अन्वय सावंत

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अलौकिक यशानंतर जगभरात ट्वेन्टी-२० लीगचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. त्यामुळे बरेचदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ट्वेन्टी-२० लीग यापैकी एकाची निवड करणे खेळाडूंना भाग पडते. आता ‘आयपीएल’मधील काही फ्रँचायझींनी इंग्लंडच्या सहा आघाडीच्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत वर्षभर जगभरातील विविध ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी कोट्यवधींचा करार देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पुन्हा ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध ट्वेन्टी-२० लीग’ हा वाद डोके वर काढण्याची शक्यता आहे.

New Zealand Announce T20 WC Squad With Special Guests in Unique Way
T20 World Cup साठी न्यूझीलंडकडून अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा, IPL मधील ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान

‘आयपीएल’ फ्रँचायझींची इंग्लंडच्या खेळाडूंना किती रकमेचा करार देण्याची तयारी?

‘आयपीएल’मधील फ्रँचायझींनी विविध देशांतील ट्वेन्टी-२० लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत. त्यामुळे त्यांचे जाळे जगभर पसरले असून, वर्षभर कोणत्या ना कोणत्या लीगचे सामने सुरूच असतात. त्यामुळे आपल्या संघांना यश मिळावे यासाठी त्यांचा सर्वतोपरी प्रयत्न असतो. त्याच दिशेने पाऊल उचलताना आता ‘आयपीएल’मधील काही फ्रँचायझींनी इंग्लंडच्या सहा खेळाडूंना विविध देशांतील ट्वेन्टी-२० लीगमधील आपल्या संघांकडून खेळण्यासाठी प्रत्येकी ५० लाख पौंड म्हणजेच साधारण ५० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. इंग्लंडमधील ‘टाइम्स’ या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसह इंग्लंडच्या एकूण सहा खेळाडूंशी ‘आयपीएल’ फ्रँचायझींनी संपर्क केला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ किंवा कौंटी संघांऐवजी ‘आयपीएल’ फ्रँचायझींशी वार्षिक करार करण्याबाबत त्यांनी विचारणा केली आहे.’’

क्रिकेटला व्यावसायिक फुटबॉलचे स्वरूप मिळणार का?

‘आयपीएल’ फ्रँचायझींनी केवळ इंग्लंड नाही, तर अन्य देशांच्या खेळाडूंशीही संपर्क केल्याची माहिती आहे. ‘‘जगभरातील खेळाडूंच्या संघटनांमध्ये चर्चा झाली आहे. भविष्यात १२ महिन्यांचा फ्रँचायझी करार अस्तित्वात येऊ शकतो, जेणेकरून खेळाडू वर्षभर एका ट्वेन्टी-२० फ्रँचायझीचे विविध देशांतील लीगमध्ये प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे क्रिकेटला व्यावसायिक फुटबॉलचे स्वरूप मिळेल,’’ असेही इंग्लंडमधील वृत्तपत्राने आपल्या बातमीत नमूद केले आहे. व्यावसायिक फुटबॉलमध्ये खेळाडू हे एका क्लबशी करारबद्ध असतात. केवळ आंतरराष्ट्रीय सामने असतील, तेव्हा त्यांना ठरावीक काळासाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते.

सध्या कोणत्या स्पर्धांमध्ये ‘आयपीएल’ फ्रँचायझींच्या मालकीचे संघ आहेत?

संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि लवकरच सुरू होणाऱ्या अमेरिकेतील ट्वेन्टी-२० लीगमध्ये ‘आयपीएल’ फ्रँचायझींच्या मालकीचे संघ आहेत. तसेच सौदी अरेबियामध्ये ट्वेन्टी-२० लीगला सुरुवात होण्याची शक्यता असून या स्पर्धेतून सर्वाधिक पैसा खेळाडूंना मिळणे अपेक्षित आहे. यातील संघ खरेदी करण्यासाठीही ‘आयपीएल’ फ्रँचायझी आघाडीवर असतील. विक्रमी पाच वेळा ‘आयपीएल’ विजेत्या मुंबई इंडियन्स संघाची मालकी असणाऱ्या ‘इंडियाविन स्पोर्ट्स’ कंपनीचे संघ अमिराती (एमआय इमिरेट्स), दक्षिण आफ्रिका (एमआय केपटाऊन) आणि अमेरिका (एमआय न्यू यॉर्क) येथील ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळणे प्रस्तावित आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ‘एसए२०’ लीगमधील सहाही संघ ‘आयपीएल’ फ्रँचायझींनीच खरेदी केले आहेत.

इंग्लंडचे खेळाडू करार स्वीकारणार?

ब्रेंडन मॅककलमने प्रशिक्षकपद आणि बेन स्टोक्सने कर्णधारपद सांभाळल्यापासून इंग्लंडच्या कसोटी संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटला अजूनही महत्त्व दिले जाते. त्यामुळे इंग्लंडचे आघाडीचे क्रिकेटपटू कसोटीकडे दुर्लक्ष करून ट्वेन्टी-२० लीगना पसंती देण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ‘आयपीएल’ फ्रँचायझींशी वार्षिक करार केल्यास खेळाडूंना मोठा आर्थिक मोबदला मिळेल. इंग्लंडमधील वृत्तपत्राच्या माहितीनुसार, ‘‘इंग्लंडच्या खेळाडूंना ‘आयपीएल’ फ्रँचायझींकडून २० लाख ते ५० लाख पौंडपर्यंतची रक्कम मिळू शकते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या वार्षिक कराराच्या तुलनेत ही रक्कम पाचपट आहे.’’ त्यामुळे खेळाडूंना हे करार नाकारण्याबाबत नक्कीच विचार करावा लागेल.

यंदा ‘आयपीएल’मध्ये इंग्लंडच्या कोणत्या खेळाडूंचा समावेश?

इंग्लंडचे बहुतांश आघाडीचे खेळाडू ‘आयपीएल’मध्ये खेळत आहेत. मुंबईच्या संघात जोफ्रा आर्चर, चेन्नई सुपर किंग्जच्या संघात कसोटी कर्णधार बेन स्टोक्स व मोईन अली; पंजाब किंग्ज संघात सॅम करन व लियाम लिव्हिंगस्टोन; सनरायजर्स हैदराबादच्या संघात हॅरी ब्रूक व आदिल रशीद; दिल्ली कॅपिटल्सच्या संघात फिल सॉल्ट, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या संघात रीस टॉपली (सध्या दुखापतीमुळे बाहेर) व डेव्हिड विली; राजस्थान रॉयल्सच्या संघात जोस बटलर व जो रूट; लखनऊ सुपर जायंट्सच्या संघात मार्क वूडचा समावेश आहे.

इतर संघांबाबत फ्रँचायझींकडून विचारणा होण्याची शक्यता कितपत आहे?

सर्वाधिक शक्यता वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड संघांबाबत संभवते. वेस्ट इंडिजचे बहुतेक क्रिकेटपटू गेली काही वर्षे प्राधान्याने जगभर टी-२० ली क्रिकेट खेळत असतात. कारण वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाशी करारबद्ध होण्यापेक्षा फ्रँचायझींशी करारबद्ध राहणे त्यांना केव्हाही फायद्याचे ठरते. न्यूझीलंडच्या संघाने अलीकडच्या काळात सर्वच प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केलेली असली, तरी तेथील मंडळाकडून क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन तुटपुंजे असते. त्यामुळे अनेकांना विशषतः कारकीर्दीच्या उत्तरार्धात केवळ लीग क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे अधिक सोयीचे ठरते. ऑस्ट्रेलियन क्रिकेपटूंच्या बाबतीत आयपीएल फ्रँचायझींशी वर्षभर करारबद्ध राहणे फारसे संभवत नाही. कारण तेथे स्थानिक क्रिकेट व्यवस्था, मानधन आणि बिग बॅशसारखी स्वतंत्र व सक्षम लीग हे सारे काही आहे. अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडे टी-२० प्रकारातील कौशल्य उत्तम प्रकारे असले, तरी आयपीएल फ्रँचायझी सरकारी धोरणाविरोधात जाऊन त्यांना करारबद्ध करणे पूर्णतः अशक्य. इतर देशांच्या बाबतीत गुणवत्ता आणि गुंतवणूक हे गणित वर्षभरासाठी चालवणे फायदेशीर ठरत नाही.