India BrahMos vs China DF-41 Missile Power : चीनने अलीकडच्या काळातील सर्वांत मोठ्या लष्करी परेडची तयारी सुरू केली आहे. या परेडमध्ये देशातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, लढाऊ ड्रोन व प्रगत लष्करी वाहनांचं प्रदर्शन केलं जाणार आहे. या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण डीएफ-४१ इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) असणार आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या शस्त्रागारातील हे सर्वांत लांब पल्ल्याचं आणि शक्तिशाली शस्त्र आहे. या क्षेपणास्त्राची तुलना भारताच्या ‘ब्रह्मोस’शी केली जात आहे. दरम्यान, चीननं डीएफ-४१ क्षेपणास्त्र कसं तयार केलं? ब्रह्मोस आणि त्यामध्ये नेमका काय फरक आहे? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…
येत्या ३ सप्टेंबर रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला ८० वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं चीननं बीजिंगमध्ये लष्करी परेड आयोजित केली आहे. चिनी शस्त्रं खरेदी करणारे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ देशांतर्गत शक्तीचं प्रात्यक्षिकच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय भागीदारांना आकर्षित करण्यासाठी चीनचा मोठा प्रयत्न मानला जात आहे. ही लष्करी परेड तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेनंतर होणार आहे, जिथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांना भेटणार आहेत.
चीनचं DF-41 क्षेपणास्त्र कसं तयार झालं?
चीनचं डीएफ-४१ हे क्षेपणास्त्र ‘प्रोजेक्ट २०४’ अंतर्गत तयार करण्यात आलेलं आहे. २४ जुलै २०१२ मध्ये शांक्सी प्रांतातील वूझाई क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रातून त्याची पहिली उड्डाण चाचणी झाली. २०१३-२०१४ या वर्षात अनेक चाचण्या घेऊन, त्याची मारक क्षमता आणि अण्वस्त्रं वाहून नेण्याची प्रणाली तपासण्यात आली. ऑगस्ट २०१५ मध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, चीननं दोन स्वतंत्रपणे लक्ष्य साधू शकणाऱ्या अण्वस्त्रांसह डीएफ-४१ ची यशस्वी चाचणी केली आहे. २०१६-२०१७ दरम्यान या क्षेपणास्त्राच्या दिशादर्शक अण्वस्त्रांसह आणखी चाचण्या घेण्यात आल्या. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार- चीननं ५० ते १०० डीएफ-४१ क्षेपणास्त्रं तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, ज्यामुळे त्यांच्या अण्वस्त्रांच्या साठ्यात लक्षणीय भर पडेल. या क्षेपणास्त्रामुळे बीजिंगची ताकद अमेरिकेच्या ‘मिनिटमन III’ आणि रशियाच्या ‘आरएस-२८ सरमत’ क्षेपणास्त्राच्या बरोबरीची झाली आहे.
आणखी वाचा : भारतावर ५०% आयात शुल्क, मग चीनला समान न्याय का नाही? अमेरिकेचे दुटप्पी धोरण कशासाठी?
ब्रह्मोस व ‘डीएफ-४१’मध्ये काय आहे फरक?
भारताच्या प्रमुख क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राचा समावेश आहे. रशियाच्या भागीदारीतून विकसित केलेलं हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. जून २००१ मध्ये पहिल्यांदा या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. ब्रह्मोस हे त्याचा सुपरसॉनिक वेग व अचूकतेसाठी ओळखलं जातं. तसेच विमान आणि नौदलाच्या जहाजांसह अनेक ठिकाणांवरून ते प्रक्षेपित केलं जाऊ शकतं. त्याची सामान्य आवृत्ती ३००-५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते; तर विस्तारित पल्ल्याचं ब्रह्मोस-ईआर १५०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकतं. ऑपरेशन सिंदूरदरम्यान ब्रह्मोसनं पाकिस्तानविरुद्धच्या लढाईतील परिणामकारकता सिद्ध केली होती. एप्रिलमध्ये भारतानं संरक्षण कराराचा भाग म्हणून फिलिपाइन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची एक तुकडी दिली आहे. इंडोनेशिया, व्हिएतनाम व मलेशियासारख्या आग्नेय आशियाई देशांनीही ही प्रणाली खरेदी करण्यात रुची दाखवली आहे.

डीएफ-४१ क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य काय?
चीनचं डीएफ-४१ हे अण्वस्त्रसक्षम आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याउलट ब्रह्मोस हे पारंपरिक युद्धासाठी योग्य असलेलं आणि अचूक मारा करणारं शस्त्र आहे. पाश्चात्त्य विश्लेषकांनी चीनच्या डीएफ-४१ क्षेपणास्त्राला CSS-20 असं नाव दिलं आहे. हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘पीपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्स’च्या शस्त्रागारात सर्वांत प्रगत प्रणाली मानली जात आहे. २०१९ च्या राष्ट्रीय दिनाच्या परेडमध्ये ते पहिल्यांदा दाखवण्यात आलं होतं आणि तेव्हापासून ते तैनात करण्यात आलं आहे. डीएफ-४१ या क्षेपणास्त्राचं वजन अंदाजे ८०,००० किलोग्रॅम आहे. तसेच त्याची लांबी २० ते २२ मीटर असल्याचं सांगितलं जात आहे. हे क्षेपणास्त्र १० अवस्त्रं वाहून नेऊ शकतं, असा दावा चिनी सरकारी माध्यमांनी केला आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला १२,००० ते १५,००० किलोमीटरदरम्यान असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अमेरिकेचा संपूर्ण भूभाग, युरोप, आफ्रिका, तसेच आशिया आणि प्रशांत महासागराचा बहुतांश भाग त्याच्या टप्प्यात येतो.
हेही वाचा : पॉर्न साइटवर इटलीच्या पंतप्रधानांचे फोटो; जॉर्जिया मेलोनी यांना कोण करतंय लक्ष्य?
चीन लष्करी परेडमध्ये काय दाखवणार?
चीन लष्करी परेडमध्ये प्रदर्शित करीत असलेली शस्त्रास्त्रं उपग्रह चित्रांमधून दिसून आली आहेत. ९ ऑगस्ट रोजी घेतलेल्या उपग्रहीय चित्रांमध्ये बीजिंगबाहेरील एका मैदानावर वाहनांच्या अनेक रांगा दिसल्या आहेत. त्यामध्ये चीनच्या ताफ्यात चिलखती वाहनं, हवाई संरक्षण प्रणाली, रॉकेट लाँचर्ससह तोफखाना प्रणाली आणि क्रूझ क्षेपणास्त्रांची मोठी श्रेणी आहे. तसेच इतर प्रणालींमध्ये टेहळणी आणि लढाऊ ड्रोन्सचा समावेश आहे. या ड्रोन्सच्या माध्यमातून शस्त्रं वाहून नेणं, इलेक्ट्रॉनिक युद्धात भाग घेणं व टेहळणी करणं यांसारखी कामं केली जाऊ शकतात. २०२१ मध्ये चीननं आपलं पहिलं लढाऊ ड्रोन ‘Feihong FH-97’ सादर केलं होतं.
चीनच्या लष्करी परेडच्या काही दिवस आधी बीजिंगमधील एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अत्याधुनिक रणगाडे आणि लढाऊ वाहनांचे फोटोही दिसले. ही वाहनं प्रगत संरक्षण प्रणाली आणि सेन्सरनी सुसज्ज असून, त्यांच्यात ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी एका विशिष्ट संरक्षण प्रणाली बसवण्यात आली आहे. या परेडमध्ये ‘हायपरसॉनिक अँटी-शिप’शस्त्रंही प्रदर्शित केली जाणार आहेत. उपग्रह चित्रांवरून ती सहज ओळखता येत नसली तरी अशा शस्त्रास्त्रांची उपस्थिती चीनच्या नौदलाला अधिक बळकटी देऊ शकते, असा अंदाज विश्लेषकांनी बांधला आहे.