Mouse fever in soldiers रशियन सैन्यात एक रहस्यमयी आजार पसरत आहे. रशियातील ‘अखमत बटालियन’ हा एक चेचन विशेष दलाचा गट आहे. त्यांना रशियाचे ‘टिकटॉक सैनिक’ म्हणूनही ओळखले जाते. युक्रेन-रशिया युद्धात रशियाने चेचन या विशेष दलाला उतरवले आहे. त्यांना ‘शिकारी सैनिक’ असेही म्हटले जाते. आता या सैनिकांना हंताव्हायरस संसर्गाची लागण झाली आहे. त्याला सैन्यामध्ये ‘माऊस फीवर’ (उंदीर ताप) म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत युक्रेनच्या आग्नेय भागात असलेल्या झापोरिझ्झियाजवळ तैनात असलेल्या सैनिकांना या रोगाची लागण झाली आहे. या भागात उंदरांचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्यामुळे सैनिकांना भेडसावणाऱ्या आरोग्य धोक्यांकडेही लक्ष वेधले गेले आहे. काय आहे नेमके प्रकरण? माऊस फिवर म्हणजे काय? याचा प्रसार कसा होतो?
चेचन युनिटमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव
अखमत बटालियन फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धादरम्यान तैनात करण्यात आली. हा गट युद्धात मिळवलेल्या यशापेक्षा आपल्या प्रसिद्धीसाठी तयार केल्या गेलेल्या व्हिडीओंसाठी जास्त ओळखला जातो. त्यांच्यावर युक्रेनियन नागरिकांना यातना देण्यासारख्या गंभीर गैरकृत्यांचाही आरोप आहे. ‘द टेलिग्राफ’च्या बुधवारी प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, बटालियनच्या तीन सदस्यांना हंता व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यांची निवासस्थाने आणि युद्धभूमी येथे उंदरांचा मोठ्या प्रमाणावर संपर्क असल्यामुळे हा आजार पसरला असावा, असे मानले जाते. एका रशियन टेलिग्राम चॅनेलवरील संदेशात शमा नावाच्या अखमत वैद्यकीय कर्मचाऱ्याने उंदरांच्या प्रचंड त्रासाविषयी सांगितले.

“उंदीर सर्वत्र आहेत. ते अंगावरून धावल्यामुळे आम्हाला जाग येते. आम्ही अगदी कंडेन्स्ड दुधाच्या डब्यांसाठीही लढतो,” असे तिने आपल्या युनिटच्या परिस्थितीचे वर्णन करताना सांगितले. तिने पुढे सांगितले की, आमच्यातील तीन सैनिक माऊस फीवरने आजारी पडले.” संक्रमित रुग्णांची नेमकी संख्या अजूनही अनिश्चित आहे. आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेमुळे आणखी अनेक रुग्णांना या आजाराने ग्रासलेले असू शकते. संक्रमित सैनिकांवर सध्या वैद्यकीय उपचार केले जात आहेत. जागतिक रोगांच्या प्रादुर्भावाचा मागोवा घेणारी आरोग्य गुप्तचर संस्था एअरफिनिटीने या प्रकरणांच्या वाढीबद्दल इशारा जारी केला आहे.
रशियन सैन्यात यापूर्वीही प्रादुर्भाव
रशियन सैनिकांनी यापूर्वीही ‘माऊस फीवर’चा सामना केला आहे. २०१३ मध्ये खारकीवजवळ तैनात असलेल्या रशियन सैनिकांमध्ये ‘माऊस फीवर’चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त होते. त्यावेळी युक्रेनच्या लष्करी गुप्तचर संचालनालयाने (GUR) दावा केला होता की, हा आजार क्रेमलिन सैन्यात झपाट्याने पसरत आहे. त्यांनी या परिस्थितीचे वर्णन करताना म्हटले होते की, हा विषाणू रशियन सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करीत आहे. असे वारंवार होणारे प्रादुर्भाव दर्शवतात की, उंदरांद्वारे होणारे रोग हे अस्वच्छता असलेल्या भागांमध्ये काम करणाऱ्या रशियन युनिट्ससाठी समस्या ठरत आहेत.

माऊस फीवर म्हणजे काय?
युक्रेन आणि रशियामध्ये सैनिक ‘माऊस फीवर’ हा शब्द हंताव्हायरस संसर्गासाठी वापरला जातो. हंताव्हायरस हा विषाणूंचा एक समूह आहे, जो उंदीर आणि घुशींसारख्या प्राण्यांद्वारे पसरतो आणि तो मानवामध्ये गंभीर आजार निर्माण करू शकतो.
हंताव्हायरसमुळे होणारे दोन प्रमुख सिंड्रोम
जगभरात हंताव्हायरस आढळतात आणि प्रदेश व विषाणूचे प्रकार यांनुसार होणारे दोन मुख्य आजार :
१. हंताव्हायरस पल्मोनरी सिंड्रोम (HPS) : हा प्रकार प्रामुख्याने अमेरिकेमध्ये आढळतो. हा सामान्यतः घुशी आणि इतर जंगली उंदरांद्वारे पसरतो. त्याच्या संसर्गामुळे मुख्यत्वे फुप्फुसांवर परिणाम होतो, ज्यामुळे श्वसनाची समस्या निर्माण होते. प्रारंभिक लक्षणे (थकवा, ताप, स्नायू दुखणे) संसर्गानंतर एक ते आठ आठवड्यांत दिसून येतात. हा प्रादुर्भाव झाल्यास काही रुग्णांना डोकेदुखी, चक्कर येणे, थंडी वाजणे, मळमळ, अतिसार व ओटीपोटात दुखणे यांसारखी अतिरिक्त लक्षणे जाणवतात. ४ ते १० दिवसांत फुप्फुसांमध्ये पाणी भरल्याने खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. या आजारामध्ये मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे.

२. हेमोरेजिक फीवर विथ रिनल सिंड्रोम (HFRS): हा प्रकार युरोप आणि आशियामध्ये अधिक सामान्य आहे. त्यामुळे रशियन सैनिकांना याच विषाणूची लागण झाल्याची शक्यता आहे. सामान्यतः संसर्गानंतर एक ते दोन आठवड्यांत याची लक्षणे दिसू लागतात; पण काही वेळा आठ आठवडेही लागू शकतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अचानक येणारा ताप, तीव्र डोकेदुखी, पाठ व पोट दुखणे, मळमळ व थंडी वाजणे यांचा समावेश असतो. इतर लक्षणांमध्ये चेहरा लाल होणे, डोळे लाल होणे किंवा पुरळ येणे अशा लक्षणांचा समावेश असू शकतो. आजार जसजसा वाढतो, तसतसे रक्तदाब कमी होणे, अंतर्गत रक्तस्राव, शॉक व मूत्रपिंड निकामी होणे यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. या प्रकारात मृत्यूचे प्रमाण ५ ते १५ टक्के असते. त्यातून बरे होण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने लागतात. रशियन सैनिक युरोपमध्ये तैनात असल्याने अखमत बटालियनमधील प्रकरणे याच प्रकारात मोडतात.
हंताव्हायरस कसा पसरतो?
हंताव्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. त्यामुळे हा विषाणू इतर अनेक विषाणूजन्य संसर्गांपेक्षा वेगळा आहे. हा विषाणू थेट उंदीर किंवा ते वावरत असलेल्या वातावरणातून पसरतो.

हा विषाणू प्रामुख्याने खालील मार्गांनी पसरतो:
- उंदरांची लघुशंका, विष्ठा किंवा लाळेतील कण हवेद्वारे आपल्या शरीरात गेल्यास.
- दूषित पृष्ठभाग किंवा वस्तूंशी थेट संपर्क आल्याने.
- संक्रमित उंदरांच्या चावण्याने किंवा खरचटण्याने.
युद्धक्षेत्रात सैनिक अनेकदा खंदक, पडक्या इमारती किंवा तात्पुरते निवारे अशा ठिकाणी राहत असतात. तिथे उंदरांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असतो. स्वच्छतेचा अभाव, योग्य कचरा व्यवस्थापनाची कमतरता आदींमुळे उंदीर आणि घुशींसाठी अनुकूल प्रजननस्थळे निर्माण होतात. अखमत बटालियनमधील वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या माहितीतून या परिस्थितीचे स्पष्ट चित्र समोर येते. सैनिक सतत उंदरांच्या संपर्कात असतात आणि त्यामुळे संसर्गाचा धोका खूप वाढतो. विशेष म्हणजे याचा संसर्ग झाल्यास त्यावर कोणताही इलाज नाही किंवा त्यावर विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही.