Who is Amir Hamza : दुसर्याचं घर जाळू पाहणाऱ्या व्यक्तीचं स्वत:चं घर त्याच आगीत जळून खाक व्हावं, अशी दयनीय अवस्था सध्या पाकिस्तानची झाली आहे. दहशतवाद्यांना पोसणारा हा देश आता त्याच दहशतवादाच्या छायेत सापडला आहे. आधीच भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात घबराटीचं वातावरण आहे. त्यात देशात शरणार्थी असलेल्या दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा कुणीतरी सपाटाच लावला आहे. तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याचा अज्ञातांनी खात्मा केला होता. ही घटना ताजी असतानाच आमिर हमजा या दहशतवाद्यावर मंगळवारी (तारीख २० मे) जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लाहोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आमिर हमजा आहे तरी कोण? हे जाणून घेऊ…
दहशतवादी हमजा आहे तरी कोण?
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर हमजा हा लष्कर-ए-तैयबा (LeT) या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या १७ संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. पाकिस्तानात त्याला मौलाना म्हणूनही ओळखलं जातं. १० मे १९५९ रोजी पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथे हमजा याचा जन्म झाला. तो अफगाणिस्तानमधील जिहादचा लढवय्या म्हणूनही ओळखला जातो. गेल्या काही दशकांपासून लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेकी विचारसरणीला आकार देण्यात आणि त्याचा प्रसार करण्यात हमजा याने महत्वाची भूमिका बजावली. ज्वलंत भाषणं आणि कट्टरपंथी लेखनासाठी हमजा पटाईत आहे. म्हणूनच तो दीर्घकाळापासून लष्कर-ए-तैयबाच्या प्रचार आणि भरती धोरणांमध्ये केंद्रस्थानी राहिला आहे.
लष्कर-ए-तैयबाच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख
आमिर हमजा हा लष्कर-ए-तैयबाचं मुखपत्र देखील चालवतो. संपादक म्हणून त्याने अनेकदा अतिरेकी मजकूर प्रसारित केलेला आहे. २००२ मध्ये हमजाने “काफिला दावत और शहादत” (प्रसार आणि शहिदीचा ताफा) या पत्रकाचे लेखन केले, ज्याने जागतिक जिहादासाठी लष्कर-ए-तैयबाच्या दृष्टिकोनाला चालना दिली. ऑगस्ट २०१२ मध्ये अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने हमजा याला जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं. त्यावेळी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अमेरिकेनं असं म्हटलं होतं की, हमजा हा लष्कर-ए-तैयबाच्या केंद्रीय सल्लागार परिषदेचा भाग होता. संघटनेच्या संपर्क व प्रचार यंत्रणांची जबाबदारी त्याच्याकडे होती. हमजा याने लष्कर-ए-तोयबाशी संबंधित धर्मादाय आणि शैक्षणिक संस्थांमध्येही वरिष्ठ पदं भूषवलेली आहे.
आणखी वाचा : Operation Sindoor : शशी थरूर यांच्या निवडीवरून वाद कशासाठी? काँग्रेसच्या आक्षेपाचे कारण काय?
कोणकोणत्या कारवायांमध्ये हमजाचा सहभाग?
भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्येही आमिर हमजा याचा सहभाग होता. त्याने २००५ मध्ये बेंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यास मदत केली होती. हा हल्ला काश्मीरबाहेरील लष्कर-ए-तैयबाच्या पहिल्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक होता. २०१० पर्यंत हमजा लष्कर-ए-तोयबाच्या विशेष मोहिम विभागाचं नेतृत्व करत होता आणि संघटनेच्या विचारधारेच्या मार्गदर्शनात महत्त्वाची भूमिका बजावत होता. त्याचबरोबर अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्यात सहभागी असलेल्या तीन वरिष्ठ नेत्यांमध्ये त्याचा सहभाग होता.
हमजा आणि हाफिज सईदचं वाजलं?
२०१८ मध्ये, जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनसारख्या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संस्थांवर जागतिक स्तरावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले. या कारवाईनंतर हमजाने स्वतःला मूळ संघटनेपासून दूर केले आणि जैश-ए-मनकाफा नावाचा एक स्वतंत्र गट सुरू केला. या गटाने काश्मीरकेंद्रित प्रचार व मर्यादित निधी संकलनात सहभाग घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, हमजाच्या संघटनेत सध्या फूट पडली असली तरी, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या यादीत आजही तो ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित आहे. गेल्या काही काळापासून हाफिज सईद आणि आमिर हमजा यांच्यात पैशावरून वाद सुरू असल्याची चर्चा आहे.
हमजावर हल्ला नेमका कुणी केला?
हमजा मंगळवारी त्याच्या घरी होता. त्यानंतर अचानक आयएसआयने त्याला लाहोरमधील पाकिस्तानी लष्कराच्या रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यासोबत नेमकं काय झालं हे गुपित अजून उलगडलेलं नाही. त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला असं सांगितलं जात आहे. हा हल्ला नेमका कुणी आणि का केला? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, गंभीररित्या जखमी झालेल्या हमजाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या कपाळातून, नाकातून आणि शरीराच्या इतर भागातून प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याची माहिती आहे. त्याची प्रकृती अद्यापही गंभीर असून त्याच्यावर लाहोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही वाचा : भारत बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणार? भारतासमोर आव्हाने कोणती?
पाकिस्तानमध्ये कुणाची दहशत?
जम्मू-काश्मीरमध्ये सातत्यानं दहशतवाद्यांना पाठवून हिंसा करणार्या पाकिस्तानला आता दहशतवादाच्या ज्वाळांनी घेरलेलं आहे. मागील दोन वर्षांत पाकमध्ये बॉम्बस्फोटाच्या कित्येक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे चीन सोडून दुसरा कोणताही देश पाकिस्तानबद्दल सहानुभूती दाखवताना दिसून येत नाही. भारतानं आजवर कोणत्याही हिंसक कारवायांचं कधीही समर्थन केलेलं नाही. त्याचबरोबर अशा संघटनांना मदतही केलेली नाही; पण स्वत:च्याच नाकर्तेपणामुळे पाकिस्तानात फोफावलेल्या दहशतवादाचं खापर पाकिस्तान भारतावर फोडू पाहत आहे. भारतातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांच्या पाकिस्तानात एकपाठोपाठ एक हत्या होत आहेत.
‘लष्कर’चा कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा
गेल्या दोन वर्षांत अनोळखी व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. त्यामुळे भारताच्या शत्रूंना पाकिस्तानातून यमसदनी कोण पाठवतंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तीन दिवसांपूर्वी लष्करमधील कुख्यात दहशतवादी अबू सैफुल्लाहवर पाकिस्तानमध्ये काही अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तो जागीच ठार झाला. सैफुल्लाह हा भारतातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार होता. सैफुल्लाह हा १८ मे रोजी दुपारी त्याच्या घरातून बाहेर पडला. तो एका क्रॉसिंगजवळ दाखल होताच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.