How China invaded Tibet and annexed it: ७ ऑक्टोबर १९५० रोजी चिनी सैन्य तिबेटमध्ये घुसले. दुर्दैवाने बहुतांश तिबेटी नागरिकांना या आक्रमणाची कल्पनाच नव्हती. या प्रसंगाचे वर्णन दाव्हा नोर्बू यांनी १९७८ साली वर्ल्डव्ह्यू मासिकासाठी लिहिलेल्या लेखात केले होते. ते लिहितात, “चीनने १९५० साली केलेल्या आक्रमणाची बातमी आम्हाला १९५२ साली समजली.”
ते पुढे लिहितात, १९५० साला पर्यंत तिबेट आधुनिकतेच्या सुखदुःखांपासून दूर, दुर्गम आणि वेगळा प्रदेश होता. तिथे बातम्या उशिराने पोहोचत होत्या आणि काळजी, चिंता यांचा स्पर्शही कमी प्रमाणातच होत होता. धोकादायक बातम्या समजल्यावरही साक्या गावात कोणीही आपल्या तलवारीला धार काढली नाही, की आपले गांडीव उचलून बाण ताणला नाही,” असं नोर्बू यांनी लिहिलं आहे.
साक्या गावातील लोकांनी कधी कल्पनाही केली नसती की, हे आक्रमण तिबेटमधील कायमस्वरूपी चिनी अतिक्रमणाची सुरुवात ठरेल आणि तिबेटचं भविष्यच बदलेल. या आक्रमणाला यावर्षी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत.
तिबेट जिंकण्यामागचं चीनचं उद्दिष्ट नेमकं काय?

  • १ ऑक्टोबर १९४९ रोजी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना जाहीर होण्याआधीपासूनच चिनी कम्युनिस्ट पक्षाने (CCP) तिबेटला आपल्यामध्ये सामावून घेणे हे एक महत्त्वाचं ध्येय ठरवलं होतं. यामागे वैचारिक आणि व्यवहार्य अशा दोन्ही कारणांचा समावेश होता.
  • व्यवहारिकदृष्ट्या चीनला आपली वायव्य सीमा सुरक्षित करायची होती आणि तिबेटमधील समृद्ध नैसर्गिक संपदेवर धाड घालायची होती.
  • वैचारिकदृष्ट्या CCP च्या दृष्टीने तिबेट हे एका जाचक धार्मिक राजवटीखाली असलेलं क्षेत्र होतं आणि तिथल्या लोकांना मुक्त करणं हे त्यांच्या अजेंड्यामध्ये होतं.
  • तिबेटवर वर्चस्व मिळवणं हे CCP ला इतिहासातील अपूर्ण राहिलेलं ध्येय वाटत होतं. कारण त्यांच्यामते तिबेट नेहमी चीनचाच भाग होता, आणि नव्या सशक्त चिनी राष्ट्रासाठी तिबेटचा सामावेश हा केवळ नियतीची पूर्तता होती.
  • परंतु, तिबेटचा इतिहास वेगळा होता. १९५० पूर्वी तिबेट अनेक शतकांपासून चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रणापासून स्वतंत्र होते आणि त्याचं स्वतःचं वेगळं सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक अस्तित्व होतं. १७२० साली किंग राजवटीने तिबेटवर आपली अधिराज्यता (suzerainty) जाहीर केली असली तरी तिबेटी लोक आपल्या व्यवहारांमध्ये बऱ्यापैकी स्वतंत्र राहिले. १९११ साली किंग राजवट कोसळल्यानंतर तिबेट एक स्वतंत्र आणि प्रत्यक्ष नियंत्रणापासून मुक्त असा देश ठरला होता.
१८व्या लष्करी तुकडीचे अग्रगण्य सैनिक कांगडिंगच्या शहर परिसरातून जाताना

कम्युनिस्टांचं आक्रमण कसं घडलं?

१९४९-५० या काळात ल्हासा आणि बीजिंगदरम्यान तणावपूर्ण वाटाघाटी सुरू होत्या. चीनने तिबेटसमोर तीन अटींचा प्रस्ताव ठेवला होता.
१) तिबेटला चीनचा एक भाग मानणे,
२) तिबेटच्या संरक्षणाची जबाबदारी चीनकडे असणे,
३) तिबेटच्या व्यापार आणि परराष्ट्र संबंधांची जबाबदारीही चीनकडे असणे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचवेळी पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) तिबेटच्या पूर्व सीमेवर आपले सैन्य हळूहळू तैनात करायला सुरुवात केली. यामागचा उद्देश तिबेटवर दबाव टाकून त्यांना वाटाघाटींसाठी झुकवणे हा होता. तिबेटकडे लहानसं, दुर्बल आणि आधुनिक शस्त्रांची कमतरता असलेलं सैन्य होतं. ज्याची PLA च्या सामर्थ्याशी तुलना होऊच शकत नव्हती. तिबेटच्या सीमा झिरझिरीत होत्या आणि लोकसंख्या कमी व विस्तीर्ण भूभागात पसरलेली होती. युद्ध झालं असतं, तर परकीय मदतीशिवाय तिबेटकडे कोणताही पर्याय नव्हता आणि कोणतीही मदत तिबेटकडे येण्याची शक्यता त्यावेळी नव्हती.

  • ७ ऑक्टोबर १९५० रोजी पहाटे PLA ने जिन्शा (यांगत्से) नदी ओलांडून खाम प्रांतात प्रवेश केला.
  • १९ ऑक्टोबरपर्यंत त्यांनी चामदो हे शहर ताब्यात घेतलं आणि तिथल्या तिबेटी तुकडीला शरण आणले. ३,००० हून अधिक तिबेटी सैनिकांना बंदी करण्यात आलं आणि किमान १८० सैनिक युद्धात मारले गेले (काही स्रोतांनुसार ही संख्या ३,००० पेक्षा जास्त होती).
  • त्यानंतर चीनने युद्ध थांबवलं. चामदोचा पराभूत गव्हर्नर नगाबो नगवांग जिग्मे याला त्यांनी ल्हासाला पाठवलं, जेणेकरून तो चीनचा प्रस्ताव पुन्हा दलाई लामांपुढे मांडू शकेल. तेव्हा दलाई लामा केवळ १५ वर्षांचे होते.
PLA soldiers marching toward Tibet in 1950
१९५० मध्ये पीएलए (चिनी लष्कराचे) सैनिक तिबेटकडे कूच करताना

चीनने तिबेटवर लादलेली गुलामी

  • १९५१ साली मे महिन्यात तीव्र दबावाखाली तिबेटी प्रतिनिधींनी एक करार केला. हा करार पुढे सतरा कलमी करार (The Seventeen Point Agreement) म्हणून ओळखला गेला. या करारामुळे तिबेट प्रत्यक्षात चीनच्या अधीन झाले. या करारानुसार PLA ला तिबेटमध्ये तैनात होण्याची मुभा देण्यात आली, तिबेटचे सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार बीजिंगच्या हातात गेले आणि चीनला तिबेटची अर्थव्यवस्था सुधारण्याचा अधिकार मिळाला.
  • परंतु, या करारात असेही नमूद होते की, तिबेटच्या अंतर्गत प्रशासनात, संस्कृतीत व धर्मात हस्तक्षेप केला जाणार नाही. कराराच्या तिसऱ्या कलमात लिहिले होते की, “तिबेटी जनतेला केंद्रीय जन सरकारच्या एकसंध नेतृत्वाखाली प्रादेशिक स्वायत्ततेचा अधिकार आहे.”
  • परंतु, या करारावरची शाई सुकण्याआधीच चीनने त्याचे उल्लंघन सुरू केले. PLA चे सैन्य संपूर्ण तिबेटभर पसरले. हळूहळू तिबेटी प्रशासनाच्या स्वायत्ततेचा ऱ्हास होऊ लागला आणि नंतर खाम व अम्दो या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कम्युनिस्ट सुधारणा लादल्या गेल्या.

राष्ट्रीय उठाव आणि दलाई लामांचे निर्वासन

  • १९५४ पर्यंत तिबेटमध्ये चिनी राजवटीविरुद्धचा विरोध वाढू लागला होता, कारण चीनने बौद्ध मठ पाडायला सुरुवात केली होती आणि सामूहिक शेती (collectivisation) लादली होती. शालेय शिक्षणापासून ते सांस्कृतिक श्रद्धांपर्यंत, तिबेटी जीवनाच्या सर्व अंगांमध्ये हस्तक्षेप सुरू झाला होता.
  • तिबेटी जनतेतील वाढती अस्वस्थता अखेर मार्च १९५९ मध्ये उद्रेकात परिवर्तित झाली, ल्हासामध्ये उठाव झाला. कम्युनिस्ट पक्ष दलाई लामांना अटक करणार अशी भीती पसरल्यामुळे हजारो लोकांनी ल्हासाच्या रस्त्यांवर उतरून PLA शी संघर्ष केला.
  • चिनी कारवाई अत्यंत क्रूर होती. काही अंदाजानुसार, या हिंसाचारात ८० हजारांहून अधिक तिबेटी नागरिकांची कत्तल केली. PLA ने ल्हासावर सतत तोफगोळ्यांचा मारा केला आणि अनेक सुंदर बौद्ध मठ जमीनदोस्त केले.
  • २३ मार्च रोजी दलाई लामा ल्हासाहून निघाले आणि कधीच परतले नाहीत. त्या दिवशी ल्हासा चीनच्या ताब्यात गेले. ते भारतात येत असताना त्यांनी सतरा कलमी करार फेटाळून लावत, स्वतःला तिबेटचा एकमेव वैध प्रतिनिधी घोषित केले.
  • १९५९ नंतर तिबेटवर चीनचा ताबा पूर्णपणे प्रस्थापित झाला. त्यांनी सर्व प्रकारचा विरोध निर्दयीपणे चिरडला, धार्मिक स्थाने व पदांवर स्वतःचे लोक बसवले आणि हान चिनी नागरिकांना तिबेटमध्ये आणले, त्यामुळे तिबेटची लोकसंख्यात्मक रचना आणि संस्कृती दोन्ही बदलून गेल्या.
  • चीनने तिबेटवर केलेले आक्रमण हे केवळ भौगोलिक अधिग्रहण नव्हते, तर ते एका प्राचीन संस्कृतीच्या आत्म्यावरील आघात होता. हजारो वर्षे वेगळी धार्मिक, भाषिक व सांस्कृतिक ओळख जपलेला तिबेट एका रात्रीत परकीय सत्ता आणि लष्करी जुलुमाच्या अधीन गेला. ८० हजारांहून अधिक तिबेटींचा बळी, हजारो बौद्ध मठांचा विनाश आणि निर्वासितांमध्ये ढकलला गेलेला त्यांचा अध्यात्मिक नेता ‘दलाई लामा’ ..हे सगळं एका शांतप्रिय भूमीला गिळंकृत करण्याच्या भयंकर कारस्थानाचं फलित आहे.
  • पण, या सर्व अन्यायाच्या पार्श्वभूमीवरही, तिबेटचा लढा थांबलेला नाही. दलाई लामा आजही निर्वासित असले, तरी त्यांच्या विचारांनी आणि शांततेच्या संदेशाने जगभर लाखो लोकांमध्ये तिबेटची ओळख जिवंत ठेवली आहे.