भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) विद्यमान सचिव जय शहा यांची अपेक्षेप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या पदासाठी अन्य कोणीही अर्ज न केल्याने शहा यांची निवड बिनविरोध झाली. त्यामुळे ‘आयसीसी’मधील ‘बीसीसीआय’चे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. आता आगामी काळात जय शहा यांच्यापुढे कोणती आव्हाने असणार, तसेच त्यांचा क्रिकेट प्रशासनातील अनुभव, याचा आढावा.

शहा पदभार कधी स्वीकारणार?

‘आयसीसी’चे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी दोन वर्षांचा सलग तिसरा कार्यकाळ भूषवणे टाळले. त्यामुळे आता बार्कले यांची जागा जय शहा घेणार आहेत. ३५ वर्षीय शहा १ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार असून ते ‘आयसीसी’चे सर्वांत युवा अध्यक्ष ठरणार आहेत. ‘आयसीसी’चे अध्यक्षपद भूषवणारे ते जगमोहन दालमिया (१९९७-२०००), शरद पवार (२०१०-२०१२), एन. श्रीनिवासन (२०१४-२०१५) आणि शशांक मनोहर (२०१५-२०२०) यांच्यानंतरचे पाचवे भारतीय ठरतील.

हेही वाचा : विश्लेषण: ॲग्रीकल्चर डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा नेमका उपयोग काय? हे संकेतस्थळ कसे काम करणार आहे?

‘बीसीसीआय’चे सचिव म्हणून कशी छाप?

शहा २०१९ सालापासून ‘बीसीसीआय’चे सचिवपद सांभाळत आहेत. सुरुवातीला त्यांनी सौरव गांगुली, मग रॉजर बिन्नी यांच्या अध्यक्षतेत काम केले. मात्र, विशेषत: बिन्नी यांनी अध्यक्षपद सांभाळल्यापासून त्यांच्यापेक्षाही शहा हे ‘बीसीसीआय’चा चेहरा म्हणून समोर येत होते. त्यांनी अनेक महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय घेतले. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना भारतीय संघाचा भाग नसताना देशांतर्गत स्पर्धा खेळण्याच्या सूचना केल्या. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात आली. तसेच त्यांच्या पुढाकाराने महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) सुरू झाल्याचे म्हटले जाते. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना सामन्याचे समान मानधन देण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने २०२२ मध्ये घेतला होता. याचे श्रेयही शहा यांनाच दिले जाते.

आशियाई आणि जागतिक स्तरावर कसे पोहोचले?

भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करतानाच त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आणि ‘आयसीसी’च्या सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केले. या पदांवरही यशस्वी कामगिरीमुळे ते ‘आयसीसी’ अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले.

हेही वाचा : भारताविरुद्ध कट रचणार्‍या अल कायदाच्या समर्थकाची बांगलादेशने केली सुटका; कोण आहे जशिमुद्दीन रहमानी?

शहा यांनी योग्य वेळ साधली का?

‘बीसीसीआय’च्या संविधानानुसार, पदाधिकाऱ्यांना राज्य संघटना आणि राष्ट्रीय संघटनेत प्रत्येकी नऊ अशी एकूण १८ वर्षे काम करता येते. मात्र, एका वेळी सलग सहा वर्षे पदभार सांभाळल्यास त्यानंतर तीन वर्षांचा विरामकाळ घेणे बंधनकारक आहे. शहा २०१९ पासून ‘बीसीसीआय’चे सचिवपद भूषवत आहेत. त्यामुळे त्यांना पुढील वर्षीपासून २०२८ पर्यंत विरामकाळ घ्यावा लागला असता. आता शहा ‘आयसीसी’मध्ये प्रत्येकी दोन वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण करू शकतील. त्यानंतर २०२८ मध्ये त्यांना ‘बीसीसीआय’मध्ये परत येणे शक्य होईल. त्यामुळे क्रिकेट प्रशासनात सलग काम करण्याच्या दृष्टीने त्यांनी योग्य वेळ साधली असे निश्चितपणे म्हणता येऊ शकेल.

शहा यांचा क्रिकेट प्रशासनातील प्रवास…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र असलेले जय शहा यांनी क्रिकेट प्रशासनातील आपले पहिले पाऊल २००९ मध्ये टाकले. त्यांनी प्रथम केंद्रीय क्रिकेट मंडळ अहमदाबाद (सीबीसीए) येथे काम केले. मग त्यांना गुजरात क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी मंडळात संधी मिळाली. पुढे २०११ मध्ये त्यांनी ‘बीसीसीआय’च्या मार्केटिंग समितीत स्थान मिळवले. २०१३ मध्ये वयाच्या २५व्या वर्षीच त्यांनी गुजरात क्रिकेट संघटनेच्या सचिवपदाची धुरा सांभाळली आणि ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेचे प्रतिनिधित्व केले. २०१५ मध्ये एन. श्रीनिवासन यांना ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदावरून हटविण्यात शहा यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे म्हटले जाते. २०१९ मध्ये त्यांनी कारकीर्दीतील सर्वांत मोठी झेप घेताना ‘बीसीसीआय’चे सचिवपद मिळवले आणि आता आणखी मोठे पाऊल टाकत ते ‘आयसीसी’चे अध्यक्ष झाले आहेत.

हेही वाचा : जगातून पुरुष कायमचे नष्ट होणार? Y गुणसूत्र नामशेष होण्याच्या मार्गावर; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

आगामी काळात कोणती आव्हाने?

‘आयसीसी’ आणि जागतिक क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा टप्प्यावर शहा यांना अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. क्रीडाविश्वातील सर्वांत मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये २०२८ साली लॉस एंजलिस येथे क्रिकेट खेळले जाणार आहे. क्रिकेटच्या प्रसाराच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. या शिवाय ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेत कसोटीचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारीही शहा यांचीच असणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढाकार घेत कसोटी क्रिकेटसाठी विशेष निधी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला असून याला शहा, तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, आता या प्रस्तावाचे प्रत्यक्ष धोरणात रूपांतर करणे हे शहा यांच्यासमोरील आव्हान असेल. शहा यांच्या नेतृत्वाखाली ‘बीसीसीआय’ने सामन्यांचे प्रसारण हक्क मोठ्या किमतीत विकले. आता ‘आयसीसी’लाही अशीच मोठी किंमत मिळवून देण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.

हेही वाचा : पॅरासिटामॉलसह १५६ धोकादायक औषधांवर केंद्र सरकारची बंदी; ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधे म्हणजे काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चॅम्पियन्स करंडकाबाबत काय?

चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुढील वर्षी पाकिस्तानात नियोजित आहे. तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे भारतीय क्रिकेट संघाने २००६ पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. गेल्या वर्षी आशिया चषकासाठी पाकिस्तानात संघ पाठविण्यास भारताने नकार दिला होता. त्या वेळी जय शहा यांनी ‘बीसीसीआय’चे सचिव म्हणून स्पष्ट भूमिका घेणे टाळले. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष म्हणून त्यांनी संमिश्र प्रारूपाचा (हायब्रिड मॉडेल) पर्याय समोर ठेवला. अखेर पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) हा प्रस्ताव मान्य करावा लागला आणि स्पर्धेतील नऊ सामने श्रीलंकेत खेळविण्यात आले. त्यामुळे आता पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स करंडकासाठीही भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला, तर जय शहा काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.