‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ‘प्रीसिजन स्ट्राइक’ अर्थात अचूक हल्ले हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर चर्चेला आला आहे. असे हल्ले अधिक अचूक व्हावेत, यासाठी आता तीन ‘आय-स्टार’ विमानांची खरेदी करण्यात येणार आहे. सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या खरेदीला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. शत्रू प्रदेशातील हालचाली टिपून, ‘एआय’च्या सहाय्याने कृतियोग्य गुप्तवार्ता सीमेवरील कमांडरना त्यामुळे मिळेल. खरेदीदरम्यानची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून ही यंत्रणा लवकरात लवकर हवाई दलात दाखल होण्याची गरज आहे.
‘आय-स्टार’ विमाने म्हणजे काय?
भारताच्या हवाई दलासाठी अत्याधुनिक ‘आय-स्टार’ (इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स, टारगेट ॲक्विझिशन अँड रिकॉनिसन्स) विमानांची खरेदी करण्यात येणार आहे. हा करार १० हजार कोटी रुपयांचा असून, सरकारने नुकतीच या खरेदीला मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या (डीएसी) नुकत्याच झालेल्या बैठकीत १.०५ लाख कोटी रुपयांच्या १० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यात ‘आय-स्टार’ विमानांच्या खरेदीचाही समावेश आहे. अचूक हल्ला करण्याची भारताची क्षमता त्यामुळे वाढणार आहे.
विमानांचे महत्त्व आणि उपयोग

हवाई दलाचे निवृत्त उपप्रमुख एअर मार्शल अनिल खोसला यांनी ‘आय-स्टार’ प्रकल्पाचे महत्त्व ‘युरेशियन टाइम्स’ या वेबसाइटसाठी लिहिलेल्या लेखात मांडले आहे. लेखात ते म्हणतात, ‘दीर्घ पल्ला असलेल्या विमानांमध्ये अत्याधुनिक सेन्सर आणि यंत्रणा असलेली ही एक एकत्रित अशी टेहळणी यंत्रणा आहे. पारंपरिक टेहळणी विमानापेक्षा वेगळी अशी ही यंत्रणा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अत्याधुनिक विश्लेषण कौशल्य वापरून कृतियोग्य गुप्तवार्ता ही यंत्रणा सीमेवरील कमांडरना देते. युद्धभूमीवरील चित्र ही यंत्रणा स्पष्ट करते. किमान ४० हजार फुटांवरून जमिनीवरील माहिती अचूकपणे आणि स्पष्टपणे ही यंत्रणा टिपते. तसेच, उपग्रह, मानवरहित विमाने, जमिनीवरील टेहळणी साधने यांसारख्या इतर यंत्रणांबरोबर समन्वय अधिक चांगला होण्यात ही यंत्रणा मदत करते. ही यंत्रणा खरेदी करण्याचा प्रयत्न २०१३ आणि २०१७ मध्येही झाला होता. पण, तो पूर्णत्वाला गेला नाही.’

कुठली विमाने घेणार?

या प्रकल्पांतर्गत तीन विमाने घेण्यात येणार असून, बोइंग किंवा बम्बार्डियर कंपनीचे विमान त्यासाठी खरेदी करण्यात येण्याची शक्यता आहे. या विमानांवर संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) तयार केलेली देशी बनावटीची सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसविण्यात येईल. या इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, त्या लगेच विमानांमध्ये कार्यान्वित होऊ शकतात. शत्रूप्रदेशातील माहिती २४ तास या अत्याधुनिक यंत्रणेमुळे मिळेल. ही यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाली, तर अशी यंत्रणा कार्यान्वित असणाऱ्या अमेरिका, इस्रायल, ब्रिटन यांसारख्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होईल.

‘आय-स्टार’ विमानांची खरेदी का?

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ‘प्रीसिजन स्ट्राइक’ अर्थात अचूक हल्ले हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर चर्चेला आला आहे. अशा हल्ल्यांमुळे युद्धाची परिभाषाच बदलून गेली आहे. पारंपरिक युद्धापेक्षा अचूक हल्ले करून लक्ष्य भेदले, की युद्धाची व्याप्ती वाढत नाही आणि आपले उद्दिष्टही साध्य होते. मात्र, असे हल्ले करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मोठी गरज भासते. उरी येथील सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट येथील हवाई हल्ले आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील उद्ध्वस्त केलेले दहशतवादी तळ यांमधून अशा हल्ल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. भविष्यातही पारंपरिक युद्धापेक्षा अशा हल्ल्यांनाच प्राधान्य देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आय-स्टार’ यंत्रणेच्या खरेदीला महत्त्व आहे. युद्ध आणि सीमेवरील संघर्षादरम्यान अनेकदा कृतियोग्य गुप्तवार्ता नसल्याबद्दल खंत व्यक्त केली जाते. ‘आय-स्टार’ यंत्रणा कार्यान्वित झाली, तर ही मोठी त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे.

आव्हाने

संरक्षण क्षेत्रात जितके स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान आणि साहित्याचा वापर, तितकीच त्या देशाची एकूण शक्ती अधिक, हे आजच्या घडीचे वास्तव आहे. भारताचे संरक्षण साहित्यात आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न सुरू असले, तरी पल्ला लांबचा आहे. स्वदेशी बनावटीच्या पाचव्या-सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानांसह महत्त्वाची संरक्षण सामग्री देशातच तयार होण्याची गरज आहे. परकी साधनांमध्ये त्यांच्या देखभालीदरम्यान लागणाऱ्या सुट्या भागांच्या खरेदीमध्ये वेळ जाण्याची शक्यता असते. याखेरीज दीर्घ काळ चालणाऱ्या खरेदी प्रक्रियेचेही आव्हान आहे. ‘आय-स्टार’ विमाने खरेदीला आत्ता केवळ मंजुरी दिली आहे. विमानांची प्रत्यक्ष खरेदी होऊन हवाई दलात दाखल होईपर्यंत किती काळ जाईल, हे अचूकपणे कुणीच सांगू शकत नाही. वेगाने अद्ययावत होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात काही वर्षांचा खरेदीचा काळ उपयोगाचा नाही. कारण प्रत्यक्ष विमाने हवाई दलात दाखल होतील, तेव्हा आजचे तंत्रज्ञान हे जुने ठरते. याखेरीज या महागड्या साधनांची सुरक्षाही अतिमहत्त्वाची आहे. संघर्षाच्या काळात या विमानांचे नुकसान परवडणारे नसते.

पुढे काय?

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अचूक हल्ले करण्याच्या क्षमतेत वाढ करण्याकडे भारत लक्ष देत आहे. उपग्रहातून टेहळणी यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी २०२९ पर्यंत केवळ लष्करी वापरासाठीचे ५२ उपग्रह अवकाशात सोडण्याची तयारी सुरू आहे. सुमारे २७ हजार कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी लागण्याची शक्यता आहे. या सर्व तयारीबरोबरच नव्या युद्धनीतीचे आव्हान समजून घेऊन ‘टेक्नोसॅव्ही’ फौज उभारण्याकडे वाटचाल होण्याची गरज आहे. त्यासाठी भरतीच्या पारंपरिक पद्धतींना छेद देण्याची गरज असून, नव्या तंत्रकुशल शिक्षणाचा समावेश अभ्यासक्रमात होण्याची गरज आहे.

prasad.kulkarni@expressindia.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.