पालघरला राहणारा शार्दूल ठाकूर आज भारतातील आघाडीचा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून उदयास आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात शार्दूलने सात बळी घेण्याचा पराक्रम दाखवला. फलंदाजीतही शार्दूल छाप पाडत असल्याने अल्पावधीतच तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. वर्षाखेरीस होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक तसेच २०२३चा एकदिवसीय विश्वचषक या पार्श्वभूमीवर भारताला अष्टपैलूची नितांत आवश्यकता असल्याने ३० वर्षीय शार्दूल ती जागा नक्कीच भरून काढू शकतो. मात्र शार्दूलच्या कारकीर्दीची नेमकी सुरुवात कशी झाली. त्याला ‘लॉर्ड शार्दूल’ असे का संबोधले जाते, यांसारख्या अनेक मुद्द्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

आंतरराष्ट्रीय पदार्पण कधी?

शार्दूलला २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी लाभली. या लढतीत १०व्या क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरल्यामुळे शार्दूल समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरला. सचिन तेंडुलकरनंतर १० क्रमांकाची जर्सी घालणारा शार्दूल दुसराच भारतीय खेळाडू होता. त्यामुळे काहींनी तेव्हापासूनच शार्दूलला ‘लॉर्ड’ असे म्हणण्यास सुरुवात केली. परंतु शार्दूलने मग स्वत:च ५४ क्रमांकाची जर्सी परिधान करायला प्रारंभ केला. ऑक्टोबर २०१८मध्ये शार्दूलचे कसोटी पदार्पण अवघ्या १० चेंडूपर्यंत मर्यादित राहिले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या सामन्यात शार्दूलला स्नायूंच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्यानंतर थेट जानेवारी २०२१मध्ये शार्दूल ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथील कसोटीत खेळला. इंग्लंडविरुद्ध २०२१मध्ये मायदेशात झालेल्या मालिकेपासून संघसहकारी आपल्याला ‘लॉर्ड’ असे हाक मारू लागले, असे शार्दूलने स्वत:च काही दिवसांपूर्वी सांगितले. त्या मालिकेत शार्दूलने अनेकदा मोक्याच्या क्षणी गोलंदाजी करताना एकाच षटकात दोन बळी मिळवण्याची करामत केली.

शार्दूलच्या जडणघडणीचे श्रेय कुणाला?

शार्दूलला उत्तम अष्टपैलू म्हणून घडवण्यात प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मोलाचे योगदान आहे. २००६मध्ये पालघरच्या तारापूर विद्यामंदिर शाळेकडून बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलविरुद्ध खेळताना शार्दूलने ७८ धावा फटकावतानाच ५ बळीही मिळवले. त्यावेळीच लाड यांनी शार्दूलचे कौशल्य हेरले. त्यांनी शार्दूलच्या पालकांपुढे मुंबईहून खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तेथून मग शार्दूलची कारकीर्द पालटली. पालघर ते बोरिवली असा रेल्वे प्रवास करताना शार्दूलचा बराचसा वेळ वाया जाऊ लागल्याने कालांतराने लाड यांनी स्वत:च्याच घरी शार्दूलच्या राहण्याची व्यवस्था केली.

स्थानिक क्रिकेटमधील लक्षवेधी खेळी

हॅरिस शील्ड या १६ वर्षांखालील वयोगटासाठीच्या नामांकित क्रिकेट स्पर्धेत शार्दूलने सहा चेंडूंत सहा षटकार लगावले. मग १९ आणि २२ वर्षांखालील स्पर्धाही त्याने गाजवल्या. मुंबईच्या रणजी संघात पदार्पणाची संधी मिळाल्याने शार्दूलच्या प्रगतीचा आलेख उंचावला. या काळात त्याने वजन कमी करून तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेतली आणि मग एकेक पाऊल टाकत भारतीय संघाचे दारही ठोठावले.

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला कलाटणी देणारा सामना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गतवर्षी भारताने दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह बलाढ्य ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत धूळ चारली. या मालिकेतील ब्रिस्बेन येथे झालेल्या निर्णायक चौथ्या लढतीत शार्दूलने पहिल्या डावात ६७ धावांची खेळी साकारली. ६ बाद १८६ धावांवरून शार्दूलने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने १२३ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाला अधिक आघाडी मिळू दिली नाही. दुसऱ्या डावात त्याने चार बळीही पटकावले. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध जुलैमध्ये झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान शार्दूलने ३१ चेंडूंतच अर्धशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले. ‘आयपीएल’मध्ये चेन्नई सुपर किंग्जला जेतेपद मिळवून देण्यातही शार्दूलने मोलाचे यागदान दिले. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी त्याची भारताच्या संघात निवड झाली.