‘शौर्य आणि विवेक’ हे बोधवाक्य असणारी आणि लष्कराला पूर्ण प्रशिक्षित कायमस्वरूपी अधिकारी देणारी देशातील प्रथितयश अकादमी म्हणजे भारतीय लष्करी अकादमी (आयएमए). या अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना ज्या ‘कंपनी’मध्ये प्रशिक्षण दिले जाते, त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव आहे. या कृतीतून ब्रिटिशांचा वारसा घालविण्याचे उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे. हे नेमके काय प्रकरण आहे?

‘आयएमए’ या संस्थेशी लष्करातील जवळपास सर्व अधिकारी जोडले गेले आहेत. या प्रशिक्षण संस्थेशी अधिकाऱ्यांचे नाते अतूट असते. अगदी निवृत्तीनंतरही संस्थेशी संबंधित त्यांच्या भावना या जिव्हाळ्याच्या असतात. लष्करामध्ये आणि पूर्ण देशातच या अकादमीला मानाचे स्थान आहे. १९३२ मध्ये स्थापन झालेल्या या अकादमीने देशाला उत्तमोत्तम अधिकारी दिले. यामध्ये पहिल्या बॅचचे आणि नंतर फील्डमार्शल हुद्द्यापर्यंत पोहोचलेले सॅम माणेकशॉ यांचा उल्लेख करावा लागेल. भारताच्या संरक्षण दलांना ब्रिटिशांचा वारसा लाभला आहे. संरक्षण दलांतील अनेक बाबींतून हा वारसा आणि त्यातून आलेल्या परंपरा ठळकपणे दिसतात. आताच्या काळात उपयुक्त नसलेल्या परंपरा बदलून संरक्षण दलांना अधिक भारतीय रूप देण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारचा दिसतो. असाच एक प्रयत्न ‘आयएमए’मधील प्रशिक्षण देणाऱ्या ‘कंपनीं’ची नावे बदलण्यावरून झालेला दिसतो.

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची विभागणी

लष्करामध्ये जवानांच्या संख्येनुसार सेक्शन, प्लाटून, कंपनी, बटालियन, ब्रिगेड, डिव्हिजन अशी बहुस्तरावर रचना केलेली असते. ‘आयएमए’मध्ये प्रशिक्षण देणाऱ्या सैनिकांच्या १५ कंपनी आहेत. यामध्ये ‘आर्मी कॅडेट कॉलेज’मधून ‘आयएमए’मध्ये आलेल्यांसाठी कारगिल, बोगरा, नुब्रा अशी कंपन्यांची नावे आहेत. याखेरीज, करिअप्पा, थिमय्या, माणेकशॉ आणि भगत अशा चार बटालयिन आहेत. यातील ३ बटालियन्सची नावे माजी लष्करप्रमुखांची आहेत, तर चौथ्या बटालियनला लेफ्टनंट जनरल पी. एस. भगत यांचे नाव आहे. ब्रिटनचा विख्यात ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ सन्मान मिळविणारे ते पहिले भारतीय. या प्रत्येक बटालियनमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी विभागले जातात. बटालियनचे नेतृत्व कर्नल हुद्द्याचा अधिकारी करतो. प्रत्येक बटालियन पुन्हा प्रत्येकी ३ कंपन्यांमध्ये विभागलेली आहे. चार बटालियनच्या अशा एकूण १२ कंपन्या आणि ‘आर्मी कॅडेट कॉलेज’मधून आलेल्यांसाठी ३ कंपन्या अशा एकूण १५ कंपन्या ‘आयएमए’मध्ये भावी लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देतात. या कंपन्यांचे नेतृत्व मेजर हुद्द्यावरील अधिकारी करतो.

कंपन्यांची नावे बदलणार?

करिअप्पा बटालियनमध्ये, कोहिमा, नौशेरा, पूँछ या ३ कंपनी आहेत. थिमय्या बटालियनमध्ये अलामेन, माइक तिला, सँग्रो या ३ कंपनी आहेत. माणेकशॉ बटालियनमध्ये इम्फाळ, जोझिला, जेस्सोर या ३ कंपनी आहेत. तर, भगत बटालियनमध्ये सिंहगड, केरेन, कॅसिनो या ३ कंपनी आहेत. या १२ कंपनींपैकी ७ कंपनींची नावे बदलण्याचा प्रस्ताव आहे. कोहिमा, अल अलामीन, माइकतिला, सँग्रो, इम्फाळ, कॅरन, कॅसिनो या कंपनींची नावे बदलून डोगराई, नथू ला, चुशूल, बगडाम, द्रास, बसंतर,  वॅलाँग ही नावे या कंपन्यांना देण्याचा विचार होत आहे.

नावांचे महत्त्व

या कंपनींच्या नावांमागे मोठा इतिहास आहे. प्रत्येक कंपनीचे नाव भारतीय लष्कराचा सहभाग असलेल्या एका लढाईवरून देण्यात आले आहे. १२ कंपनींच्या १२ नावांतून १२ लढाया डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यातील भारतीय जवानांनी बजावलेली कामगिरी आठवते. ज्या कंपनींची नावे बदलण्यात येणार आहेत, त्यांची नावे ज्या लढायांवरून ठेवली आहेत, त्या लढाया भारतीय सैनिकांनी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशकाळात लढल्या आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी भारतीय सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीचा हा एक प्रकारे अपमान असल्याची भावना कंपनींची नावे बदलण्याच्या प्रस्तावाच्या वृत्तावर व्यक्त होत आहे. पूर्व आफ्रिकेतील १९४१मधील कॅरनची लढाई, उत्तर आफ्रिकेमधील अल अलामीनची १९४२ची लढाई, सँग्रो येथील १९४३-४४ मधील लढाई, १९४४च्या सुरुवातीची कॅसिनोची लढाई, कोहिमा आणि इम्फाळ येथील १९४४ मधील लढाया यांत हजारो भारतीय सैनिकांनी बलिदान दिले. कंपनीला नवे नाव ज्या लढाईवरून देण्याचा प्रस्ताव आहे, त्या लढाईची तुलना पूर्वीच्या लढाईशी होऊ शकत नसल्याचाही एक मतप्रवाह आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रिटिशांचा वारसा आणि संरक्षण दले

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाला ब्रिटिशांचा वारसा मिळाला आहे. या दलांची स्थापना ब्रिटिशांच्याच काळात झाली. या दलांमध्ये आणि विविध प्रकारच्या नावांमध्येही काळानुरूप यापूर्वीही बदल केले गेले आहेत. संरक्षण दलांचे भारतीयीकरण हा उपक्रम स्तुत्य असला, तरी तो करीत असताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. ‘आयएमए’ ही साधीसुधी अकादमी नाही. लष्कराला उत्तमोत्तम कायमस्वरूपी अधिकारी देणाऱ्या अकादमीमधील प्रशिक्षणाच्या पातळीवरील कंपनींच्या नावातील प्रस्तावित बदलाची चर्चा त्यामुळे होणे स्वाभाविक आहे. संरक्षण क्षेत्रातील ब्रिटिशांचा वारसा आणि दीर्घ काळापासूनची परंपरा यावर धोरण आखताना जाणकारांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. अशी नावे बदलताना त्याचा भावी लष्करी अधिकाऱ्यांवर विपरित परिणाम तर होणार नाही ना, याची दक्षता घ्यायला हवी. देशासमोर संरक्षणाची आव्हाने मोठी आहेत. लष्कराला अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. संरक्षणसज्जतेला प्रथम प्राधान्य देऊन इतर बाबींचा विचार त्या प्राधान्यक्रमानुसार करणे श्रेयस्कर राहील. prasad.kulkarni@expressindia.com