scorecardresearch

विश्लेषण : इराणी आंदोलनाचे लोण फुटबॉल मैदानावरही

इराण फुटबॉल संघाचे शिबीर सुरू असलेल्या मैदानाबाहेर नागरिक महसाला न्याय मिळवून द्या, अशा घोषणा देत एकत्र आले होते

विश्लेषण : इराणी आंदोलनाचे लोण फुटबॉल मैदानावरही
इराणमधील युवती महसा अमिनीच्या पोलीस कोठडीतील मृत्यूच्या निषेधार्थ इराणचे फुटबॉलपटूही सरसावले..

ज्ञानेश भुरे

मानवी हक्कांविरुद्ध लढण्यासाठी आतापर्यंत अनेकदा क्रीडा क्षेत्राच्या व्यासपीठाचा उपयोग केला गेला. प्रामुख्याने ऑलिम्पिक, विश्वचषक स्पर्धा यात आघाडीवर असतात. अनेकदा नागरिकांसह खेळाडूही हक्कांचे समर्थन करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. इराणमधील युवती महसा अमिनीच्या पोलीस कोठडीतील मृत्यूच्या निषेधार्थ इराणचे फुटबॉलपटूही सरसावले..

ही चर्चा कशामुळे सुरू झाली?

इराणमध्ये महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला हिजाब न घातल्यामुळे ११ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर १६ सप्टेंबरला महसाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्याचे संतप्त पडसाद  इराणमध्ये उमटले. अन् महिलांच्या हक्कांसाठी नागरिक रस्त्यावर उतरू लागले. आंदोलक मोक्याच्या जागांवर येऊच नयेत, अशी नाकेबंदी इराण सरकारने आरंभल्यामुळे, इराण फुटबॉल संघाचे शिबीर सुरू असलेल्या मैदानाबाहेर नागरिक महसाला न्याय मिळवून द्या, अशा घोषणा देत एकत्र आले होते. तेव्हा हा संघर्ष मैदानापर्यंत पोहोचला व नंतर फुटबॉलपटूंनी यात उडी घेतली.

फुटबॉलपटूंचा सहभाग सुरू कसा झाला?

इराण फुटबॉल संघाचा आक्रमक खेळाडू सरदार अझमोन याने सर्वप्रथम या संघर्षांत उडी घेतली. राष्ट्रीय संघाच्या नियमामुळे बोलण्याचे निर्बंध असतानाही तो संतापाला आवर घालू शकला नाही. हा संताप व्यक्त करताना तो म्हणाला की, इराणी महिलांच्या डोक्यावरील एका केसासाठी मी फुटबॉल संघातील स्थानाचा त्याग करण्यास तयार आहे. अनवधानाने झालेल्या एका चुकीसाठी आपल्या देशात इतक्या सहजपणे महिलांना मारले जात असेल तर मी त्याचा निषेध करतो. हे मत त्याने इन्स्टाग्रामवर व्यक्त केले. त्यानंतर या संघर्षांत फुटबॉल क्षेत्रही सहभागी झाले.

अझमोनच्या मताचा नेमका काय परिणाम?

अझमोनच्या मताला राष्ट्रीय संघातील सर्वच खेळाडूंनी त्याला पाठिंबा दिला. सेनेगलविरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीपूर्वी मैदानात इराणचे राष्ट्रगीत सुरू असताना सर्व खेळाडूंनी आपल्या जर्सीवरील राष्ट्रीय चिन्ह झाकणारे जॅकेट परिधान केले. विशेष म्हणजे या सामन्यात अझमोनने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. पुढे अझमोन या संघर्षांत आंदोलकांसह रस्त्यावर उतरला. त्याचा संघातील एक सहकारी झोबीएर निकनफने तर मुंडन केले.

आंदोलनाचे फुटबॉलविश्वावर कोणते पडसाद?

इराणचे फुटबॉलपटू या वादात उतरल्याने त्यांच्या विरोधातही काही जण पुढे आले आहेत. या विरोधकांनी इराणला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर काढावे, अशी आवई उठवली आहे. त्याच वेळी इराणचे मुख्य प्रशिक्षक क्विरोझ यांनी इराणची कामगिरी उंचावत असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे या वादाला वेगळेच राजकीय वळण मिळू लागल्याची भीती व्यक्त होत आहे. सेनेगलला बरोबरीत रोखण्यापूर्वी इराणने अशाच मैत्रीपूर्ण सामन्यात बलाढय़ उरुग्वेला १-० असे हरवले होते.

आता पुढे काय होणार ?

इराणमध्ये फुटबॉल क्षेत्रावर राजकीय प्रभाव पडत आला आहे. १९७९च्या इस्लामवादी क्रांतीनंतर काही काळापासून खेळांमध्ये राजकीय हस्तक्षेप हा नेहमीचाच आहे. अव्वल खेळाडूंनी खेळाशी संबंधित नसलेल्या घटकांबाबत शासनाचे अनुसरण करणे अपेक्षित आहे. कमीत कमी राजकीय क्षेत्राबद्दल मौन बाळगणे अपेक्षित असते. पण यावेळी तसे घडले नाही. अझमोनने पुढाकार घेतल्यानंतर त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. त्याच्या भवितव्याविषयी अद्याप निर्णय झाला नसला, तरी त्याला राष्ट्रीय संघातून वगळले जाऊ शकते. त्याला पाठिंबा देणाऱ्या खेळाडूंवरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

फिफाभूमिका घेणार का?

फिफा राजकीय हस्तक्षेपाला कधीच थारा देत नाही. अत्यंत संयमाने अशी प्रकरणे हाताळते. २०२० मध्ये, लिव्हरपूल फुटबॉल क्लब, डॉर्टमुंड आणि सर्व बुंडेसलिगा आणि ला लीगा संघातील खेळाडूंनी अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ चळवळ जोमाने सुरू झालेली असताना, खेळाडूंनी फ्लॉइडला खेळपट्टय़ांवर श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी, फिफाने क्लब व्यवस्थापकांना ‘सामान्य ज्ञान’ वापरण्याचे आणि त्यांना दंड न करण्याचे आवाहन केले होते.  फिफा कायम खेळाडूंच्या पाठीशी उभी राहिली आहे.

ते अमेरिकी उदाहरण! इराणबद्दल फिफातितकी ठाम आहे?

जेव्हा दोन इराणी फुटबॉलपटूंनी २०१७ मध्ये युरोपा लीगमध्ये इस्रायलच्या मॅकाबी एफसीशी करार केला होता तेव्हाही फिफा त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. इराणी खेळाडूंना कोणत्याही क्षेत्रात इस्रायलींविरुद्ध स्पर्धा करण्यास मनाई आहे. तेव्हा इराण क्रीडा मंत्रालयाने या दोघांना संघातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता.  इराणी महिलांवर क्रीडा सामने पाहायला जाण्यास असलेली बंदी उठण्यात ‘फिफा’च्या आग्रहाचाही वाटा आहे. आताही, फिफाने विश्वचषकासाठी इराणच्या सामन्यांची महिलांनाही तिकीट विक्री केली असून, अंदाजे ३,५०० महिलांनी ही तिकिटे खरेदी केल्याचे समजते. अर्थात इराणच्या नव्या हिजाबविरोधी- स्वातंत्र्यवादी आंदोलनाच्या संदर्भात फुटबॉलपटूंच्या भूमिकेवर अद्याप फिफाने प्रतिक्रिया दिलेली नाही.

इराणमध्ये क्रीडा क्षेत्रात महिलांचे स्थान काय?

इस्लामी राजवटीने घातलेल्या अटींमुळे इराणमध्ये महिलांना तसा कुठेच वाव नव्हता. त्यामुळे बास्केटबॉल, क्रिकेट आदी खेळांसाठी तयार झालेले महिलांचे संघ अल्पजीवीच ठरले. त्यांचा कबड्डी संघ मात्र भक्कम आहे. पण, त्या महिला खेळाडूही हिजाब घालून आजही खेळतात. त्यांचा पोषाखच तसा आहे (टीशर्ट, ट्रॅकपॅन्ट आणि डोके-मान-गळा झाकणारा पांढरा हिजाब). मध्यंतरी- जानेवारी २०२२ मध्ये नवी मुंबईत झालेल्या आशियाई फुटबॉल महासंघ-प्रणीत महिला फुटबॉल आशिया चषक स्पर्धेत इराणी महिला उतरल्या, डोके-मान झाकणाऱ्या हिजाबसारखाच ‘हूडी’ परिधान करून खेळल्या, भारताशी बरोबरीत राहिल्या पण चीनकडून पराभवानंतर स्पर्धेबाहेर गेल्या.dyanesh.bhure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या