हृषिकेश देशपांडे
राजस्थानमध्ये निवडणुकीत चुरस आहे असे वक्तव्य खुद्द काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्यातील काँग्रेसची सत्ता जाणार का, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना शह देण्याचा हा प्रयत्न आहे काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण गेहलोत यांनी पक्षश्रेष्ठींना आव्हान दिले होते. पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक त्यांच्या समर्थकांनी होऊ दिली नव्हती. त्यामुळे पक्षनेतृत्व नाराज असल्याचे मानले जात आहे. या साऱ्यांत राजस्थानमध्ये पुन्हा सत्ताबदल होऊन, बदलाची परंपरा कायम राहणार असाही अर्थ राहुल यांच्या वक्तव्याचा काढला जात आहे.




वसुंधराराजे पुन्हा सक्रिय…
राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलते असा गेल्या पंचवीस वर्षांचा अनुभव आहे. राज्यात काँग्रेस-भाजप यांच्या सत्ता बदलाची ही परंपरा आहे. आता राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे आता भाजपला संधी मिळणार काय, हा मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयपूरमध्ये सभा घेत भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. राजस्थानच्या या संघर्षात दोन्ही बाजूंकडे पक्षांतर्गत नाराजीचे अनेक कंगोरे आहेत. राज्यात विधानसभेच्या २०० जागा आहेत. सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना आहे. भाजपकडे माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या तोडीचा राज्यव्यापी नेता नाही. त्यामुळे पक्षाला जरी वसुंधरा यांना बाजूला करण्याची इच्छा असली, तरी त्यातून भाजपचे समीकरण बिघडू शकते. दोन सप्टेंबरपासून राज्यात भाजपने परिवर्तन यात्रा काढली. या चार परिवर्तन यात्रांमध्ये वसुंधरा यांच्या गैरहजेरीची चर्चा होती. मात्र आता त्या पुन्हा पक्षाच्या उपक्रमांमध्ये सहभागी झाल्या आहेत. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीलाही उपस्थित होत्या. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनीही रविवारी वसुंधराराजेंची सरकारी निवासस्थानी भेट घेतली. हे दोघेही पक्षांतर्गत विरोधक मानले जातात. त्यामुळे या भेटीला महत्त्व आहे. वसुंधराराजे यांच्या निवासस्थानी महिलांच्या एका कार्यक्रमात त्यांनी महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. वसुंधरा यांचे भाषण राज्यातील कायदा व सुवस्थेभोवती केंद्रित होते. त्यावरून महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे आहेत. विविध जनमत चाचण्यांमध्येही यावरून गेहलोत सरकारबद्दल नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला आरक्षण विधेयक संसदेत संमत झाल्याने त्याचाही लाभ भाजप उठवणार. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या सभेच्या नियोजनात पार्किंगपासून ते मंडप व्यवस्थापनात महिला कार्यकर्त्यांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली होती. आता भाजप उमेदवारीबाबत महिलांना अधिकाधिक संधी देण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-‘फाइव्ह आइज’ कराराअंतर्गत अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जर हत्येचे धागेदोरे? काय आहे हा करार?
जाट मतांवर लक्ष
काँग्रेसच्या माजी खासदार ज्योती मिर्धा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयपूरमधील सभेत मिर्धा यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. नागौरमधील जाट समुदायातील प्रमुख नेत्या अशी त्यांची ओळख आहे. राज्यातील २० ते २५ जागांवर जाट मतदान निर्णायक मानले जाते. त्यामुळे पक्षात नव्या असून देखील त्यांना महत्त्व देण्यात आले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे हनुमान बेनिवाल यांना टक्कर देण्यासाठी ही भाजपची रणनीती मानली जाते. बेनिवाल हे नागौरचे खासदार असून, भाजपपासून दुरावले आहेत. त्यांचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष आहे. काँग्रेस किंवा भाजपशी आघाडी करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ज्योती यांच्या प्रवेशाने नागौर भागातील विधानसभेच्या ६ ते ८ जागांवर भाजपला लाभ होऊ शकतो. काँग्रेसचे जुने नेते नथुराम मिर्धा यांच्या ज्योती या नात असून, त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. हरयाणातही ज्योती यांच्या प्रवेशाचा लाभ उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
आणखी वाचा-‘राज्यातील सहकार क्षेत्र उदध्वस्त करण्याचा प्रयत्न’, केरळने केंद्र सरकारवर आरोप का केला?
गेहलोत-पायलट मनोमीलन?
मुख्यमंत्री अशोक गेहलोत व काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांच्यात गेली पाच वर्षे संघर्ष सुरू आहे. त्यातून पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद गमवावे लागले. एक वेळ पायलट पक्ष सोडतात काय, अशी स्थिती होती. मात्र आता सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याशी जमवून घेतले आहे. मात्र दोघांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले नाही ही पक्षासाठी चिंता आहे. ७२ वर्षीय अशोक गेहलोत हे मुरब्बी राजकारणी मानले जातात. त्यांच्या विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांमुळे पक्षाला राज्यात पुन्हा आशा आहे. २७ सप्टेंबरपासून ते ९ दिवस राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. एकीकडे राजस्थान राखण्यासाठी काँग्रेसने शर्थ चालवली असतानाच, पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यात चुरस आहे असे वक्तव्य केले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडच काय, पण तेलंगणाही जिंकू असा आत्मविश्वास बाळगणारे राहुल गांधी राजस्थानबद्दल साशंक आहेत. पक्षाच्या सर्वेक्षणांच्या आधारावर दिल्लीत बोलताना राहुल यांनी हे भाष्य केले असावे असा तर्क मांडला जात आहे. विकासाचे आदर्शवत प्रारूप असे राजस्थानचे वर्णन अशोक गेहलोत करत आहेत. मग सत्ता राखण्याबाबत पक्ष नेत्यांनाच चिंता कशी? त्यामुळे राहुल यांनी राजस्थानबद्दल संदिग्ध भाष्य करून भाजपच्या प्रचाराला बळ दिल्याचे मानले जात आहे.