India Animal Blood Bank भारतात सुमारे ५३० दशलक्ष पशुधन आहे आणि प्राणी पाळणाऱ्या भारतीयांचे प्रमाणही सध्या वाढले आहे. मात्र असे असले तरी पशुवैद्यकीय रक्तसंक्रमण औषधं आणि रक्तपेढी किंवा रक्तसंक्रमण पद्धतींसाठी देशात कोणतीही नियामक चौकट देशभरात अस्तित्वात नाही, तसेच प्रमाणित प्रोटोकॉल्सचाही अभाव आहे. ही उणीव भरून काढण्याचा सरकारचा विचार असून केंद्रिय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने गेल्या महिन्यात या संदर्भात एक मसुदा जारी केला आहे. या मसुद्यावर जनतेकडून आणि तज्ज्ञ त्याचप्रमाणे संबंधित संस्थांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. ‘भारतातील प्राण्यांसाठी रक्तसंक्रमण आणि रक्तपेढीसाठी मार्गदर्शक तत्त्वे/ प्रमाणित कार्यप्रणाली (SOP)’ असे या मसुद्याचे नाव आहे. पशुवैद्यकीय सेवेमध्ये रक्तपेढी आणि रक्तसंक्रमणाची सोय आणि त्याचे प्रमाणिकरण या संदर्भात हा मसुदा तयार करण्यात आला आहे. मसुद्यातील मार्गदर्शक तत्त्वे काय सांगतात? प्राण्यांमध्ये रक्तसंक्रमणासाठी SOPs ची गरज का आहे?
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्र तसेच पाळीव प्राण्यांना याचा काय व कसा फायदा होणार?
२०१९ मध्ये झालेल्या २० व्या पशुधन गणनेनुसार, भारतात पशुधनाची संख्या ५३६.७६ दशलक्ष एवढी मोठी आहे. शिवाय सध्या करोनानंतर पाळीव प्राणी पाळणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. पशुधनामध्ये गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या तसेच घोडे, खेचरं, गाढवं, उंट आणि डुकरं यांसारख्या अनेक प्राण्यांचा समावेश आहे. भारतात गायी आणि म्हशींची जगातील सर्वाधिक आहे आणि शेळ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मसुद्यातील माहितीनुसार, पाळीव प्राण्यांची संख्या १२५ दशलक्ष आहे. पशुधन देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत आणि ग्रामीण उपजीविकेत महत्त्वाची भूमिका बजावते. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राचा कृषी GVA मध्ये सुमारे ३० टक्के आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत ५.५ टक्के वाटा आहे.
रक्तसंक्रमण जीवनावश्यक उपचार
या संदर्भात, महत्त्वाच्या आणि आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवांना औपचारिक स्वरूप देण्याची तातडीची गरज आहे, असे मसुद्यात म्हटले आहे. अपघात, गंभीर ॲनिमिया, शस्त्रक्रियेत रक्त कमी होणे, संसर्गजन्य रोग आणि रक्त गोठण्याच्या विकारांवरींल आवश्यक असलेला जीवनावश्यक उपचार म्हणून रक्तसंक्रमणाकडे जागतिक स्तरावर पाहिले जाते.
राष्ट्रीय नियमावली मसुदा
“भारतात प्रमाणित रक्तपेढी आणि रक्तसंक्रमण पद्धतींसह पशुवैद्यकीय रक्तसंक्रमण औषधाचे मार्गदर्शन करणारी राष्ट्रीय नियामक चौकट आणि प्रमाणित प्रोटोकॉलचाही अभाव आहे”, असे नमुद करून या मसुद्यात म्हटले आहे की, बहुतेक प्राण्यांचे रक्तसंक्रमण “सुयोग्य तपासणी, रक्तगट निश्चिती किंवा प्रमाणित कार्यप्रणालीशिवाय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या किंवा ग्राहकांकडून आलेल्या दात्यांवर अवलंबून असते”. त्यामुळेच रक्तदात्या प्राण्याची निवड, रक्त संकलन, प्रक्रिया, साठवणूक, रक्तसंक्रमण प्रक्रिया आणि या प्रक्रियेची सुरक्षितता आणि देखरेख, तसेच नैतिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या योग्य मार्गदर्शन करणे या SOPs मुळे शक्य होईल, असे सरकारने मसुद्यात म्हटले आहे.
सरासरी प्राण्यामध्ये किती रक्त असते आणि प्राण्यांच्या रक्ताचे वर्गीकरण कसे केले जाते?
मानव आणि प्राणी दोघांमध्येही रक्ताचे प्रमाण शरीराच्या वजनाच्या ७ ते ९ टक्के असते. रक्ताचे प्रमाण या पातळीच्या खाली येते तेव्हा रक्तसंक्रमणाची आवश्यकता भासते.
गुरांमध्ये त्यांच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलो ५५ मिली रक्त असते आणि त्यामुळेच सरासरी वजन ३०० किलो असलेल्या प्राण्याच्या शरीरात सुमारे १५.५ लिटर असते. कुत्रे, घोडे, शेळ्या आणि मेंढ्या, डुकरे आणि मांजरींच्या शरीरात अनुक्रमे ८६ मिली, ७६ मिली, ६६ मिली, ६५ मिली आणि ५५ मिली रक्त असते.
मानवांप्रमाणेच, प्राण्यांमध्येही रक्तगट असतात. त्यांच्या रक्तातील लाल रक्तपेशींच्या पडद्यावर असणाऱ्या विशिष्ट अँटिजेनच्या प्रमाणांवर निश्चित केले जातात. मसुद्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, गुरांमध्ये ११, कुत्र्यांमध्ये ९, घोड्यांमध्ये ८ आणि मांजरींमध्ये ४ रक्तगट आहेत.
प्राण्यांच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कसा करणार?
मसुद्यातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कुत्रा- मांजर किंवा इतर पशुधन यांना रक्तदान केव्हा करता येईल, या संदर्भात काही निकष निश्चित करण्यात आले असून ते पूर्ण करणाऱ्या प्राण्यासच केवळ रक्तदान करता येईल.
निरोगी आरोग्य : रक्तदान करणारा प्राणी वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असावा, गत कालावधीत त्याला कोणत्याही आजाराची लागण झालेली नसावी आणि त्याला गोचीड-जन्य आणि वाहक-जन्य रोग नसावेत.
वय आणि वजन : रक्तदान करणारे कुत्रे १ ते ८ वयोगटातील असावेत, त्यांचे किमान वजन २५ किलो असावे; मांजरी १ ते ५ वर्षांच्या असाव्यात, त्यांचे किमान वजन ४ किलो असावे आणि त्या लठ्ठ नसाव्यात; पशुधन प्रजाती-विशिष्ट क्लिनिकल मानदंडांच्या आधारे निरोगी प्रौढांमधून निवडल्या जाव्यात.
लसीकरण : रक्तदान करणाऱ्या प्राण्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असावे, विशेषतः रेबीजची लस आदी. त्यांना नियमितपणे जंतनाशक दिलेले असावे. रक्तदान करणारी मादी प्राणी गर्भवती नसावी किंवा नुकतीच व्यायलेलीही नसावी.
रक्तदानाची वारंवारता: कुत्रे दर ४-६ आठवड्यांनी, मांजरी दर ८-१२ आठवड्यांनी रक्तदान करण्यास पात्र असतील. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सलग रक्तदानांमध्ये किमान ३० दिवसांचे अंतर अनिवार्य आहे.
पशुवैद्यकीय रक्तपेढ्या कुठे असतील?
पशुवैद्यकीय रक्तपेढ्या पशुवैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठे, रेफरल रुग्णालये आणि पॉलीक्लिनिक्स, मोठी पशुवैद्यकीय निदान केंद्रे आणि सरकारने चालवलेली मल्टी-स्पेशालिटी प्राणी रुग्णालये यामध्ये असतील. पशुवैद्यकीय रक्तपेढ्या चोवीस तास कार्यरत राहतील.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पशुवैद्यकीय रक्तपेढ्या चालवणाऱ्या संस्थांनी किमान पाच वर्षांसाठी खालील नोंदी ठेवणे आवश्यक आहे. :
रक्तदाता नोंदणी आणि माहितीपूर्ण संमती फॉर्म; रक्तदात्याची आरोग्य तपासणी आणि चाचणी नोंदी; रक्त संकलन आणि लेबलिंग फॉर्म; घटक प्रक्रिया नोंदी; यादी, साठवणूक आणि मुदतवाढ ट्रॅकिंग; रक्तसंक्रमण देखरेख आणि ; रक्तसंक्रमणोत्तर परिणाम मूल्यांकन; आणि कचरा विल्हेवाट आणि जैवसुरक्षा नोंदी.
मसुद्यानुसार, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागांतर्गत राष्ट्रीय पशुवैद्यकीय रक्तपेढी नेटवर्क (N-VBBN) स्थापन करणे प्रस्तावित आहे.
मसुदा SOPs मध्ये भविष्यात रक्तदाता- प्राप्तकर्ता जुळणीसाठी आणि वेळापत्रकासाठी मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्यात येईल.
मालक त्यांच्या पाळीव प्राणी किंवा पशुधनाने केलेल्या रक्तदानासाठी शुल्क आकारू शकतात का?
नाही. मसुदा दस्तऐवज पाळीव प्राणी मालकांना किंवा पशुधन मालकांना प्राण्यांच्या रक्तदानासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यास मनाई करतो.
“स्वेच्छेने, विना-मोबदला केलेले रक्तदान हे पशुवैद्यकीय रक्तपेढीसाठी महत्त्वाचे असेल. पाळीव प्राणी मालकांना किंवा पशुधन पालकांना कोणतेही आर्थिक प्रोत्साहन देऊ नये,” असा उल्लेख मसुद्यात करण्यात आला आहे.
तथापि, प्रत्येक रक्तदानासाठी मालकाची संमती मात्र अनिवार्य ठरविण्यात आली आहे.