BBC Gaza documentary हमास आणि इस्रायलचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. दोन्हीकडील रहिवासी भागांवर झालेल्या हल्ल्याने सर्वकाही उद्ध्वस्त झाले आहे. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम गाझावर झाला आहे. इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, तसेच त्या भागात मोठे आरोग्य संकट निर्माण झाले आहे. बीबीसीने याच युद्धजन्य परिस्थितीवर एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) तयार केला आहे. मात्र, प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतर या माहितीपटासाठी बीबीसीला माफी मागावी लागली आहे. संपादकीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे या माहितीपटाला विविध स्तरावरून टीकेचा सामना करावा लागत आहे.

या माहितीपटातील निवेदक हमास अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे उघड झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. सोमवारी (१४ जुलै) या प्रकरणाची जबाबदारी स्वतंत्र निर्मिती कंपनी होयो फिल्म्सने घेतली असून बीबीसीनेदेखील काही प्रमाणात याची जबाबदारी घेतली आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? या माहितीपटात नक्की काय होते? त्यावरून निर्माण झालेला वाद काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

माहितीपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतर या माहितीपटासाठी बीबीसीला माफी मागावी लागली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

माहितीपटात नक्की काय?

  • बीबीसीच्या व्हिडीओ आणि स्ट्रीमिंग सेवा कंपनी ‘आयप्लेअर’वर या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘गाझा: हाऊ टू सर्व्हायव्ह अ वॉरझोन’ हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.
  • ‘इस्रायल-हमास संघर्षात युद्धविरामाची आशा बाळगणाऱ्या चार तरुणांच्या जीवनाविषयी या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. या माहितीपटात युद्धक्षेत्रातील जीवन कसे असते हे दिसून येते,’ असे चित्रपट डेटाबेस वेबसाइट आयएमडीबीवर या माहितीपटाचे वर्णन करण्यात आले आहे.
  • मात्र, प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनीच हा माहितीपट प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला.
  • हा वाद अब्दुल्ला अल याझूरी नावाच्या १३ वर्षांच्या मुलावरून सुरू झाला.
  • या माहितीपटात असणारा अब्दुल्ला अल याझूरी हा हमास सरकारमधील गाझा येथील कृषी मंत्र्यांचा मुलगा आहे, ही माहिती बीबीसीला नंतर समजली.

२००६ मध्ये निवडणुकांनंतर हमास ही एक दहशतवादी पॅलेस्टिनी संघटना आहे, जी सत्तेवर आली. फतह या प्रतिस्पर्धी संघटनेने त्यांचा विजय स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हमासने त्यांच्याशी युद्ध पुकारले. तेव्हापासून हमास गाझावर नियंत्रण ठेवत आहे, तर पॅलेस्टिनी ऑथॉरिटी (पीए) वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी प्रदेशांवर नियंत्रण ठेवते. ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या देशांनी हमासला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलविरुद्ध हल्ले सुरू केले, त्यामध्ये १,२०० हून अधिक लोक मारले गेले आणि सुमारे २५० जणांचे अपहरण केले गेले. त्यानंतर लगेचच गाझामध्ये क्रूर लष्करी कारवाई सुरू केली, जी आजपर्यंत सुरू आहे. हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रमुख शहरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि ५८,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे.

बीबीसीला काय आढळले?

बीबीसीने म्हटले आहे की, चित्रपटाच्या निर्मिती कंपनीने या मुलाचा हमास कुटुंबाशी संबंध असल्याची माहिती त्यांना आधी दिली नव्हती. पुनरावलोकनात असे आढळून आले की, निर्मिती कंपनीच्या तीन सदस्यांना या मुलाचे वडील हमासमधील मंत्री असल्याची माहिती होती. संपादकीय तक्रारी आणि पुनरावलोकन करणारे संचालक पीटर जॉन्स्टन यांनी पुनरावलोकन अहवालात लिहिले आहे की, बीबीसी टीम सुरुवातीच्या संपादकीय तपासणीत पुरेशी सक्रिय नव्हती. जॉन्स्टन यांनी लिहिले की, “या माहितीपटात बीबीसीच्या निष्पक्षतेच्या मानकांचे उल्लंघन झाल्याचे मला वाटत नाही. कथनातील मजकूर तथ्यात्मक आहे.” माहितीपटात निवेदकाच्या भूमिकेत असणार्‍या मुलाच्या कुटुंबाने चित्रपटावर प्रभाव पाडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

बीबीसीने म्हटले आहे की, अशाच प्रकारचे उल्लंघन पुन्हा होऊ नये म्हणून ते अनेक पावले उचलत आहेत. ‘होयो फिल्म्स’ने म्हटले आहे की, त्यांनी पुनरावलोकनाचे निष्कर्ष अत्यंत गांभीर्याने घेतले आहेत आणि संपादकीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. जुलैच्या सुरुवातीला, ग्लास्टनबरी महोत्सवात बॉब व्हायलन या पंक गटाने केलेल्या सादरीकरणाचे ऑनलाइन स्ट्रीमिंग सुरू ठेवल्याबद्दल बीबीसीवर टीका करण्यात आली होती. त्यांनी सेटवर आयडीएफ (इस्रायली संरक्षण दल)ला मृत्युदंड आणि मुक्त पॅलेस्टाईन अशी घोषणाबाजी केली होती.

या माहितीपटाचा काय परिणाम झाला?

कॅम्पेन अगेन्स्ट अँटीसेमिटिझम या स्वयंसेवी संस्थेने बीबीसीच्या शिफारशी अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. बीबीसीचे माजी कंटेंटप्रमुख आणि जेके रोलिंगचे एजंट नील ब्लेअर यांच्यासह ४० हून अधिक टेलिव्हिजन अधिकाऱ्यांनी बीबीसीला पत्र लिहून माहितीपटाभोवतीच्या संपादकीय अपयशांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. बीबीसीवर प्रेक्षकांना अंधारात ठेवल्याबद्दल टीका केली जात आहे आणि पक्षपातीपणाचे आरोप होत आहेत. इतकेच नव्हे तर अलीकडच्या काही महिन्यांत गाझामध्ये घडणाऱ्या घटनांचे एक गट विकृत कव्हरेज देत असल्यानेही बीबीसीवर टीका झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, १२० हून अधिक बीबीसी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला एक खुले पत्र लिहिले होते, ज्यावर इतर मीडिया व्यावसायिकांनी स्वाक्षरी केली होती.

बीबीसीने गाझाशी संबंधित आणखी एक माहितीपटदेखील प्रतिबंधित केला, ज्याचे नाव ‘गाझा: मेडिक्स अंडर फायर’ असे होते, त्यानंतर हे पत्र लिहिण्यात आले. प्रतिबंधित केल्यानंतर ते पत्र आले. त्यांनी पत्रात असे नमूद केले, “आम्ही इस्रायल/पॅलेस्टाईनच्या वृत्तांकनावरील अपारदर्शक संपादकीय निर्णय आणि बीबीसीच्या सेन्सॉरशिपबद्दल आमच्या चिंता व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहित आहोत. यातून पुन्हा एकदा दिसून येते की, इस्रायलच्या बाबतीत बीबीसी पक्षपात न करता वृत्तांकन करत नाही.” पत्रात पुढे म्हटले आहे की, बीबीसीच्या अलीकडील निवेदनात म्हटले आहे की माहितीपट प्रसारित केल्याने पक्षपातीपणाची धारणा निर्माण होण्याचा धोका आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्रात म्हटले आहे की, बीबीसीचे वरिष्ठ कर्मचारी अनेकदा चर्चा किंवा स्पष्टीकरण न देता निर्णय घेतात. “एक संघटना म्हणून पॅलेस्टिनींवरील युद्धात ब्रिटन सरकारच्या सहभागाचे कोणतेही महत्त्वपूर्ण विश्लेषण सादर केलेले नाही. शस्त्रास्त्र विक्री किंवा त्यांच्या कायदेशीर परिणामांबद्दल अहवाल देण्यात अयशस्वी झालो आहोत,” असे त्यात पुढे म्हटले आहे. “हे अपघाताने घडलेले नाही, बीबीसीमधील प्रत्येकासाठी हे खूप लाजिरवाणे आणि चिंतेचे कारण ठरत आहे.” बीबीसीने आव्हान केले, “आमच्या प्रेक्षकांसाठी चांगले काम करण्याचे आणि निष्पक्षता, प्रामाणिकपणा किंवा पक्षपात न करता रिपोर्टिंग करण्याच्या आमच्या मूल्यांसाठी वचनबद्ध आहे, असेही त्यांनी म्हटले.