How To Sleep Faster: रात्री सीरिज बघताना, कधी कामामुळे, कधी जुन्या मैत्रिणीचा फोन आल्याने झोपेचं खोबरं होतंय? तुमचीही झोप पाच किंवा त्याहून कमीच तास होतेय? मग आजच तुमच्या या सवयी बदलण्याची गरज आहे. ANI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणात असे समोर आले की, पाच तास किंवा त्याहून कमी झोप मिळालेल्या व्यक्तींना दीर्घकालीन आजारांचा सर्वात जास्त धोका असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

PLOS मेडिसिन मासिकात यूसीएल संशोधकांच्या सर्वेक्षणाची माहिती देण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी ७००० हुन अधिक सहभागींचे निरीक्षण करण्यात आले होते. सहभागींमध्ये ५०, ६० व ७० या वयोगटातील स्त्री व पुरुषांचा समावेश होता. सहभागींनी मागील २५ वर्षात किती वेळ झोप घेतली व त्यांना हृदयविकार, मधुमेह किंवा कर्करोग यासारखे दोन किंवा अधिक दीर्घकालीन आजार आहेत का याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच या वयोगटातील मृत्युदरही तपासण्यात आला.

सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, पाच तास किंवा त्याहून कमी झोप घेत असलेल्या ५० वर्षाच्या व त्यावरील वयोगटातील व्यक्तींना दीर्घकालीन आजारांचा २०% अधिक धोका असल्याचे दिसून आले आहे. या व्यक्तींना दोन किंवा त्याहून अधिक आजार होण्याची शक्यताही ४०% अधिक आहे. तर ज्या व्यक्ती किमान ७ तास झोप घेतात त्यांच्या शरीरात आजाराची लक्षणे कमी प्रमाणात आढळून आली आहेत.

संशोधकांच्या निरीक्षणानुसार ५०, ६० व ७० या वयोगटातील पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोप मिळालेल्या व्यक्तींना एकाहून अधिक आजार होण्याचे प्रमाण ३० ते ४०% अधिक असते. तसेच अशा व्यक्तींमध्ये मृत्यूचा धोकाही २५ % अधिक दिसून आला आहे.

क्षेमवनचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र शेट्टी, यांच्या माहितीनुसार, जीवनशैलीतील सवयीमुळे आपले झोपेचे तास ठरत असतात. तुम्ही किती तास झोप घेता यावर शरीरातील सर्व मज्जासंस्थेसंबंधी, चयापचय क्रिया अवलंबून असतात. झोपेच्या अभावामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, न्यूरोव्हस्कुलर विकार, स्वयंप्रतिकार स्थिती, मनोवैज्ञानिक विकार यांचा त्रास उद्भवू शकतो.

How To Sleep Faster: आज रात्री लहान बाळासारखी झोप घ्या; झोपेचा ‘१०-३-२-१-०’ नियम काय सांगतो पाहा

डॉ. सेवेरीन साबिया, यांच्या माहितीनुसार, “उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये बहुविकृती वाढत आहे आणि अर्ध्याहून अधिक व्यक्तींमध्ये दीर्घकालीन आजार आढळून आले आहेत. जसे वय वाढते त्याप्रमाणे झोपेच्या सवयी आणि झोपेची रचना बदलते. उत्तम आरोग्यासाठी, रात्री 7 ते 8 तास झोपण्याझोप आवश्यक आहे- कारण यापेक्षा जास्त किंवा कमी झोपेमुळे दीर्घकालीन आजार बळावण्याची शक्यता असते.”

दरम्यान, कितीही प्रयत्न करूनही झोप न लागण्याची तक्रार घेऊनही अनेकजण येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. अशा व्यक्तींनी झोपण्यापूर्वी खोलीचे तापमान योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच शक्य असल्यास खोलीत गडद रंगाचे पडदे व बेडशीट टाकण्याचा सल्ला दिला जातो. झोपण्याच्या किमान एक तास आधी टीव्ही व मोबाईल स्क्रीनपासून दूर राहावे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much sleep is compulsory for good health chronic disease heart health diabetes and mental pressure svs
First published on: 21-10-2022 at 11:58 IST