७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कियेविरोधात लोक आक्रमक झाले आहेत. भारतीयांनी त्यांच्या पाकिस्तान समर्थक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि या देशांच्या पर्यटनावर तसेच वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. याचा परिणाम तुर्किये येथे वाढत असलेल्या भारतीय ‘डेस्टिनेशन वेडिंग’वरदेखील होणार आहे. आलिशान रिसॉर्ट्स, निसर्गरम्य ठिकाणे आणि तेथील आदरातिथ्यामुळे गेल्या काही वर्षांत तेथील भारतीयांचे ‘डेस्टिनेशन वेडिंग’चे प्रमाण वाढले होते. परंतु, तुर्कियेने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिल्याने यालाही फटका बसणार आहे, त्यामुळे १०० हून अधिक दशलक्ष डॉलर्सचा फटका तुर्कियेला कसा बसेल हे जाणून घेऊयात.
तुर्कियेत भारतीयांच्या लग्नाचे प्रमाण वाढले
गेल्या काही वर्षांत अनेक भारतीय लग्नांसाठी तुर्कियेची निवड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तुर्कियेतील आलिशान रिसॉर्ट्स आणि निसर्गरम्य ठिकाणांमुळे भारतीय नागरिक ‘डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुर्कियेची निवड करत आहेत. परंतु, पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर यावर थेट परिणाम झाला असून भारतातील लग्न नियोजक आणि कुटुंबे आता मोठ्या प्रमाणात तुर्कियेऐवजी इतर ठिकाणांची निवड करत आहेत. मोठ्या प्रमाणात नियोजित कार्यक्रम रद्द होत असल्याने तुर्कियेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, ज्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. “तुर्कियेमध्ये लग्न करणारे भारतीय प्रवासी तुर्कियेच्या पर्यटन अर्थव्यवस्थेत दरवर्षी १४० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त योगदान देतात आणि या बदलामुळे अर्थव्यवस्थेला थेट फटका बसेल,” असे भारतीय लग्न नियोजन फर्म केस्टोन उत्सवचे वरिष्ठ प्रतिनिधी निखिल महाजन यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ला सांगितले.

‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी का केली जात आहे तुर्कियेची निवड?
इस्तानबूलच्या राजवाड्यांपासून ते बोडरमच्या नीलमणी किनारपट्टीपर्यंत तुर्कियेत अनेक आकर्षक ठिकाणे आहेत, त्यामुळे भारतीय जोडप्यांसाठी हे एका स्वप्नवत ठिकाणासारखे आहे. इतर ठिकाणांच्या तुलनेत तुर्कियेत लग्न करणे भारतीय जोडप्यांना परवडणारे आहे. २०२४ मध्येच तुर्कियेकडून ५० भव्य भारतीय विवाहसोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विवाहसोहळ्याची सरासरी किंमत तीन दशलक्ष डॉलर्स होती, तर काहींचा खर्च आठ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. हा केवळ एक दिवसीय समारंभ नसून लग्नाच्या आधीचे सर्व विधीदेखील याच ठिकाणी केले गेले. या स्वरूपाच्या सोहळ्याला जवळ जवळ ५०० नागरिक उपस्थित असतात. त्यात विमानतळावरून ने-आण, पंचतारांकित रिसॉर्ट्सचे बुकिंग, सेलिब्रिटी कलाकार या सर्वच गोष्टींचा समावेश असतो, त्यामुळे तुर्कियेतील स्थानिक विक्रेते आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना लक्षणीय फायदा होतो.
प्राप्त आकडेवारीनुसार, १०० पाहुण्यांसाठी सामान्य भारतीय लग्न पॅकेजची किंमत सुमारे ३,८५,००० डॉलर्सपासून सुरू होते. मात्र, तुर्कियेत होणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या लग्नाला लागणारा खर्च याच्या तुलनेत अतिशय कमी आहे. साधारणपणे या लग्नाला १,६०० डॉलर्स ते ५,४०० डॉलर्स खर्च येतो. गेल्या काही वर्षांत, तुर्कियेमध्ये भारतीयांच्या लग्नाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. २०१८ मध्ये तुर्कियेत भारतीय लग्नांची संख्या केवळ १३ आहे, जी २०२४ मध्ये ५० पर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षीच तुर्कियेने जवळजवळ १५० दशलक्ष डॉलर्सचे पर्यटन उत्पन्न मिळवले आहे. मात्र, बहिष्कारामुळे तुर्कियेवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.
बहिष्काराचा तुर्किये लग्न व्यवसायावर कसा परिणाम होणार?
भारत-पाकिस्तान वादात तुर्कियेने पाकिस्तानला जाहीरपणे पाठिंबा दर्शविल्याने भारतीय लग्न नियोजक आणि कुटुंबांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मे २०२५ मध्येच सुमारे २००० पर्यटकांचे बुकिंग रद्द करण्यात आले आणि वर्षभरासाठी नियोजित ५० भारतीय लग्नांपैकी २० लग्न रद्द करण्यात आली. ‘द फायनान्शियल एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, तुर्कियेमध्ये होणारा प्रत्येक भारतीय लग्नाचा खर्च साधारणपणे तीन दशलक्ष डॉलर्सचा असल्याने, देशाला ९० दशलक्ष डॉलर्सपर्यंत तोटा सहन करावा लागू शकतो.
तुर्कियेत भारतीय विवाहसोहळे मोठ्या प्रमाणात होतात आणि त्यामुळे शेकडो स्थानिक विक्रेत्यांना रोजगार मिळतो. यामुळे फुलविक्रेते, स्वयंपाक करणारे, फोटोग्राफर आणि वाहतूक पुरवठादार यांनादेखील रोजगार मिळतो. या लग्नांमध्ये सेलिब्रिटी आणि व्यावसायिक उच्चभ्रूंचादेखील समावेश होता. लग्नाच्या हंगामात बहिष्काराचे आवाहन केले जात असल्याने तुर्कियेसाठी हे नुकसान मोठे असणार आहे. सामान्यतः ६० टक्के भारतीय विवाहसोहळे मे ते डिसेंबरदरम्यान होतात.
तुर्कियेऐवजी भारतीय कोणत्या ठिकाणांची निवड करत आहेत?
निखिल महाजन यांच्या मते, “तुर्कियेऐवजी भारतीय आता इटली आणि ब्रिटनसारख्या पर्यायी ठिकाणांची निवड करत आहेत. त्याचबरोबर उदयपूर, जयपूर, गोवा आणि केरळसारख्या भारतीय स्थळांची मागणीही पुन्हा वाढत आहे. भारतातील ही ठिकाणे बदलती पसंती, सुरक्षितता, प्रवासाची सोय यावर लक्ष केंद्रित करतात.
पर्यटन उद्योगाला फटका
गेल्या काही वर्षांत तुर्किये येथे पर्यटनाला जाण्याची मागणी वाढली आहे. तुर्कियेच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या मते गेल्या वर्षी ३,३०,००० भारतीयांनी तेथे भेट दिली. २०१४ पर्यंत हे प्रमाण केवळ १,१९,५०३ होते. त्यांच्या पर्यटन मंडळाने म्हटले आहे की, २०२४ मध्ये तुर्कियेचा पर्यटन महसूल ६१.१ अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला. तुर्कियेच्या पर्यटन वाढीमध्ये भारतीयांचे योगदान आहे. २०२३ च्या तुलनेत गेल्या वर्षी पर्यटकांच्या संख्येत २०.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड व्हायरल झाला होता, तेव्हापासून मालदीवला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती. याचा मोठा आर्थिक फटका मालदीवला बसला होता. आता त्याहूनही बिकट परिस्थिती तुर्कियेवर ओढवण्याची वेळ आली आहे.