PM Modi-Donald Trump Phone Call 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील एका फोन कॉलमुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंध बिघडले असल्याचा दावा एका लेखातून करण्यात आला आहे. १७ जून २०२५ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना फोन केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ३० ते ३५ मिनिटं चर्चा झाली. या चर्चेदरम्यान ट्रम्प यांच्या भूमिकेवर मोदींनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांचं म्हणणं मान्य करण्यास नकार दिला, त्यामुळेच दोन्ही देशांमधील संबंधात दुरावा आला, असं न्यूयॉर्क टाईम्सनं आपल्या लेखात म्हटलं आहे. दरम्यान, मोदी आणि ट्रम्प यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? त्यातून भारत-अमेरिकेतील संबंध कसे ताणले गेले? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, १७ जून रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ७५ वर्षांपेक्षा जुना व अत्यंत गुंतागुंतीचा लष्करी संघर्ष मीच सोडवला, असा दावा त्यांनी केला. इतकंच नाही तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाकिस्ताननं माझं नाव सुचवलं आहे, त्यामुळे भारतानेही अशीच भूमिका घ्यावी, असं ट्रम्प यांनी मोदींना सांगितलं. त्यांच्या या दाव्यावर भारतीय पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे नव्हे तर तो थेट आपापसातील चर्चेतून झाला आहे, असं मोदींनी स्पष्ट केलं. तसेच नोबेलच्या मुद्द्यावरही त्यांनी ट्रम्प यांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने दोघांमध्ये काहीसे मतभेद निर्माण झाले.

भारताची पुढील योजना काय?

न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापून आलेला हा लेख वॉशिंग्टन आणि नवी दिल्लीतील डझनभर लोकांच्या मुलाखतींवर आधारित आहे. यापैकी बहुतेकांनी आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर या विषयावर चर्चा केली आहे, कारण या संबंधांचे दूरगामी परिणाम दोन्ही देशांवर होणार आहेत. अमेरिकेशी संबंध बिघडल्यानंतर भारताने रशिया व चीन या दोन देशांबरोबरचे व्यापार संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असून, जिथे ते राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. एकेकाळी ट्रम्प यांना खरे मित्र म्हणणाऱ्या मोदींनी आता थेट त्यांच्याशी दुरावा ठेवणंच पसंत केलं आहे. “डोनाल्ड ट्रम्प हे यावर्षीच्या अखेरीस ‘क्वाड’ (Quad) शिखर परिषदेसाठी भारतात येणार होते; पण आता त्यांचा दौरा रद्द झाला आहे”, असं ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका अधिकाऱ्यानं न्यूयॉर्क टाईम्सला सांगितलं.

आणखी वाचा : भारताचे ब्रह्मोस व चीनच्या डीएफ-४१ क्षेपणास्त्रमध्ये नेमका काय फरक आहे?

एका फोन कॉलमुळे व्यापार करार रडखडला

दरम्यान, जूनमधील दोन्ही नेत्यांच्या त्या फोन कॉलमुळे भारत व अमेरिका यांच्यातील व्यापार करार रडखडला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी संतापून भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्काचं हत्यार उगारलं, ज्यामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सर्वच वस्तूंवरील कराचा बोजा ५० टक्क्यांपर्यंत गेला. वारंवार सांगूनही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवल्यामुळे आम्ही हे आयात शुल्क लागू करीत असल्याचं ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितलं. त्यांच्या या निर्णयानंतर भारतामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील एका उत्सवादरम्यान ट्रम्प यांचा मोठा पुतळा मिरवण्यात आला, ज्यावर त्यांचा उल्लेख विश्वासघातकी आणि गुंडागर्दी असा करण्यात आला. यावरूनही ट्रम्प नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे.

ट्रम्प यांच्यापासून पंतप्रधान मोदींचा दुरावा

१७ जून रोजी झालेल्या फोन कॉलपासून पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झालेला नाही. हा संघर्ष दोन मोठ्या राजकीय व्यक्तिमत्त्वांचा असून त्यांचे स्वभाव एकसारखेच आहेत. एका बाजूला ट्रम्प हे नोबेल पुरस्कार मिळण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी भारतीय राजकारणातील सर्वात संवेदनशील काश्मीरच्या मुद्द्यावर ठाम आहेत, असं न्यूयॉर्क टाईम्समधील लेखात म्हटलं आहे. मोदी व ट्रम्प यांच्यात असा दुरावा निर्माण होईल याचा विचार कधी दोन्ही देशांमधील नागरिकांनीही केला नव्हता, असंही या लेखात नमूद करण्यात आलं आहे.

मोदी व ट्रम्प यांच्यात कशी मैत्री होती?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ‘हाउडी मोदी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या रॅलीत अनेक भारतीयांसह अमेरिकेतील नागरिकांनीही सहभाग घेतला होता. काही महिन्यांनंतर ट्रम्प यांनी मोदींच्या मूळ गावी गुजरातला भेट दिली होती, जिथे त्यांच्या स्वागतार्थ ‘नमस्ते ट्रम्प!’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी अहमदाबाद विमानतळावर गळाभेट घेऊन ट्रम्प यांचे गुजरातमध्ये स्वागत केले होते; पण ट्रम्प यांना मोदींकडून जे हवं आहे ते राजकीयदृष्ट्या अशक्य आहे, कारण अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारतानं पाकिस्तानसारख्या कमकुवत राष्ट्रासोबत युद्धविराम केल्याचं समोर आल्यास पंतप्रधान मोदींना त्याचा मोठा राजकीय फटका बसू शकतो. मोदींची ‘मजबूत नेता’ अशी प्रतिमा पाकिस्तानबद्दलच्या त्यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे, त्यामुळेच ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धविराम घडवून आणला हे मान्य करायला मोदी तयार नाहीत.

भारत-पाकिस्तान युद्धविराम खरंच ट्रम्प यांनी केला?

भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडील युद्धविरामामध्ये अमेरिकेचा नेमका किती प्रभाव होता हे निश्चित सांगणे अवघड आहे. मात्र, ट्रम्प यांचा दावा आहे की त्यांनी दोन्ही देशांना युद्ध थांबवण्यासाठी दबाव म्हणून व्यापार धोरणांचा वापर केला. त्यांच्या या दाव्यानंतर पाकिस्तानने लगेचच ट्रम्प यांचे नाव नोबेलसाठी सुचवण्याचा निर्णय घेतला आहे, कारण अलीकडेच पाकिस्तानला अमेरिकेचा चांगला पाठिंबा मिळत आहे. अमेरिका-भारत संबंधांमध्ये तणाव वाढत असला तरी दोन्ही देशांवर अमेरिकेचा मोठा प्रभाव आहे. ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिकन नेत्यांच्या संदेशांनी तणाव कमी करण्यास मदत केली आहे; पण यावेळी मात्र ट्रम्प यांचे कोणतेही दावे स्वीकार करण्यास भारताकडून नकार दिला जात आहे.

pm narendra modi and donald trump photo
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी (छायाचित्र पीटीआय)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात समेट घडवून आणण्याचा दावा भारताकडून फेटाळून लावण्यात आला आहे. भारताला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींबरोबर फोनवरून मतभेद झाल्यानंतर चार दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी कांगो आणि रवांडा यांच्यातील शांतता कराराची घोषणा करताना पुन्हा त्याच मुद्द्याचा उल्लेख केला. “भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यासाठीही मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही, मी काहीही केले तरी मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही,” असं ट्रम्प म्हणाले होते.

ट्रम्प यांचा भारतावरील राग कशामुळे?

रशिया व युक्रेन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून युद्ध सुरू आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये समेट घडवून आणण्याचे ट्रम्प यांचे प्रयत्न आहेत. मात्र, रशियाने अमेरिकेला कुठलाही थारा न देता युद्धविराम करण्यास नकार दिला आहे, त्यामुळेच रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करणाऱ्या भारतासह जगभरातील अनेक देशांवर अमेरिकेनं अतिरिक्त आयात शुल्काचं हत्यार उगारलं आहे. मात्र, ट्रम्प यांनी फक्त रशियाच्या कारणामुळेच नाही तर त्यांच्या म्हणण्यानुसार न वागल्यामुळे भारतावर आयात शुल्क लादलं, असा दावा अनेक अधिकारी व निरीक्षकांनी केला आहे. चीनदेखील रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो, मग अमेरिकेनं त्यांना आयात शुल्कातून सूट का दिली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. “अमेरिकेला जर रशियावर दबाव आणायचा होता तर ट्रम्प यांनी रशियन हायड्रोकार्बन खरेदी करणाऱ्या देशांवर दुय्यम निर्बंध लादण्यासाठी कायद्यांना पाठिंबा दिला असता. मात्र, त्यांनी फक्त भारताला लक्ष्य केलं आहे, यावरून त्यांचा राग फक्त रशियाबद्दलच्या व्यापारावरून नाही हे दिसून येतं”, असंही निरीक्षकांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : पॉर्न साइटवर इटलीच्या पंतप्रधानांचे फोटो; जॉर्जिया मेलोनी यांना कोण करतंय लक्ष्य?

पंतप्रधान मोदींनी नाकारले अमेरिकेचे निमंत्रण?

जूनमध्ये जेव्हा ट्रम्प आणि मोदी यांच्यात फोनवरून संवाद झाला, तेव्हा भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत चर्चा सुरू होती; पण मोदींनी ट्रम्प यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले, असंही न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखात नमूद करण्यात आलं आहे. नुकत्याच कॅनडामध्ये झालेल्या ‘जी-७’ देशांच्या बैठकीतून ट्रम्प लवकर निघाले. त्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या पंतप्रधान मोदींना त्यांनी फोन केला. भारतात परतण्यापूर्वी वॉशिंग्टनला यावे असं निमंत्रण ट्रम्प यांनी मोदींना दिलं. त्याच वेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख व्हाईट हाऊसमध्ये दुपारच्या जेवणासाठी येणार होते. त्यांच्याबरोबर मोदींची हातमिळवणी करून द्यायची अशी ट्रम्प यांची योजना होती. मात्र, भारतीय पंतप्रधानांनी त्यांचे निमंत्रण नाकारले, असे एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधान मोदींना कशाची भीती?

भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार रडखल्यामुळे पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना अनेकदा फोन करण्याचा विचार केला; पण फोनवर कोणत्याही करारावर सहमती झाली तरी ट्रम्प त्यांच्या ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांना हवी ती पोस्ट करतील, अशी भीती भारतीय पंतप्रधानांना वाटत होती, असं न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखात एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. दोन भारतीय नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, व्यापार कराराच्या वाटाघाटीमुळे निराश झालेल्या ट्रम्प यांनी अनेकदा मोदींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पंतप्रधानांनी त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधानांबरोबर कुठलाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही, असं व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या अण्णा केली यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सध्यातरी या चर्चेपासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. त्याऐवजी ते ‘आत्मनिर्भरता’ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला पुन्हा चालना देत आहेत. सध्या पंतप्रधान मोदी चीन दौऱ्यावर आहेत, त्यामुळे भारत आणि चीन यांचा व्यापार करार होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.