प्रथमेश गोडबोले
धरणातून थेट जलवाहिनीद्वारे तब्बल २१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाद्वारे पाणी वितरण करण्याचा जलसंपदा विभागाचा देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गुंजवणी बंदनलिका प्रकल्प ओळखला जातो. या प्रकल्पाद्वारे वर्षांतील ३६५ दिवस २४ तास, विजेशिवाय उच्चदाबाने पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाचा आढावा.
गुंजवणी धरण प्रकल्प कुठे आहे?
राजगड आणि तोरणा किल्ल्यांच्या परिसरात उगमपावणाऱ्या गुंजवणी नदीवर वेल्हा तालुक्यात मौजे धानप येथे धरण बांधण्यात आले आहे. या गुंजवणी धरणाची पाणीसाठवण क्षमता ३.६९ टीएमसी आहे. या प्रकल्पास १६ ऑक्टोबर १९९३ रोजी ८६.७७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तो महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशांतर्गत येतो.
पाइप डिस्ट्रिब्युशन नेटवर्क म्हणजे काय?
परंपरागत पद्धतीने धरण बांधल्यानंतर धरणापासून शेतापर्यंत विविध कालव्यांचे जाळे तयार केले जाते. मुख्य कालवा, शाखा कालवा, लघु वितरिका यांद्वारे पाणी देण्यात येते. या पद्धतीत पाणी आपल्याला दिसते. मात्र, कालव्याद्वारे किंवा उघडय़ावरून पाणी देताना पाणी झिरपणे, बाष्पीभवन, चोरी, गळती यांद्वारे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. त्यामुळे आता शासनाने पीडीएन पद्धतीनेच पाणी वितरित करण्याचे धोरण केले आहे. त्यामुळे आता कालव्यांऐवजी पाइपद्वारे पाणी दिले जाणार आहे.
गुंजवणी बंदनलिका प्रकल्प नेमका काय?
धरणातून थेट जलवाहिन्यांद्वारे शेतकऱ्यांच्या शेताला पाणी उपलब्ध करून देणारा देशातील पहिला प्रकल्प म्हणून गुंजवणी पाइप्ड इरिगेशन नेटवर्क या प्रकल्पाची नोंद झाली आहे. वर्षांतील ३६५ दिवस २४ तास, विजेशिवाय उच्चदाबाने शेतात सहा एकर क्षेत्रापर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे. धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे वेल्हा तालुक्यातील ८५० हेक्टर, भोर तालुक्यातील ९४३५ हेक्टर आणि पुरंदर तालुक्यातील ५७०७ हेक्टर क्षेत्र तसेच नारायणपूर उपसा सिंचन योजनेद्वारे पुरंदर तालुक्यातील ५४०० हेक्टर अशा एकूण २१ हजार ३९२ हेक्टर क्षेत्राला बंद नलिकेतून सिंचन लाभ देण्याचे प्रस्तावित केले आहे.
प्रकल्पाची वैशिष्टय़े काय?
धरणातील पाण्याच्या दाबाचा वापर करून पूर्ण लाभक्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाची सोय शेतकऱ्यांना करून देण्याचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पात जवळपास ९०० कि.मी. लांबीच्या जलवाहिन्या भूमिगत असणार आहेत. या जलवाहिन्यांत १२ महिने २४ तास पूर्ण दाबाने पाणी असणार आहे. कधी आणि किती पाणी घ्यायचे, याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना असणार आहे.
शासनाच्या धोरणानुसार सूक्ष्म सिंचन पद्धतीला प्रोत्साहन देणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेणे, हव्या त्या वेळी पाणी उपलब्ध करून देणे, लोकसहभागातून सिंचन व्यवस्थापन विकसित करून पाणीवापर संस्थांना सक्षम करणे आणि त्यांच्या माध्यमातून स्थानिक भागाचा विकास करण्यासाठी हा प्रकल्प मोठी भूमिका बजावणार आहे, असे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक ता. ना. मुंडे यांनी सांगितले.
सूक्ष्म सिंचन पद्धती म्हणजे काय?
सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाइपद्वारे थेट पिकांच्या मुळाशी पाणी दिले जाते. त्यामुळे पिकांना पाहिजे तेवढे आणि आवश्यक तेवढे पाणी देता येते. या पद्धतीत पिकांना कधी, किती पाणी द्यायचे यावर नियंत्रण ठेवता येते. गुंजवणी प्रकल्पासाठी हीच पद्धत वापरण्यात येणार आहे. शेतकऱ्याला पाणी हवे तेव्हा शेतातील पाण्याचा व्हॉल्व्ह फिरवला, की सरळ पिकाच्या मुळाशी पाणी जाईल. धरणाच्या पाण्याचा दाब असल्याने विजेची गरजच लागणार नाही.
प्रकल्पात पाणी व्यवस्थापन कसे असेल?
डाव्या बंदनलिका कालव्याची लांबी ८३.६९८ कि.मी., उजवी बंदनलिका कालवा डाव्या कालव्याच्या १७.६८१ कि.मीमधून पुढे निघत असून त्याची लांबी २०.३७८ कि.मी. आहे. त्यातून नदीच्या उजव्या तीरावरील लाभक्षेत्राला वितरण करण्यात येईल. वितरण प्रणालीतून भोर, वेल्हा आणि पुरंदर या तीन तालुक्यांमधील २१ हजार ३९२ हेक्टर जमीन सिंचनाची क्षमता निर्माण होणार आहे. धरणाचे काम पूर्ण झाले असून वितरण प्रणालीची कामे प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पाचे वैशिष्टय़ म्हणजे परंपरागत कालव्यांऐवजी शेतीला पाणी देण्यासाठी जलवाहिनीचा अवलंब केला आहे. या जलवाहिन्या टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. या प्रणालीमुळे पाण्याचा कोणताही अपव्यय होणार नाही. सिंचनाची कार्यक्षमता मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. धरणातील पाण्याचा पुरेपूर वापर होण्यास मदत होणार आहे.
या धरण परिसरात या पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अत्याधुनिक अशा स्काडा या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.
prathamesh.godbole@expressindia.com