कराच्या ३०० सारंग तोफांचाही समावेश आहे.